काँदे, ल्वी (दुसरा) : (८ सप्टेंबर १६२१ — ११ डिसेंबर १६८६). सुप्रसिद्ध फ्रेंच सेनानी. फ्रान्सच्या बूरबाँ येथील राजघराण्यात हा जन्मला. काँदे घराण्याने फ्रान्सच्या इतिहासात महत्त्वाची कामे केली असून दुसऱ्या ल्वीला ‘ग्रेट काँदे’ असेच म्हटले जाते. पॅरिसच्या शाही अकादमीत शिक्षण घेतल्यावर, सतराव्या वर्षीच याची बर्गंडीचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली. यूरोपात चाललेल्या तीस वर्षांच्या युद्धात याला फ्रेंच सेनाप्रमुखत्व मिळाले. १६४३ मध्ये रॉक्रवाजवळील लढाईत याने स्पेनच्या बलाढ्य सैन्याचा पराभव करून असामान्य युद्धकौशल्य दाखविले. फ्रायबर्ग (१६४४), नॉर्दलिंगेन आणि लांस (१६४८) या युद्धांतही याला विजय मिळाला. फ्राँद या फ्रेंच राजाविरूद्धच्या बंडात सामील झाल्याबद्दल याला कैद करण्यात आले होते. १६५३—५८ या काळात हा स्पॅनिश सैन्याचा अधिकारी होता. १६५९ च्या पिरेनीज शांतता तहानंतर हा पुन्हा फ्रेंचांच्या बाजूस आला व काही महत्त्वाची युद्धे लढला.
पाटणकर, गो. वि.
“