कर्नाटक राज्य : भारतीय संघराज्यातील एक घटक राज्य. १९५६ – १९७३ म्हैसूर या नावाने प्रसिद्ध. क्षेत्रफळ १,९१,७७३ चौ. किमी. लोकसंख्या २,९२,९९,०१४ (१९७१) ११० ३०’उ. ते १८० २७’उ. व ७४० ६’ पू. ते ७८० ३ ६’पू. दक्षिणोत्तर विस्तार सु. ७५० किमी., पूर्वपश्चिम विस्तार सु. ४०० किमी. व किनारा सु. ३०० किमी. याच्या उत्तरेस महाराष्ट्र, पूर्वेस आंध्र प्रदेश, आग्नेयीस व दक्षिणेस तमिळनाडू, नैऋत्येस केरळ, पश्चिमेस अरबी समुद्र व वायव्येस गोवा राज्य आहे. भारतात क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्याही दृष्टीने आठवे राज्य असलेल्या कर्नाटकची राजधानी बंगलोर आहे.
भूवर्णन : भूवैज्ञानिक दृष्ट्या कर्नाटक प्राचीन, कठीण, स्फटिकी खडकांचा स्थिरप्रदेश असून भूकंप व भूमिपात यांची भीती जवळजवळ नाहीच. पृथ्वीचे कवच बनले त्यावेळेसच कर्नाटकचा ढालप्रदेश बनला. त्यानंतर या भागात झालेल्या अनेक भूगर्भीय घडामोडींमुळे येथे विविधता आढळते. येथील बहुतांशी भाग डेक्कन ट्रॅपचा असून धारवाड, कुर्नूल, कडप्पा, कलादगी, भीमा इ. प्रणालींचे निक्षेप येथे आढळतात. भौगोलिक दृष्ट्या राज्याचे तीन प्रमुख भाग पडतात : पश्चिमेकडील किनारपट्टी, सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश आणि पूर्वेचे विस्तीर्ण पठार. पश्चिमेकडील किनारपट्टी सखल व अरुंद (उत्तरेकडे १३–३२ किमी. तर दक्षिणेकडे ४८–६४ किमी.) असून त्यावर जांभा खडकाची लहानलहान पठारे आहेत. किनार्यावर वाळूचे दांडे व पुळणीचे पट्टे आहेत. पूर्वपश्चिम वाहणार्या नद्यांची खोरी सखल असून त्यांचा वरचा भाग सुपीक आहे. किनार्यावरील खाड्या दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर आहेत.
सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश दक्षिणोत्तर पसरलेला आहे. याची सरासरी उंची सु. ६०० — १,००० मी. आहे. घाटाच्या पायथ्याकडील भागास मलनाड असे म्हणतात. घाटाच्या पश्चिमेकडील उतार बहुतांशी खड्या चढणीचा व तुटलेल्या कड्याचा आहे. पूर्वेच्या बाजूला गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वतांच्या रांगा होत. कड्यावरून वाहणार्या अनेक पश्चिमवाहिनी नद्यांच्या मार्गांत धबधबे असून या नद्यांपैकी शरावती, काळी या नद्या विशेषतः उल्लेखनीय आहेत. सह्याद्रीच्या प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनगिरी व कुद्रेमुख प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही प्रसिद्ध गिरिस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठार किनारपट्टीशी जोडले गेले आहे.
पूर्वेचे विस्तीर्ण पठार बैलसीमे या नावाने ओळखले जाते. त्याची सरासरी उंची ४०० मी. आहे. याचा उत्तर भाग मैदानी तर दक्षिण भाग खडकाळ आहे. तथापि सर्वच भागांत अवशिष्ट पर्वतरांगा असून उत्तरेकडील मलप्रभा-घटप्रभा नद्यांजवळील डोंगर व दक्षिणेकडील नंदी डोंगर हे त्यांपैकीच होत.
नद्या : सह्याद्री पर्वताची रांग हा कर्नाटकचा मुख्य जलविभाजक भाग असल्याने, तेथून पश्चिमेकडील भागाचे जलोत्सारण अरबी समुद्रास व पूर्वेकडील भागाचे बंगालच्या उपसागरास होते. पश्चिमवाहिनी नद्या संख्येने बर्याच असल्या, तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित असून त्यांच्या पाण्याचा प्रवाह ऋतुमानाप्रमाणे पावसाळ्यात अत्यंत वेगाचा व इतर ऋतूंत संथ व आखुडलेला असतो. यांपैकी काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती या मुख्य नद्या आहेत. सह्याद्रीच्या कड्यावरून किनारपट्टीवर त्यांचे प्रवाह कोसळत असल्यामुळे, जगप्रसिद्ध गिरसप्पा अथवा जोग (२५३ मी. उंच) व इतर लहानसहान धबधब्यांनी हा प्रदेश सुशोभित झाला आहे. शरावतीवर विद्युत् उत्पादनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून त्या प्रकारचा प्रकल्प काळी नदीवर योजला आहे.
पूर्ववाहिनी नद्यांपैकी कृष्णा आणि तिच्या मुख्य उपनद्या घटप्रभा, मलप्रभा व तुंगभद्रा यांच्या पाणलोटाचा प्रदेश पठाराच्या ६०% क्षेत्रफळाचा आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विद्युत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. दुसरा प्रदेश म्हणजे दक्षिणेकडील कावेरी व तिच्या उपनद्या शिंशा, अकविती व कब्बनी (कपिला) आणि पेन्नार व पोईयार यांच्या पाणलोटाचा प्रदेश. कावेरीचे गगनचुक्की व भारचुक्की हे दोन प्रवाह ९७ मी. वरून पडून प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा बनला असून, येथे भारतातील पहिली जलविद्युत् निर्मिती झाली. कावेरी ही दक्षिणेकडील गंगा तिच्यामधील तीन प्रसिद्ध बेटे ही श्रीरंगाची वसतिस्थाने : आदिरंगा श्रीरंगपटण येथे व मध्यरंगा शिवसमुद्रम् येथे असून तिसरे श्रीरंगा तमिळनाडूत आहे.
