कासरगोड : केरळ राज्याच्या उत्तरेकडील कननोर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व बंदर, लोकसंख्या ३४,९८४ (१९७१). हे मंगलोरच्या दक्षिणेस ४३ किमी., चंद्रगिरी नदीच्या मुखाशी वसले आहे. नदीमुखाजवळील मोठे खडक व वाळूचा दांडा यांमुळे हे बंदर फारसे सोयीचे नाही. हे मच्छीमारी केंद्र असून नारळ, आंबे, तांदूळ, हातमागाचे कापड, लाकूड व चिनी माती यांसाठी प्रसिद्ध आहे. राज्यपुनर्रचनेमध्ये कासरगोड तालुका केरळ राज्याकडे आला असून, त्यावर कर्नाटक राज्य आपला हक्क सांगत असल्याने कासरगोडला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शाह, र.रू.