कॅफीन : चहा, कॉफी, कोला इ. वनस्पतींमध्ये असलेले एक अल्कलॉइड [ → अल्कलॉइड]. सूत्र C8 H10O2N4. चहा, कॉफी इ. पेयांमध्ये असलेला उत्तेजक गुण याच्यामुळेच असतो. यालाच रासायनिक नामकरण पद्धतीनुसार १, ३, ७ ट्रायमिथिल २, ६ डायऑक्सिप्यूरीन म्हणतात. १८२० साली एफ्. रूंगे यांनी प्रथम नैसर्गिक द्रव्यापासून हे वेगळे काढले व त्याची संरचना (रेणूमधील अणूंची मांडणी) पुढीलप्रमाणे मांडली :

याचे संश्लेषण (कृत्रिम रीतीने बनविणे) पूर्वी यूरिक अम्लापासून करीत असत परंतु हल्ली ते थिओब्रोमीन, थिओफायलीन किंवा झॅंथीन यापासून मिथिलीकरणाने (संयुगात मिथिल गट, CH3, घालणे) करतात. याकरिता लागणारे थिओब्रोमीन कोको फळांच्या टरफलापासून मिळते. कॅफीनविरहित कोकोच्या उत्पादनात आणि चहाच्या धंद्यात उरलेल्या चहाच्या भुकटीपासून कॅफीन काढता येते. त्याचे वनस्पतीतील प्रमाण : कॉफी १ – १⋅५%, चहा १ – ४⋅८% , कोला २.७ – ३⋅६%.

गुणधर्म : ते उकळत्या पाण्यात सहज विरघळते व थंड विद्रावापासून पाण्याचा एक रेणू असलेले लांब सुईसारखे पांढरे स्फटिक मिळतात. ते कार्बनी विद्रावकातही (विरघळविणाऱ्या द्रवातही) विरघळते व त्या विद्रावापासून निर्जल स्फटिक मिळतात. ते गंधहीन व अतिशय कडू असून हवेत फुलारते (स्फटिकातील पाणी निघून गेल्यामुळे पृष्ठभागावर किंवा पूर्णपणे चूर्णरूप होणे).

 

उपयोग : डोकेदुखीवरील औषधांतील एक घटक व मूत्रवर्धक म्हणून, मॉर्फियासारख्या मादक पदार्थांच्या परिणामावरील उतारा म्हणून व कोला पेये बनविण्यासाठी याचा उपयोग करतात.

मिठारी, भू. चिं.