कर्नाटकातील पूर्ववाहिनी नद्यांची खोरी विस्तीर्ण असून प्रवाहाची पात्रेही मोठी आहेत. ऋतुमानाप्रमाणे प्रवाहात फारच फरक होत असल्याने त्या नद्यांचा जलवाहतुकीस उपयोग जवळजवळ नाहीच पण जलसिंचनाकरिता अशा नद्यांवर सोयीच्या ठिकाणी बांध घालावे लागतात. जवळजवळ सर्वच मुख्य नद्यांवर असे बांध घालून कालव्याने जलसिंचन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. उत्तर कर्नाटकातील अगदी कमी पर्जन्य असलेल्या भागात डोण व बेण्णीहळ्ळा हे दोन खारे स्थानिक प्रवाह आहेत.
मृदा : कर्नाटकात ‘रेगूर’ व रेतीयुक्त ‘लाल माती’ हे मृदांचे दोन मुख्य प्रकार आढळतात. रेगूरचा विस्तार प्रामुख्याने उत्तर कर्नाटकात बेसाल्टच्या प्रदेशात आहे. रेगूरमध्ये रंगाप्रमाणे अत्यंत सुपीक काळी, भुरट्या रंगाची, मध्यम व करड्या रंगाची कनिष्ठ अशी प्रतवारी दिसून येते. कनिष्ठ प्रतीच्या मृदा ‘मुरूम’ म्हणून ओळखल्या जातात. रेगूरमधील ओलावा जास्त दिवस टिकून रहात असल्याने रब्बी पिकांना अशा मृदांच्या विभागात जास्त महत्त्व आहे. रेतीयुक्त लाल रंगाची माती प्रामुख्याने घटप्रभा-मलप्रभा नद्यांच्या जवळील अवशिष्ट डोंगरभागात व दक्षिणेस ग्रॅनाइटने व्यापलेल्या प्रदेशात आढळून येते. उत्तरेकडील मृदा जास्त लाल रंगाची व दक्षिणेकडील फिकट रंगाची आहे. पण एकूण ही मृदा रेगूरपेक्षा कमी कसाची असते. अन्य स्थानिक प्रकारच्या मृदांपैकी धारवाड खडकांवरील पिवळी शाडूची मृदा, ठिकठिकाणी दर्याखोर्यांत साचणारी गाळाची मृदा, किनारपट्टीवरील पुळणीची मृदा व जांभा दगडापासून उद्भवलेली लाल-जांभळी माती या विशेष महत्त्वाच्या आहेत. जांभा दगडावरील माती व काळ्या मातीच्या प्रदेशात, लोण चढलेली माती हे राज्यातील अगदी निकृष्ट मृदांचे प्रकार आहेत.
खनिजे : या राज्यात नाना तऱ्हेची खनिजे उपलब्ध होतात. लोहधातुकाच्या खाणी मुख्यत्वे बेल्लारी जिल्ह्यात असून चित्रदुर्ग, चिकमंगळूर आणि उत्तर कॅनरा (कानडा) ह्या भागांतही काही प्रमाणात लोहधातुक सापडते. चुनखडीच्या खडकाचे साठे मुख्यत्वे गुलबर्गा, तुमकूर व विजापूर या जिल्ह्यांत असून त्यांना सिमेंट उद्योगामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उत्पादनात ह्या खनिजाचा दुसरा क्रमांक लागतो. मँगॅनीज ह्या धातूचा तिसरा क्रमांक लागतो. बेल्लारी जिल्ह्यात, विशेषतः सांडूर भागात, मुख्य उत्पादन होते. उत्तर कानडा व शिमोगा भागांतही ह्या धातूचे उत्पादन बर्याच प्रमाणात होते. सुप्रसिद्ध कोलार खाणीतून सोन्याचे उत्पादन होते. रायचूर जिल्ह्यातही काही ठिकाणी सोने काढले जाते. क्रोमाइट उत्पादनात या राज्याचा भारतात ओरिसानंतर क्रम लागतो. ह्या धातूचे उत्पादन हसन जिल्ह्यात होते. याव्यतिरिक्त क्वॉर्टझ (शिमोगा), बॉक्साइट (बेळगाव), मॅग्नेसाइट (म्हैसूर व कूर्ग), ॲस्बेस्टस (हसन), थोड्या प्रमाणात रुपे (कोलार व रायचूर) तसेच तांबे, शिसे, चिनी माती यांचे उत्पादन होते. अर्थातच व्यापारी संदर्भात सोन्याला व औद्योगिक धंद्यात लोह, मँगॅनीज व चुनखडीचे खडक या कर्नाटकातील खनिजांना विशेष स्थान आहे. ग्रॅनाइट व बेसाल्टचा उपयोग मुख्यत्वे इमारती व रस्ते तयार करण्यास होतो. श्रवणबेळगोळची श्री गोमटेश्वराची भव्य मूर्ती, बंगलोरमध्ये अगदी अलीकडे बांधलेली विधान सौध इमारत तसेच विजयानगर, हळेबीड, बादामी अशा ऐतिहासिक व पुरातात्त्विक महत्त्वाच्या ठिकाणच्या वास्तूंत या दोन्ही खनिजांचा सुंदर उपयोग केला आहे. त्याचप्रमाणे बेलूरचे सुप्रसिद्ध चेन्नकेशव मंदिर, हे बळूच्या दगडाचा (सोपस्टोन) सुंदर कोरीव कामासाठी कसा उपयोग केला जातो, याची साक्ष देते.
