काचेचे कलाकाम : काचकलाकाम काचनिर्मितीइतकेच प्राचीन आहे. काचेवरील रंगलेपन-प्रक्रिया खिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून इंजिप्शियनांना परिचित होती, तर ⇨मीनाकारीचे तंत्र ५,००० वर्षापूर्वीपासून त्यांना ठाऊक होते. नंतर अरबांनी तेराव्या व चौदाव्या शतकांत मीनाकारीच्या तंत्रात बरीच सुधारणा घडवून आणली, तर जर्मनांनी यूरोपीय काचकामाच्यापरंपरेचे पंधराव्या शतकात पुनरुज्जीवन केले.

मिलेफिअरी काचपात्र, व्हेनिस, सु. १६ वे शतक

अठराव्या शतकात काचेवरील कलाकाम अत्यंत प्रगत अवस्थेत होते. विल्यम व मेरी बिल्बी या इंग्लंडमधील कलावंतांनी काचकलेचा खूपच विकास घडवून आणला.

कुट्टिमकाच (मोझेइक) व बहुरंगी काच यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकाच्या आसपास वा तत्पूर्वी झाली असावी. त्यांची निर्मितीप्रक्रिया अतिशय साधी व सोपी होती. त्यासाठी प्रथम विविधरंगी काचतुकडे जुळवून ठेवत व नंतर त्यांना उष्णता देत. त्यामुळे ते सर्व तुकडे वितळून परस्परांत मिसळून जात. ह्या एकसंघ झालेल्या काचतुकड्यास वाकवून हवा तो आकार देत. या प्रक्रियेच्या साहाय्याने इ.स.पू.चौथ्या शतकात प्राण्यांच्या आकृत्या किंवा गुंतागुंतीचे आकृतिबंध काचपात्रावर उठवीत असत. या पद्धतीत पुढे व्हेनिसच्या कारागिरांनी बदल घडवून आणला. `मिलेफिलरी’ म्हणजे `सहस्त्र-पुष्प’ या नावाने त्यांची कलात्मक काचनिर्मिती प्रसिध्दीस आली. या पद्धतीत विविधरंगी काच-तुकड्याऐवजी विविधरंगी काच-शलाका वापरत असत. दोन भिन्नरंगी काचशलाका अशा रीतीने एकमेकांना जोडण्यात येत, की त्यांच्या आडव्या छेदातून दृग्गोचर होणारे भाग पुष्पसदृश वाटावे व काचेवरील खोलगट भागांमुळे विखुरलेल्या फुलांचा किंवा पुष्पमालिकेचा आभास निर्माण व्हावा.

इराणी काचपात्र, ९ - १० वे शतक

काचपात्राच्या पृष्ठीभागावर पातळ काचतंतूंनी सुशोभन करण्याची कला ईजिप्तमध्ये इ. स. पू. १५०० च्या सुमारास उदयास आली. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात या कलेत बरीच प्रगती झाली. त्यानंतर इराणी व स्पॅनिश कारागिरांनी अठराव्या शतकात काचतंतूंपासून तयार केलेले प्राणी, टोपल्या इत्यादींची निर्मिती केली. जर्मनांनी संगमखरी काचकला विकसित केली तिला `श्मेल्झ’ काच म्हणत. या काचेवरील आडव्या उभ्या शुभ्र काचशलाकांची गुंफण जाळीकामासारखी भासत असे. त्याला ते `लॅटिसिनिओ’ म्हणत.

इ. स. पू. पहिल्या शतकात मुलामा चढविण्याची पद्धत रुढ होती, असे मानण्यात येते. परंतु दसऱ्या शतकात अस्तित्वात आलेली सोन्याच्या सुशोभनाची पद्धती त्याहून भिन्न आहे. तिला `लॅमिनेशन’ म्हणजे `पत्रण-पद्धती’ म्हणतात. या पध्ण्दतीत सोन्याचा पातळ व नितळ पात्र  काचेवर घट्ट जडवून त्यावर आकृतिबंध उठविण्यात येतात. या आकृतिबंधानुसार कोरीव काम करुन पष्याचा उरलेला भाग काढून टाकण्यात येतो. नंतर त्यावर काच-रसाचा पातळ थर देण्यात येतो. हा पातळ थर व सुवर्णपत्रा एकजीव होईपर्यंत ते काचपात्र तापविण्यात येते. या पद्धतीचा अवलंब मात्र अगदीच अल्प प्रमाणात करण्यात येतो.

