कलमकारी : सुती कापडाच्या छपाईचा व रंगाईचा एक पारंपारिक भारतीय हस्तकलाव्यवसाय. सध्याच्या आंध्र प्रदेशातील मसुलीपटम् येथील कलमकारी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. ‘कलम’ म्हणजे बारीक व मऊ तारांचा कुंचला. त्याच्या साहाय्याने हे काम केले जाई म्हणून ‘कलमकारी’ ही संज्ञा रूढ झाली. कलमकारी पूर्वी हातानेच केली जाई कालांतराने उत्तर भारतीय प्रभावामुळे लाकडी ठशांचाही छपाईसाठी उपयोग होऊ लागला. अशा लाकडी ठशांमुळे केलेली छपाई व कलमाच्या साहाय्याने केलेले रंगकाम आजही उत्कृष्ट समजले जाते. यात कापड रंगविण्यासाठी वनस्पतिजन्य रंगांचा उपयोग केला जातो. सध्या कलमकारीचे तीन प्रकार आढळतात : (१) लाकडी ठशांची छपाई, (२) लाकडी ठशांची छपाई, पण कलमाने केलेली रंगाई, (३) फक्त हाताने केलेली रंगाई. मसुलीपटम् येथील बरीच कुटुंबे कलमकारी करतात. भारतातील विविध भागांत कलमकारीचे नाना प्रकार, कलाकुसरीचे असंख्य नमुने व निर्मितीची विविध तंत्रे आहेत. या सर्व पारंपारिक पद्धती बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, काश्मीर, राजस्थान, गुजरात इ. प्रदेशांतून आजही दिसून येतात.
पहा : खडीकाम जामदानीकलाकाम पाटोळा बांधणी बाटिककाम.
जोशी, चंद्रहास
“