हवामान : कर्नाटक राज्याचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे असले, तरी राज्याच्या दक्षिणोत्तर लांबीमुळे व स्थानिक उंचसखलतेमुळे प्रादेशिक फरक बराच आढळून येतो. उत्तर व दक्षिण कानडा जिल्ह्यांच्या किनारपट्टीच्या प्रदेशात हवामान उष्ण (सु. २४० से.) व दमट (आर्द्रता सु. ७०%) असते. सरासरी पर्जन्यमान सु. ३०० सेंमी. (उत्तर कानडा २७६ व दक्षिण कानडा ३९० सेंमी.) असते. पावसाळ्याचा काळ प्रामुख्याने जून ते ऑक्टोबर असतो. सह्याद्रीच्या शिखरप्रदेशात उंचीमुळे सरासरी उष्णतामान कमी असते. विशेषतः बाबा बुढण व अन्य शिखर प्रदेशांत तर जास्त थंडावा असतो. राज्यातील या पर्वतीय भागात पर्जन्यवृष्टी २५० सेंमी. पर्यंत असते, पण पावसाळ्याचा काळ मर्यादित असतो. या काळात ढग, धुके यांचे प्राबल्य असते. हिवाळ्यात हवा निरभ्र, थंड व आल्हादकारक असते. उन्हाळ्यातही हवा थंड, क्वचित वावटळी, मेघगर्जना व वादळे यांनी गाजलेली असते. सह्याद्रीच्या पूर्व भागापासून ते थेट राज्याच्या पूर्व सीमेपर्यंत (मैदानभागात) हवामानात प्रदेशाप्रदेशाने फरक होत जातो. हा फरक पर्जन्यवृष्टीत विशेष प्रामुख्याने जाणवतो. प्रदेश पठारी असल्याने वार्षिक तपमानाची सरासरी २०० से. इतकी असते पण उन्हाळा तीव्र (३०० ते ३२० से.) असतो. पर्जन्यमान सह्याद्रीच्या पूर्व बाजूस (शिमोगा १५० सेंमी.) घसरते व पुढे पर्जन्यछायेत ते फारच कमी होते. राज्याच्या विजापूर भागात ५० सेंमी. एवढाच पाऊस पडतो. पूर्वेच्या पट्टीत बंगालच्या उपसागरावरून येणार्या पावसामुळे वाढ होते (गुलबर्गा ७० सेंमी.).
पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो, तशी त्याची अनिश्चितता वाढते. त्यामुळे राज्यातील मध्य व ईशान्य भागांत (विजापूर, बेल्लारी, गुलबर्गा, रायचूर, तुमकूर, कोलार) नेहमी दुष्काळाची छाया पडण्याचा संभव असतो.
सर्वसाधारणतः थंड हवा, पाऊस चांगला व निश्चित स्वरूपाचा, हिवाळा आल्हादकारक आणि उन्हाळ्यात थोडी उन्हाची झळक, अशा स्वरूपाचे हवामान मलनाड प्रदेशाचे असते. बंगलोर व म्हैसूर अशा उंच प्रदेशाच्या हवामानात थंडीचा अंश जास्त असतो. दक्षिण मैदानी पठारी प्रदेशाची सरासरी उंची उत्तर मैदानापेक्षा जास्त असल्याने तेथील हवा सौम्य स्वरूपाची असते. तथापि चित्रदुर्ग, तुमकूर, कोलार वगैरे भागांत उन्हाळ्यात रखरखीतपणा जाणवतो. उत्तर मैदानात उन्हाळा प्रखर, हिवाळा थंड आणि पावसाळा सौम्य व साधारण थंड अशा स्वरूपाचा असतो. पण ईशान्येच्या भागात पावसाची अनिश्चितता, हे हवामानाचे मुख्य लक्षण आहे.
वनस्पती व प्राणी : हे राज्य रमणीय वनश्रीने बहरलेल्या पर्वतरांगा, आर्थिक दृष्ट्या उपयुक्त असलेले अनेक व समृद्ध वृक्ष गट, दांडेली, बांदिपूर, नगरहोळे अशी अभयारण्ये व प्राणिज संपत्ती यांविषयी प्रसिद्ध आहे. राज्याच्या एकंदर क्षेत्रफळापैकी सु. १८.४% भाग वनाच्छादित आहे. त्यात सह्याद्रीतील पावसाळी सदाहरित अरण्ये, त्यालगतच्या दोन्ही बाजूंस असलेली मोसमी पानझडी अरण्ये आणि मध्य व पूर्व भागी डोंगराळ प्रदेशातील गवताळ चराऊ राने, असे मुख्य भाग दिसतात. खडकाळ प्रदेशात खुरटी व काटेरी वनस्पती, पावसाळी भागात कळकाची बेटे, पूर्व मैदानी प्रदेशांत नद्यांकाठी बाभळीची बने आणि समुद्र किनारा व खाड्या येथे सुंद्रीची बने, अशी स्थानिक विविधता आढळते.
येल्लापूर, शिमोगा, बाबा बुढण व कूर्ग या परिसरात वनश्री विशेष विविधतेची आहे. आर्थिक दृष्ट्या सागवान व चंदन हे येथील विशेष महत्त्वाचे वृक्ष आहेत. होन्ने (बिबळा) व इतर जातीच्या वृक्षांनाही पेठेत वाढती मागणी असते. बांबू व सिमूळ या प्रकारच्या मऊ लाकूड असणार्या वृक्षांपासून कागद (दांडेली) व पुठ्ठे तयार करण्याचे कारखाने उभारलेले आहेत. रेशमासाठी प्रसिद्ध असलेल्या मलबेरी झाडांचा भारतातील ८० टक्के भाग कर्नाटकात आहे. शिवाय अनेक वृक्ष व वनस्पतींचा औषधी, सुगंधी तेले व उदबत्ती कारखान्यांना लागणारा कच्चा माल, यांकरिता उपयोग होतो. ऐन, धावडा, आंबा, सुरू, निलगिरी, शिसवी, रोजवुड इ. काही उपयुक्त वृक्षही राज्यात आढळतात.
कर्नाटक राज्याची प्राणिसंपत्तीही नामांकित आहे. अनेक रानटी पशुपक्ष्यांत हत्ती, गवे, रेडे, पट्ट्याचे वाघ, तरस, अस्वले, मोर, सांबर, चित्ते, लांडगे व निरनिराळ्या प्रकारची हरिणे मुख्यत्वे आढळतात. सरीसृपांचे विविध प्रकार आहेत. समुद्रात व नद्यांमध्ये विपुल मत्स्यसंपत्ती असून पक्षीही विविध प्रकारचे आहेत.
देशपांडे, चं. धुं.
इतिहास : मस्की व ब्रह्मगिरी येथे झालेल्या उत्खननांत नवाश्मयुगीन अवजारे व हस्तनिर्मित वस्तू सापडल्या आहेत. त्या १४ कार्बनप्रसिद्धीप्रमाणे इ. स. पू. सु. ३००० च्याही पूर्वीच्या असाव्यात, असा तज्ञांचा कयास आहे. प्राचीन काळात महिषिक नामक जमातीची वस्ती या प्रदेशात असावी, असे काही इतिहासकार म्हणतात. पुराणांतही महिषांच्या प्रदेशाचा उल्लेख आहे. कदंबवंशीय राजा पहिला विष्णुवर्मा (पाचव्या शतकाची अखेर) याचा शिलालेख तुमकूर तालुक्यात आहे त्यात महिषविषय अशा शासन विभागाचा उल्लेख आहे. कुप्पेदहालूच्या शिलालेखात (९९०) मैसूर नाडु (नाडु=प्रदेश) असा शब्द प्रथमच आला आहे. महिष ऊर (ऊर=गाव) असा शब्दाचा विग्रह आहे. महिषासुरमर्दिनी म्हैसूरच्या वोडेयर राजघराण्याची कुलदेवता होती.
