कॅनरी पक्षी : फ्रिंजिलिडी पक्षिकुळातला हा एक गाणारा पक्षी आहे. या माणसाळलेल्या व पाळीव पक्ष्याच्या काही प्रमुख अवलादी व कित्येक संकरज जाती आहेत. या सगळ्या रानटी कॅनरीपासून (याचे शास्त्रीय नाव सेरिनस कॅनॅरिया आहे) उत्पन्न झालेल्या आहेत. रानटी कॅनरीचे मूलस्थान आफ्रिकेच्या वायव्येकडील अटलांटिक महासागरातील अझोर्स, मदीर व कॅनरी (कानेरी) बेटे असून तो तेथे मुबलक आढळतो. रंग पिवळसर असून त्यात करडी छटा असते मादीचा रंग हिरवट असतो. कपाळ व शरीराची खालची बाजू पिवळी असते. काही पाळीव कॅनरी पिवळ्या जर्द रंगाचे असतात. त्यांची पैदास कुत्रिम निवडीने (विशिष्ट इच्छित लक्षणे आनुवंशिकतेने पुढील पिढीत उतरावीत अशा रीतीने जनक पक्ष्यांची निवड करून) केलेली असते. लांबी १४ सेंमी. पेक्षा जास्त नसते. चोच जाड असते तिने तो बिया फोडून खातो. डोंगरावरील झुडपात मादी घरटे बांधते व त्यात चारपाच निळी अंडी घालते अंडी तीच उबविते पण नर पिल्लांना भरवतो. वीण वर्षातून तीनदा होते. रानटी कॅनरी साधारण गाणारा अाहे.
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला कॅनरी बेटांतून काही पक्षी इटलीत नेण्यात आले आणि त्यांच्या गाण्यामुळे ते लवकरच लोकप्रिय झाले. इटालियनांनी कृत्रिम निवडीच्या मार्गाने गाणे आणि रूप या बाबतींत सरस असलेल्या कॅनरीच्या बऱ्याच प्रकारांची पैदास केली व यूरोपच्या बाजारपेठेत ते लगेच खपले. सोळाव्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमधील लोकांनी हा पक्षी घरी पिंजऱ्यात बाळगण्यास सुरुवात केली. तेव्हापासून पक्षी-विक्रेत्यांनी व पक्षी पाळण्याचा छंद असणाऱ्यांनी निवड करून पुष्कळ नवीन प्रकार तयार केले. स्कॉटिश फॅन्सी लहान व आकर्षक असतो मॅंचेस्टर कॅनरी मोठ्या अकाराचा व तुरेवाला नॉर्विच फारच सुंदर असतो. जर्मनीतील हार्ट्झ पर्वतात निपज केलेले रोलर जातीचे कॅनरी गाण्यात अग्रगण्य आहेत. या पक्ष्यांना एकांतवासात ठेवून त्यांच्या कानावर कोणताही आवाज पडणार नाही याची प्रथम काळजी घेतात नंतर ध्वनिमुद्रिका किंवा ‘बर्ड ऑर्गन’ वाजवून त्यांना गाण्याचे शिक्षण देतात. लवकरच हे पक्षी गाण्यात तरबेज होतात. पिल्ले आपल्या जनकापासून गाणे शिकतात. नर उत्तम गाणारा असल्यामुळे त्याला जास्त मागणी असते.
जमदाडे, ज. वि.
“