‘कॅमिओ’ व `ओव्हरले’ या पद्धती रोमनांच्या आहेत. या पद्धतींत विरोधाभास निर्माण करणाऱ्या रंगांचे आकृतिबंध कोरण्यात येतात किंवा काचपात्राच्या पृष्ठभागावर दाब देऊन ते उठविण्यात येतात, त्यामुळे मूळ पृष्ठभागावर आकृतिबंध उठून दिसतो. नंतर काचपात्र पुन्हा तापविण्यात येते व ते दोन्ही एकसंघ करण्यात येतात.

अशा प्रकारे काचेवरील कलाकाम विविध प्रकारांनी करण्यात येत असले, तरी मीनाकारी, उत्कीर्णन, छेदन, फुंकन, रंगविलेपन, रौप्य-लेपन व वालुका-क्षेपण या पद्धती सर्वसाधारण आहेत. छेदन व उत्कीर्णन या पद्धतींचे मूळ सु. ३,६०० वर्षांपूर्वी आढळत असले, तरी त्या तशा आधुनिकच आहेत. आज तांबे व एमरी चक्र यांच्या साहाय्याने ते करण्यात येते. प्रत्यक्ष प्रक्रियेपूर्वी काचपात्रावरील आकृतिबंध कलाकाराला ठहकपणे दृग्गोचर व्हावा म्हणून आकृतिरेषा विशिष्ट शाईने काढण्यात येतात.

वालुका-क्षेपण पद्धती साध्यासुध्या व लहानसहान वस्तूंच्या सुशोभनासाठी उपयोगात आणतात. उदा., मोजपात्रे, काचदिवे, फलक-काच? तबक-काच इत्यादी. या पद्धतीमध्ये काचपात्राच्या पृष्ठभागावर आकृतिबंधाची बाह्यरेखा काढलेली असते व त्यावर वाळूचे गोल बारीक कण फुंकून बसविण्यांत येतात.

पारदर्शक व अपारदर्शन अशा दोन्ही प्रकारच्या सुशोभनासाठी तपनक्रियेच्या साहाय्याने कार्बनी धातुसंयोगांचे लेपन काचपात्रावर करण्यात येते. हव्या त्या धातूचा पातळ पत्रा काचपात्रावर बसवून झाला, की मग डिंकाचे विद्राव किंवा व्हार्निश यांनी चितारलेल्या काचपात्रावरील आकृतिबंधावर ऑक्साइड रंगांची वस्त्रगाळ पूड फवारुन, उडवून किंवा कुंचला फिरवून लावण्यात येते. यासाठी कार्बनी संयुगांचे माध्यम वापरुन त्यावर विविध रंगांची चकाकी आणण्यात येते. नंतर ते काच पात्र उष्णता देऊन तापविण्यात येते त्यामुळे त्यावर रंगद्रव घट्ट बसतो व कार्बनी संयुगे नाश पावतात.

काचपात्रातील रौप्यलेपनासाठी प्रथम तो काचतुकडा टीन क्लोराइड द्रावणाने ओलसर करुन घेतात. मग त्यावर अमोनियम सिल्व्हर नाट्रेटचे द्रावण व रोशेल साल्ट किंवा टार्टरिक अम्ल ओतण्यात येते. सु.अर्ध्या तासानंतर सिल्व्हर सोल्यूशनमधील द्रवाचे प्रमाणे कमी होऊन काचतुकड्यावर घट्ट स्वरुपाचे चांदीचे पातळ कवच तेवढे शिल्लक राहते. यापेक्षा अगदीच अल्पावधीत म्हणजे क्षणार्धात रौप्यविलेपनाचा परिणाम काचतुकड्यावर घडवून आणता येतो परंतु त्यासाठी अमोनियायुक्त सिल्व्हर नाट्रेटचे द्रावण व क्षपणक यांचा फवारा समकेंद्रित मुखाग्र असलेल्या फवारणी यंत्राने करावा लागतो.

भारतीय हुक्कादाणी, १७ वे शतक

काचचित्रे : पारदर्शक काचचित्रांच्या निर्मितीची सुरुवात १६९० ते १७६० या काळात झाली. ही चित्रे बहुधा प्रसिध्दीसाठी व प्रचारकार्यासाठी यूरोपीय देशांत वापरण्यात येतात. या पद्धतीत एका काचेच्या तुकड्यावर ओलसर मेझोटिंट कागद आच्छादण्यात येतो. काचेच्या त्या तुकड्याला तत्पूर्वीच चिकटसर अर्पेंटाइनचा लेप दिलेला असतो. नंतर हाताच्या बोटांनी त्या मेझोटिंट कागदावर हळूहळू घर्षण करण्यात येते, त्याबरोबर काचतुकड्याच्या पृष्ठभागावर चित्राकृतीच्या बाह्यरेषांवरुनच मऊ काचतुकड्याच्या उलट बाजूला रंगलेपन करुन मोठया कौशल्याने चित्रनिर्मिती करण्यात येते.