याचा एक प्राचीन विशेष म्हणजे या प्रदेशात रणांगणात मेलेले वीर आणि सती गेलेल्या स्त्रिया यांच्या शिळांची स्मारके, म्हणजे मास्तीकल व वीरगळ लेखांसहित भरपूर प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.
मौर्यकाळापासून कर्नाटकाचा इतिहास निश्चित करता येतो. चंद्रगुप्त मौर्याने त्याचे अखेरचे आयुष्य श्रवणबेळगोळ येथे घालविले असावे, अशी जैन परंपरा सांगते. तिला येथील बस्ती, हरिषेणाचा बृहत्कथाकोश यांतून काहीशी पुष्टी मिळते. सिद्धपूर व मस्की येथे अशोकाचे प्रस्तरलेख आढळतात, त्यांवरून हा प्रदेश त्याच्या साम्राज्यात मोडत असावा. मौर्यांच्या अस्तानंतर दुसर्या शतकाच्या अखेरीपर्यंत या प्रदेशात सातवाहनांचे (इ. स. पू. २०० — इ. स. ३००) राज्य होते. चंद्रावळ्ळी येथे त्यांच्या जुन्या शहरांचे अवशेष, नाणी वगैरे आढळली. तिसर्या ते आठव्या शतकांपर्यंत पश्चिम भागात कदंब (३०० — ५००) आणि मध्य व दक्षिण कर्नाटकात गंग (३५० — ९९९) राजांची सत्ता होती. कदंबांची राजधानी बनवासी येथे, तर गंगांची तळकाड येथे होती. दोघांनाही वर्चस्व टिकविण्यासाठी पल्लवांशी युद्धे करावी लागली. गंग वंशातील दुर्विनीत, श्रीपुरुष, राचमल्ल, शिवमार वगैरे राजे प्रसिद्ध पावले. त्यांतील दुर्विनीत व शिवमार हे चांगले योद्धे असून विद्वानही होते. सहाव्या शतकातच कर्नाटकच्या वायव्य भागात चालुक्यांनी (५०० — ७५७) प्रभुत्व प्रस्थापिले आणि सातव्या शतकात कदंबांना जिंकले. तथापि कदंबांच्या छोट्या शाखा विजयानगराच्या उदयापर्यंत मूळ धरून राहिल्या. चालुक्यवंशीय पहिल्या पुलकेशीने बादामीला राजधानी केली. त्या वंशातील प्रतापी राजा दुसरा पुलकेशी (५९७ — ६४२) ह्याच्या वैभवाचे चिनी प्रवासी ह्युएनत्संगने वर्णन केले आहे. चालुक्य काळातच कन्नड भाषेचा राज्यव्यवहारात उपयोग होऊ लागला. दंतिदुर्ग राष्ट्रकूटाने (७४२ — ७५५) बादामी जिंकल्यावर राष्ट्रकूटांचे (७५७ — ९७३) या प्रदेशावर प्रभुत्व स्थापन झाले, ते दहाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत होते. याच काळात गंग वंशाचेही पुनरुज्जीवन झाले. त्यांचा प्रधानचा मुंडराय याने श्रवणबेळगोळला गोमटेश्वराचा प्रचंड पुतळा उभारला (९८३). राष्ट्रकूटांपैकी तिसरा गोविंद (७९३ — ८१४) याने राज्यविस्तार केला.
त्याचा पुत्र अमोघवर्ष हा पांडित्य व विद्वानांना आश्रय यांमुळे प्रसिद्धी पावला. राष्ट्रकूटांना आपले वर्चस्व टिकविण्यासाठी चोलांशी युद्धे करावी लागली, पण कल्याणीच्या चालुक्यांपुढे त्यांचा निभाव लागला नाही, त्यांचे ते मांडलिक बनले. दहाव्या शतकाच्या अखेरीपासून ते बाराव्या शतकाच्या मध्यापर्यंत, पश्चिमेच्या चालुक्य वंशाने या प्रदेशावर राज्य केले. सहावा विक्रमादित्य हा त्यांतला सर्वश्रेष्ठ राजा. उत्तम योद्धा, शासक आणि विद्याकलांना उत्तेजन देणारा म्हणून त्याची ख्याती आहे. ऐहोळे, पट्टदकल आणि बादामी येथे चालुक्य शिल्पांचे वैभव अजमावता येते. शिल्पांप्रमाणेच कन्नड भाषा व वाङ्मय या दृष्टीने चालुक्य-राष्ट्रकूट काळात कर्नाटकाचा विकास झाला. आठव्या-नवव्या शतकांत शंकराचार्यांनी शृंगेरीला मठ स्थापून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. चालुक्यांच्या पडत्या काळात कलचुरी वंश (११५६—११८३) प्रबळ झाला. त्यातील बिज्जलाचा मुख्य मंत्री बसवेश्वर याने वीरशैव किंवा लिंगायत पंथ स्थापला. त्याचा पुढे कर्नाटकभर प्रसार झाला. अकराव्या शतकाच्या सुरुवातीस चालुक्यांचे मांडलिक होयसळ (१००६ — १३४५) प्रबळ झाले. विनयादित्य हा त्या वंशाचा संस्थापक. या घराण्यातील बिट्टिदेव (११०४ — ११४१) याने द्वारसमुद्र (हळेबीड) शहर वसविले व राज्यविस्तार केला. तो जैनधर्मी होता, पण पुढे आश्रयाला आलेल्या रामानुजाचार्यांचा अनुयायी बनला. त्यामुळे पुढे कर्नाटकात विशिष्टाद्वैतमताचा प्रसार झाला. होयसळ राजांनी अनेक मंदिरे बांधली त्यांतील हळेबीड, बेलूर, सोमनाथपूर येथील मंदिरांत वास्तुशिल्पकलेचा आविष्कार दिसतो. या वंशातील वीरबल्लाळाच्या पराक्रमामुळे बल्लाळ हे होयसळांचे दुसरे नाव झाले. कर्नाटकच्या उत्तर सीमेवर त्यांची देवगिरीच्या यादवांशी युद्धे चालू होतीच. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस होयसळांना उतरती कळा लागली. अलाउद्दीन खल्जीने देवगिरी जिंकली, तर त्याचा सेनापती मलिक काफूर याने १३११ मध्ये आणि नंतर महंमद तुघलकाने द्वारसमुद्रावर स्वारी करून राजधानीचा नाश केला (१३२६ — २७).
