कॉख, रॉबर्ट (रोबेर्ट) : (११ डिसेंबर १८४३ – २८ मे १९१०). जर्मन जंतुशास्त्रज्ञ. १९०५ सालच्या शरीरक्रियाविज्ञान व वैद्यक या विषयांच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. जंतुशास्त्रातील महत्त्वपूर्ण संशोधनाकरिता प्रसिद्ध. हॅनोव्हरमधील क्लाउसथाल येथे त्यांचा जन्म झाला. गॉटिंगेन विद्यापीठात शिक्षण घेऊन १८६६ मध्ये त्यांनी उच्च वैद्यकीय पदवी मिळविली. फ्रँको-जर्मन युद्धात १८७२ मध्ये वैद्य म्हणून कार्य केले. नंतर वोल्स्टाइन येथे वैद्यकीय व्यवसाय व त्याचबरोबर जंतूंसंबंधी संशोधनकार्य सुरू केले. त्याकाळी संसर्गजन्य काळपुळी (फाशी, अँथ्रॅक्स) हा रोग मेंढ्यांमध्ये अत्यंत मारक होत असे [→काळपुळी, संसर्गजन्य]. या रोगावर संशोधन करून कॉख यांनी तो बॅसिलस अँथ्रॅसिस या जंतूंमुळे होतो असे सिद्ध केले. हे जंतू उंदराच्या शरीरात टोचल्यास उंदरालाही रोग होतो म्हणून रोगाचे कारण ते जंतूच होत असे त्यांनी सिद्ध केले. विशिष्ट जंतूंमुळेच विशिष्ट रोग होतो हे ठरविण्यासाठी त्यांनी काही निकष घालून दिले, ते ‘कॉख यांची गृहीतके’ म्हणून ओळखण्यात येतात व थोड्या फरकाने आजही प्रमाणभूत मानले जातात. [→सूक्ष्मजीवशास्त्र].
रोगजंतूचे स्वतंत्रपणे प्रचुरजनन (वारंवार गुणन होऊन नवीन पेशी उत्पन्न होणे) करण्यासाठी संवर्धन माध्यमे (प्रायोगिक रीत्या जंतू वाढविण्याचे पदार्थ) वापरण्याचे तंत्र व त्या संवर्धन माध्यमांत रक्तसदृश असे पेप्टोन, मांसार्क, मीठ, द्राक्षशर्करा (ग्लुकोज) व पाणी वापरून १८७६ साली त्यांनी रोगजंतूंचे प्रचुरजनन करून दाखविले. संवर्धन माध्यमामध्ये द्रव पदार्थाप्रमाणेच घन किंवा घट्ट पदार्थ वापरणे शक्य आहे असे त्यांनी दाखविले व त्यासाठी जिलेटीन व आगर हे पदार्थ वापरणे सुरू केले. कापलेल्या बटाट्यावर वाढणाऱ्या जंतूंचे प्रचुरजनन या घन संवर्धन माध्यमावर त्यांनी केले. सूक्ष्मजंतू स्पष्ट दिसावे म्हणून रंजकद्रव्ये वापरून जंतूंना अभिरंजित करण्याची (रंजकद्रव्याने रंगविण्याची) पद्धत त्यांनीच सुरू केली. जंतूंचे संवर्धन व त्यांचा अभ्यास करण्याच्या पद्धती यांसंबंधीच्या कॉख यांच्या संशोधनाचे निष्कर्ष १८७७ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांच्या पद्धती अद्यापही वापरण्यात येतात.
बर्लिनमधील वैद्यकशाळेत प्राध्यापक व स्वास्थ्य मंडळाचे सदस्य म्हणून १८८० साली आणि नंतर बर्लिन विद्यापीठात सन्मान्य प्राध्यापक व स्वास्थ्य संस्थेचे संचालक म्हणून १८८५ मध्ये त्यांची नेमणूक झाली. त्यांनी रोगसंसर्गशास्त्रात अनेक नवीन पद्धती व सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी १८८२ मध्ये क्षयरोगजंतू व १८८३ मध्ये नेत्र-श्लेष्मलशोथाच्या (डोळ्याच्या अस्तराच्या दाहयुक्त सूजेच्या, डोळे येणे या रोगाच्या) जंतूचा शोध लावला. १८८३ साली त्यांनी मेंढ्यांच्या संसर्गजन्य काळपुळी विरोधी लस प्रथमच तयार केली. त्याच वर्षी भारतातील कलकत्ता येथील कॉलरा संशोधन समितीचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. या रोगाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल जर्मन सरकारने त्यांना एक लक्ष मार्कची देणगी दिली.
क्षयरोगजंतूंपासून ट्युुबरक्युलीन हे रोगनिदान करण्यास उपयुक्त ठरणारे द्रव्य त्यांनी १८९० च्या सुमारास तयार केले त्याचा क्षयाच्या निदानासाठी आजही उपयोग होतो. १८९१ मध्ये त्यांच्याकरिता खास स्थापन केलेल्या बर्लिन येथील सांसर्गिक संस्थेच्या संचालकपदावर त्यांची नेमणूक झाली व त्याच पदावर त्यांनी १९०४ सालापर्यंत काम केले. १८९० ते १९०५ या काळात सार्वजनिक पाणीपुरवठा गाळून निर्जंतुक करण्याच्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या, तसेच दक्षिण आफ्रिकेत जनावरांच्या बुळकांडी (रिंडरपेस्ट) रोगासंबंधी संशोधन केले.
मुंबईत १८९७ मध्ये आलेल्या प्लेगाचे निदान त्यांनी केले. हिवतापाचे कारण व उपचार शोधण्यासाठीही त्यांनी पुष्कळ प्रवास केला. १९०५–१९०७ मध्ये त्यांनी आफ्रिकेतील पुनरावर्ती (थांबून थांबून पुन्हा येणारा) ज्वर व निद्राज्वर यांचा अभ्यास करून ते रोग अनुक्रमे गोचीड व त्सेत्से माशी यांच्यामुळे पसरतात हे सिद्ध केले. या कार्याबद्दल त्यांना बर्लिन ॲकॅडमीचे सन्मान्य सभासद करण्यात आले. त्यांनी केलेल्या संशोधनासंबंधी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, तसेच १८६६ नंतर स्वास्थ्य आणि सांसर्गिक रोग या विषयांवरील एका मासिकाचे ते संपादक होते. त्यांचे संशोधनकार्य एकत्रित स्वरूपात १९१२ मध्ये प्रसिद्ध झाले. ते बाडेनबाडेन येथे हृदयविकारामुळे मृत्यू पावले.
कुलकर्णी, नी. बा.
“