काचमुद्रण : काचमुद्रण हे एक प्रकारचे उत्कीर्णनच असते. या पद्धतीत काचेच्या तुकड्यावर पांढऱ्या अपारदर्शी तैलरंगाचे लेपन करण्यात येते. त्या लेपावरच मग उत्कीर्णन करण्यासठी वापरण्यात येणाऱ्या तीक्ष्णाग्र सळईने कलाकार हवा तो आकृतिबंध कोरतो. ती काच दिव्यासमोर धरली असता त्या कोरलेल्या रेषांमधून प्रकाशकिरणे आरपार जातात. या काचतुकड्यामागे एक प्रभावित (सेन्सिटाइज्ड) कागदाचा तुकडा लावण्यात येतो. त्यामुळे काचतुकड्यावर प्रकाशझोत टाकला असता त्या कागदाच्या तुकड्यावर छायाचित्राच्या निगेटिव्हप्रमाणे परिणाम घडून येतो व तो आकृतिबंध त्यावर मुद्रित होतो. हाच मुद्रित आकृतिबंध एखाद्या छायाचित्राप्रमाणे भासतो.

सुरेख नक्षीची मोगलकालीन हुक्कादाणी.

भारतात इ. स. पू. २००० वर्षापासून काचकलाकाम ज्ञात होते. याची साक्ष सिंधुसंस्कृतीतील मोहें-जो-दडो, हडप्पा, लोथल इ. ठिकाणी झालेल्या उत्खननांत सापडलेले मणी, बांगड्या वगैरे वस्तू देतात, त्यानंतरच्या तक्षशिला येथील उत्खननात हे नगर काचकलाकामाचे एक प्रमुख केंद्र होते, असे आढळून आले आहे. येथे मणी, बांगड्या, औषधाच्या कुप्या, विविध प्रकारची काचेची भांडी इ. वस्तू मोठया प्रमाणावर तयार होत असत. त्यासाठी त्या काळी विविधरंगी काचा वापरीत असत. पाटणा व त्याचा परिसर येथेही काचकामाचा उद्योग चालत असे. हिंदू आणि बौद्ध वाङ्मयात काच व काचेच्या वस्तू यांचे अनेक उल्लेख आढळतात. ख्रिस्तशतकाच्या सुरुवातीलाच तयार झालेली २५ ग २५ ग ०.८ सेंमी. या आकाराची फरशी काचकामाच्या इतिहासातील एक अजोड उदाहरण आहे. सातवाहनांच्या काळी (इ.स.पू. २०० ते इ. स. २०० पर्यंत) मणी, बांगड्या व कृट्टिम काचपद्धती व विविध आकृत्या इत्यादींनी अलंकृत केलेली रंगीबेरंगी भांडी प्रसिद्ध होती. हर्षवर्धनाच्या काळी (इ.स.सातवे शतक) काचेच्या वस्तू केवळ शोभेच्याच वस्तू राहिल्या नव्हत्या, तर दैनंदिन जीवनातही त्यांचा वापर मोठया प्रमाणावर होत असे.

मुसलमांनांच्या आगमनानंतर बऱ्याच परदेशी कारागिरांचा भारतात प्रवेश झाला, त्यामुळे भारतीय काचकलाकामाचे स्वरुप बहुविध बनले. सामान्यपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय काचकामाचे स्वरुप् हस्तकला व कुटिरोद्योग या स्वरुपाचे होते व आजही ते काही प्रमाणात टिकून आहेत. या गृहोद्योगात बहुधा मणी, उत्पादन प्रामुख्याने करण्यात येते. पहा : हंड्या व झुंबरे.

जोशी, चंद्रहास

पारंपरिक कांथ्याचा एक उत्कृष्ट नमुना. लिलि-पँड - पाश्र्चात्त्य पध्दतीचे काचपात्र,सु. १९ वे शतक. मिलेफिअरी प्रकारातील रोमन काचपात्र,१ ले शतक.(अ) श्रीगणेश भारतीय काचचित्रणाचा नमुना,१८ वे शतक. (आ) अनेकरंगी भारतीय काचपात्र,४ वे शतक. (इ) मध्ययुगीन भारतातील विविधाकार काचमणी.
रंगीत बोहीमियन काचपात्र,सु. १९ वे शतक. दुधी काचपात्रावरील पाश्र्चात्त्यपध्दतीचे मीनाकाम,सु. १८ वे शतक.