इस्लामच्या या दक्षिणेतील आक्रमणाला विजयानगरच्या (१३३६ — १५६५) साम्राज्याने पायबंद घातला. विद्यारण्य म्हणजे माधवाचार्य, यांच्या प्रेरणेने हरिहर आणि बुक्क यांनी या साम्राज्याचा पाया घातला. प्रथम संगम, नंतर साळुव आणि तुळुव वंशांच्या राजांनी साम्राज्याचे वैभव वाढविले. संगम वंशातला बुक्क, साळुव वंशातला देवराय आणि तुळुव वंशातला कृष्णदेवराय हे साम्राज्यविस्ताराबद्दल विशेष प्रसिद्ध पावले. कृष्णदेवरायाची कारकीर्द (१५०९ — १५२९) तर सर्वच दृष्टीने विजयानगराच्या इतिहासात सुवर्णयुग मानली जाते. त्याचे परदेशी प्रवासी व राजदूत यांनी रसभरीत वर्णन केले आहे. याच काळात वैष्णवपंथाचा अधिक प्रसार झाला. कृष्णदेवरायानंतरचे राजे त्याची परंपरा राखू शकले नाहीत. चौदाव्या शतकाच्या मध्यास दक्षिणेत उदयाला आलेल्या बहमनी सत्तेशी विजयानगराला सतत सामना द्यावा लागला. बहमनी राज्याची पुढे पाच छकले झाली, पण तालिकोटाच्या लढाईत (१५६५) पाचही शाह्यांनी विजयानगराचा पराभव केला. त्यानंतरच्या आरवीडु वंशीय राजांनी प्रथम धेनुकोंडा, नंतर चंद्रगिरी व शेवटी अनेगुंदीहून कसेबसे राज्य केले, ते १७७६ मध्ये नामशेष झाले.
विजयानगरच्या अपकर्षकाळात त्या साम्राज्याचे ठिकठिकाणचे मांडलिक स्वतंत्र झाले. त्यांना पाळेगार अशी संज्ञा आहे. त्यांपैकी कूर्गचे चांगलव व हालेरी वंश, केळादी (इक्केरी) व चित्रदुर्ग आणि बिदनूरचे नायक, बळ्ळापूर आणि सुगदूरचे गौड इत्यादींनी स्वतंत्र संस्थाने वाढीला लावली. विशेषतः केळादीच्या वेंकटप्पा व शिवप्पा या नायकांनी कर्तबगारी दाखविली आणि शृंगेरीच्या शंकराचार्यांच्या मठाला देणग्या दिल्या. आरवीडु वंशाच्या राजांना साहाय्य केले. तथापि कन्नड संस्कृतीचे जतन करणारे म्हणून म्हैसूरचे वोडेयर घराणे प्रसिद्धीला आले. त्याचे संस्थापक यदुराज व कृष्णराज हे यादव कुलातील दोन बंधू उत्तरेतून आले असावेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने नंजनगुडजवळचे संस्थान मिळवले. मांडलिक असलेले हे संस्थान विजयानगराच्या र्हासकाळी जवळजवळ स्वतंत्र बनले. या वंशातील बेट्टद चामराजाने संस्थानची राजधानी सध्याच्या म्हैसूरजवळ हलवली (१५१३). राज वोडेयरने दसर्याचा उत्सव सुरू केला. निजामशाही नष्ट झाल्यावर (१६३६) विजापूरच्या आदिलशाहीने दक्षिणेकडे मोर्चा वळवला आणि सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत कर्नाटकातील बहुतेक लहानमोठे संस्थानिक आदिलशाहीचे मांडलिक बनले. केलेल्या कामगिरीबद्दल शहाजीराजे भोसल्यांना आदिलशाहीचे सरदार म्हणून बंगलोरची जहागीर मिळाली. शिवछत्रपती जेव्हा दक्षिण दिग्विजयाला गेले, तेव्हा त्यांनीही ठिकठिकाणी खंडणी वसूल केली. त्यांच्या मृत्यूनंतर मोगल फौजा दक्षिणेत प्रचंड संख्येने उतरल्या. आदिलशाही खालसा केल्यामुळे (१६८७) कर्नाटकाचा बराचसा प्रदेश मोगल वर्चस्वाखाली आला. मराठ्यांच्या मदतीने बर्याच पाळेगारांनी मोगल सत्तेला तोंड दिले पण त्यांचे प्राबल्य जाणून चिक्कदेवराज वोडेयरने (१६७३ — १७०४) औरंगजेबाशी मैत्री केली, ‘जयदेवराज’ असा किताब मिळवला व बंगलोर तीन लाख रुपयांना विकत घेतले. मोगलांशी संघर्ष टाळून करता येईल तेवढा राज्यविस्तार त्यानेही केला. मंत्री तिरुमलराय याच्या साहाय्याने चांगला राज्यकारभार केला. त्याच्यानंतर गादीवर आलेले राजे दुर्बल निघाले त्यामुळे सर्व सत्ता मंत्र्यांच्या हाती गेली. त्यांना दळवाई असे म्हणत. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत दक्षिणेतले कडप्पा, कुर्नूल, सावनूर, शिरे आदींच्या नबाबांनी आणि पेशव्यांच्या वाढत्या सत्तेने म्हैसूरकडून अनेकदा खंडणी वसूल केली. प्रथम रघूजी भोसले आणि नंतर नानासाहेब पेशवे यांनी श्रीरंगपटणपर्यंत मोहिमा केल्या. उत्तर कर्नाटकात पेशव्यांच्या सरदारांनी जहागिरी मिळवल्या, तर याच सुमारास उदयास आलेल्या हैदराबादच्या निजामाने म्हैसूरचा वायव्य भाग गिळंकृत केला.
हैदर अलीचा उदय १७५० च्या सुमारास झाला. हैदर म्हैसूरच्या फौजेतील निरक्षर नाईक पण रणचातुर्याने आणि चौथाई कबूल करून मराठी फौजांना परतवल्यामुळे त्याला खूपच महत्त्व आले. त्याने राज्यसूत्रे बळकावली, बिदनूर आणि मलबार जिंकले, दक्षिणेत मदुराईपर्यंत आणि उत्तरेत तुंगभद्रेपर्यंत पाळेगारांना जिंकून राज्य वाढवले. या राज्यविस्तारात त्याला फ्रेंचांची मदत झाली. मद्रासचे इंग्रज, हैदराबादचा निजाम आणि पुण्याचे पेशवे या सर्वांशी त्याला युद्धे करावी लागली. थोरल्या माधवरावाने त्याचा पराभव केला. त्याचे इंग्रजांशी युद्ध चालू असतानाच तो वारला (१७८२). त्याचा मुलगा टिपू याने युद्ध चालू ठेवले पण अखेर इंग्रजांना तह करावा लागला (१७८४). त्याने राज्यव्यवस्था बदलली, व्यापारवृद्धीने प्रयत्न केले. वाढत्या ब्रिटिश सत्तेला पायबंद घालण्यासाठी फ्रान्स, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, इराण इ. देशांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. लॉर्ड कॉर्नवॉलिसने मराठ्यांच्या मदतीने त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा प्रदेश निम्म्यावर आणला. (१७८९-९२). त्यात निजामानेही मदत केली. अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडचे फ्रान्सशी युद्ध चालू होते. त्यात टिपू फ्रेंचांना मदत करतो, या सबबीवर लॉर्ड वेलस्लीने जनरल हॅरिसला पाठवले. हॅरिसने टिपूची राजधानी श्रीरंगपटण जिंकली, टिपू युद्धात मरण पावला (१७९९).
युद्धोत्तर म्हैसूर संस्थानचा काही भाग निजामाला बक्षिसादाखल मिळाला आणि काही ईस्ट इंडिया कंपनीने खालसा केला. उरलेल्या संस्थानच्या गादीवर वोडेयर घराण्यातील कृष्णराज या पाच वर्षाच्या मुलास बसवण्यात आले आणि पूर्वीच्या दिवाणाच्या ताब्यात कारभार सुपूर्त केला. राजा वयात आल्यावर स्वतः कारभार पाहू लागला. बंडाळ्या होतात आणि राजा गैरकारभार करतो, या सबबीवर त्याला पदच्युत करून लॉर्ड बेंटिंगने सर मार्क कब्बन याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश आयुक्त कारभारासाठी नेमला (१८३१). पुढील तीस वर्षे कब्बन याने म्हैसूरचे आधुनिकीकरण केले. पदच्युत राजा मरण पावला होता, पण त्याने घेतलेल्या दत्तकाला मान्यता मिळाली. इंग्रज सरकारने नवीन तह करून, बंगलोर शहर सोडून बाकीचे म्हैसूर, मांडलिक संस्थान या नात्याने वोडेयरांच्या ताब्यात दिले (१८८१). कृष्णराज वोडेयर (१९०२— १९४०) याच्या अमदानीत सी. रंगचार्लू, के. शेषाद्री आय्यर, एम्. विश्वेश्वरय्या, मिर्झा मुहंमद इस्माईल वगैरे कर्तबगार दिवाणांच्या साहाय्याने संस्थानाची सर्वांगीण भरभराट झाली आणि म्हैसूर हे एक प्रगतिशील संस्थान बनले. १९०७ मध्येच संस्थानात विधिमंडळ स्थापन झाले आणि १९२३ मध्ये विधिमंडळाला अधिक विस्तृत अधिकार मिळाले. १९४० मध्ये जयचामराज वोडेयर गादीवर आले त्यांनी १९४७ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन व्हायला मान्यता दिली आणि म्हैसूर संस्थानाला ‘ब’ राज्याचा दर्जा देण्यात आला. महाराज राज्यप्रमुख झाले [→ म्हैसूर संस्थान].
म्हैसूर संस्थानाव्यतिरिक्त इतर प्रदेशांवर ब्रिटिशांचे वर्चस्व स्थापन झाले, तरी त्यांना प्रतिकारालाही तोंड द्यावे लागले. श्रीरंगपटणाच्या तुरुंगातूम सुटलेल्या धोंड्या वाघ नावाच्या एका महत्त्वाकांक्षी माणसाने सैन्यातून कमी झालेले लोक गोळा करून उत्तर म्हैसूरमध्ये वर्षभर बराच धुमाकूळ घातला. तो स्वतःला स्वतंत्र राजा म्हणवून घेत असे. आर्थर वेलस्लीने त्याचा पाठलाग करून पराभव केला (१८००). १८२४ मध्ये दत्तकविधान रद्द ठरवून कंपनीने कित्तूर संस्थान (बेळगाव जिल्हा) खालसा केले. तेव्हा राणी चेन्नम्मा, संगोळी रायण्णा इत्यादींनी सशस्त्र प्रतिकाराचा प्रयत्न केला. चिक्कवीर राजाला नालायक ठरवून कोडगू संस्थान खालसा करण्यात आले (१८३४) तेव्हाही सशस्त्र उठाव झाला. कोप्पळ (१८१९), बीदर (१८२७), बादामी (१८४१) येथे ब्रिटिश सत्तेला विरोध झाला. १८५७ च्या उठावात म्हैसूर संस्थान तटस्थ राहिले, परंतु नरगुंदीचे संस्थानिक बाबासाहेब भावे, मुंडरगीचा (धारवाड जिल्हा) भीमराव यांनी त्यात भाग घेतला, हलगळ्ळी (विजापूर जिल्हा) येथील बेरडांनी निशस्त्र होण्यास विरोध केला. सुरापूर (गुलबर्गा जिल्हा) येथील उठावामुळे इंग्रजांनी तटस्थ राहून मदत करणार्या निजामाला ते संस्थान बहाल केले (१८६०).
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामधील भारतीय प्रबोधनाचा कर्नाटकावरही परिणाम झाला. प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या, विवेकानंदांना म्हैसूरच्या महाराजांनी मदत केली, तथापि राजकीय जागृती झाली, ती विसाव्या शतकाच्या सुरुवातीस. उत्तर कर्नाटकातील कर्नाटक विद्यावर्धन संघासारख्या शिक्षणसंस्था, लिंगायतांचे मठ, अनेक वृत्तपत्रे यांतून या जागृतीला सुरुवात झाली. १९०५ – ०६ मध्ये लो. टिळकांनी केलेल्या उत्तर कर्नाटकाच्या दौर्यामुळे स्वातंत्र्याची भावना तीव्र व्हायला मदत झाली. १९२० मध्ये पहिली कर्नाटक राजकीय परिषद भरली. १९२३ मध्ये डॉ. ना. स. हर्डीकरांनी सेवादलाची उभारणी केली. १९२४ च्या बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनाने राजकीय जागृतीला भरती आली. काँगेसप्रणीत सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह यांसारख्या चळवळींतून उत्तर कर्नाटकातील बेल्लारी, मंगलोर, कोडगू जिल्ह्यांनी भाग घेतला. दक्षिण म्हैसूरवर मद्रासच्या राजकारणाचा जास्त प्रभाव असे. १९३० पासून ब्राह्मणेतरांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बेझंटबाईंची थिऑसफी आणि १९३५ मध्ये कमलादेवी चट्टोपाध्यायांनी केलेल्या दौर्यामुळे समाजवादी कल्पनांचा प्रसार झाला. रामदुर्ग संस्थानातील अत्याचारांमुळे मोठाच क्षोभ झाला (१९३९). अनेक छोट्या संस्थानांतून प्रजापरिषदांची स्थापना झाली. म्हैसूर संस्थान प्रगत असले, तरी तेथेही संपूर्णतया प्रातिनिधिक विधिमंडळ असावे, या मागणीला जोर आला. तेथील स्टेट काँग्रेसच्या प्रचारामुळे विलीनीकरण सुलभ झाले. हैदराबाद-कर्नाटकातील जागृतीचे उद्गाते स्वामी रामानंदतीर्थ होत. म्हैसूर राज्याच्या स्वातंत्र्यलढ्यात मैलार, महादेवप्पा, आलूर वेंकटराव, गंगाधरराव देशपांडे, हर्डेवार मंजप्पा, हणमंतराव कौजलगी, रंगराव दिवाकर हे प्रमुख होत.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखालील सर्व कन्नड भाषीय प्रदेश एकत्र आणावे, अशी सूचना सर टॉमस मन्रो याने १८२६ मध्येच केली होती. ही भाषिक राज्याची भावना विसाव्या शतकाच्या सुरुवातीस रुजू लागली. कन्नड साहित्य परिषदेचे पहिले अधिवेशन (बंगलोर, १९१५), कर्नाटक सभेची स्थापना (धारवाड, १९१६), पहिली कर्नाटक एकीकरण परिषद (बेळगाव, १९२४) हे संयुक्त कर्नाटकाच्या चळवळीतील महत्त्वाचे टप्पे होत. १९१८ पासूनच काँग्रेसकडे निवेदने पाठवावयाला सुरुवात झाली. त्यानुसार १९२१ मध्ये कर्नाटक प्रदेश काँग्रेसला संस्थानी मुलखातील कन्नड भाषिकांत कार्य करण्याचे अधिकार मिळाले. काँग्रेसची मोतीलाल नेहरू समिती आणि सायमन आयोग यांच्यापुढेही संयुक्त कर्नाटकाची मागणी ठेवण्यात आली. १९३६ मध्ये विजयानगर साम्राज्यस्थापनेची सहावी शताब्दी मोठ्या प्रमाणात साजरी झाली, तेव्हा कन्नड भाषिकांना सांस्कृतिक अस्मितेची तीव्र जाणीव झाली. कर्नाटक एकीकरण परिषदेच्या मुंबई अधिवेशनात (१९४६) सरदार पटेलांनी मागणी मान्य केली. स्वातंत्र्योत्तर आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली (१९५३), तेव्हा बेल्लारी हा मद्रास राज्यातील जिल्हा म्हैसूर राज्याला जोडण्यात आला. संयुक्त कर्नाटकाच्या चळवळीचा जोर वाढतच होता. अखेर राज्यपुनर्रचना समितीच्या शिफारशीनुसार १ ऑक्टोबर १९५६ ला म्हैसूर हे ब भाग राज्य मुंबई राज्यातील धारवाड, बेळगाव, विजापूर व उत्तर कॅनरा, मद्रास राज्यातील दक्षिण कॅनरा व कोल्लेगळ तालुका आणि आंध्र प्रदेशातील गुलबर्गा, रायचूर, बीदर हे जिल्हे व कूर्ग हे मुख्यायुक्त शासित क भाग राज्य, या सर्व कन्नड भाषिकांचे सध्याचे कर्नाटक राज्य अस्तित्वात आले. परंतु सीमेतील बदल कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांची मागणी पुरी करू शकले नाहीत. केरळ राज्याच्या कासरगोड तालुक्यावर कर्नाटक हक्क सांगत आहे, तर कर्नाटक राज्याची उत्तर सीमा महाराष्ट्राला बदलून हवी आहे. अनेक वाटाघाटी आणि न्या. महाजन यांचा अहवाल (१९६७) यांतूनही सीमेचा प्रश्न अद्यापि समाधानकारक रीत्या सुटलेला नाही.
राज्यव्यवस्था : कर्नाटकमध्ये १९५६ च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार सभोवतालच्या पाच राज्यांतील कन्नड भाषिक प्रदेशांचा समावेश करण्यात आला. त्यांत कूर्ग, विजापूर, कॅनरा, धारवाड, बेळगाव, गुलबर्गा, रायचूर, बीदर वगैरेंचा समावेश करण्यात आला. पूर्वीचे म्हैसूर राज्य हे नाव बदलून १ नोव्हेंबर १९७३ मध्ये ‘कर्नाटक’असे नामाभिधान करण्यात आले.
भारतीय संघराज्याचे कर्नाटक हे घटक राज्य आहे. राष्ट्रपतींनी नेमलेल्या राज्यपालाच्या संमतीनुसार मंत्रिमंडळाच्या साहाय्याने मुख्यमंत्री राज्यकारभार पाहतात. मंत्रिमंडळ विधिमंडळाला जबाबदार असते. विधिमंडळ द्विसदनी असून विधानसभेचे २१७ व विधारपरिषदेचे ६३ सदस्य आहेत. राज्यातून लोकसभेवर २७ व राज्यसभेवर १२ सदस्य निवडले जातात. आतापर्यंत सर्व निवडणुकांत काँग्रेसलाच बहुमत होते परंतु १९६९ च्या काँग्रेस पक्षातील दुफळीनंतर काही दिवस संघटना काँग्रेसची सत्ता होती. मात्र १९७२ मधील विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा नवकाँग्रेसची सत्ता दृढमूल झाली. सध्या नव काँग्रेस १६५, संघटना काँग्रेस २४, कम्युनिस्ट ३, समाजवादी ३, अपक्ष १४ व इतर पक्ष ७ असे भिन्न पक्षांचे बलाबल आहे. कन्नड ‘चलवलिगार’ व ‘होहेग’ हे दोन प्रादेशिक पक्ष मध्यावधी निवडणुकीच्या सुमारास निर्माण झाले. मोहनलाल सुखाडिया हे सध्या राज्यपाल असून देवराज अरस हे मुख्यमंत्री आहेत (१९७४).
प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे बंगलोर, म्हैसूर, बेळगाव आणि गुलबर्गा असे चार विभाग केले असून एकूण १९ जिल्हे व १७४ तालुके आहेत. अलीकडे राज्याने त्रिसुत्री पंचायत पद्धतीचा स्वीकार केला असून ८,२१५ पंचायत समित्या आणि १७४ तालुका समित्या आहेत व जमीन महसुलाची वसुली पूर्णतः त्यांच्यावर सोपविली आहे. तालुकापातळीपर्यंत प्रशासनाची भाषा कन्नड आहे. जिल्हा विकास मंडळ, तालुका विकास समिती आणि पंचायती या संस्थांबाबत जिल्हाधिकार्याला बरेच शासकीय अधिकार आहेत. बहुतेक खेड्यांतून कृषिविकासासाठी सहकारी संस्था आहेत. रस्ते, बंदरे, पाणीपुरवठा, विद्युत् निर्मिती, औद्योगिकीकरण वगैरे बाबतींत राज्यात प्रगती झाली आहे. अनुसूचित जातीजमातींच्या कल्याणाकडे विशेष लक्ष दिले जाते. बंगलोर या राजधानीत उच्च न्यायालय आहे.
कुलकर्णी, ना.ह.
आर्थिक स्थिती : कर्नाटक हे कृषिप्रधान राज्य समजले जाते. १९६९ साली एकूण १,९१,७७,००० हे. भौगोलिक क्षेत्रापैकी ५३% भाग शेतीखाली असून त्यांपैकी १३.७% जमीन ओलिताखाली होती. याशिवाय शेतीयोग्य पण पडीक ३.३%, पडीक ४.५%, चराऊ ८.६% व बागांखाली १.६% जमीन होती. जलसिंचनात दक्षिण मैदानात तळी, तर उत्तर मैदानात विहिरी असा भौगोलिक फरक आढळून येतो. आता बर्याच ठिकाणी नद्यांवर धरणे बांधली गेली असल्याने, कालव्यांनी जलसिंचन विस्तीर्ण प्रमाणात केले जात आहे. कावेरी, तुंगभद्रा, मलप्रभा, घटप्रभा या नद्यांवरील प्रकल्पांमुळे मध्य व पूर्व कर्नाटकातील दुष्काळी भागांत कोरडवाहू जमीन राज्याच्या कृषिजमिनीपैकी जवळजवळ ६७% असल्याने, त्या प्रदेशात जिरायत शेती कशी बळकट करावी, ही समस्या महाराष्ट्राइतकीच कर्नाटकापुढे आहे.
खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके घेतली जातात. ज्वारी, भात, रागी, बाजरी, गहू व कडधान्ये ही राज्यातील मुख्य अन्नधान्याची पिके आहेत. नगदी पिकांत ऊस, कापूस, तेलबिया, तंबाखू, मिरची, सुपारी, नारळ, कॉफी, काजू, वेलदोडे, मिरे व द्राक्ष-मोसंबी ही मुख्य पिके आहेत. १९६९ मध्ये एकूण शेतीखाली असलेल्या क्षेत्रात अन्नधान्यांचे व इतर पिकांचे प्रमाण ८१.६८% : १९.३२% होते. १९७१–७२ साली अन्नधान्यांचे उत्पादन ६०.६५ लाख टन, साखरेचे ८७.७६ लाख टन, तेलबियांचे ७.०१ लाख टन व कापसाचे ५.६९ लाख गासड्या इतके होते.
कापूस, बाजरी आणि कडधान्यांच्या उत्पादनाविषयी उत्तर मैदान प्रसिद्ध आहे. दक्षिण मैदानात भात हे मुख्य पीक असून त्याखालोखाल रागीचे पीक महत्त्वाचे आहे. डोंगराळ भागात काही ठिकाणी ‘कुमरी’ (स्थलांतरित शेती) रूढ आहे. काही पिकांसाठी विशिष्ट भाग प्रसिद्ध आहेत : निपाणी-चिकोडीचा तंबाखू संकेश्वर-ब्याडगीची मिरची मलनाडातील नारळ सह्याद्री पट्ट्यातील सुपारी, वेलदोडे, मिरी व बाबा बुढण प्रदेशाची कॉफी यांना भारतात व परदेशांत चांगली मागणी असते.
अमृतमहाल, खिलारी अशा काही बैलांच्या जातींविषयी कर्नाटक प्रसिद्ध आहे. दक्षिण मैदानातील जिल्ह्यांत गाई-बैलांची संख्या विशेष आढळून येते. १९६६ च्या आकड्यांनुसार राज्यामध्ये गाई-बैल ९६,८५,५८१ म्हशी व रेडे २९,४५,९९७ घोडे ६४,८७४ गाढवे ४८,६५७ मेंढ्या ४७,४७,९६४ व शेळ्या २७,८३,६८२ अशी मुख्य पशुसंपत्ती होती. यांशिवाय वराह, कोंबड्या व बदके मोठ्या संख्येने पाळली जात असून त्यांची शासकीय प्रोत्साहनामुळे पद्धतशीर वाढ होऊ लागली आहे. जनावरांच्या पैदाशीतही गुणवत्तेवर भर दिला गेला असून संकरित जाती जास्त उपयुक्त ठरल्या आहेत.
मत्स्योत्पादन व्यवसायात राज्यातील सु. १,११,००० लोक गुंतलेले असून, सागरी व अंतर्देशीय मत्स्योत्पादनाचे प्रमाण १००:६० आहे. अर्थात सागरी उत्पादन उत्तर व दक्षिण कानडा जिल्ह्यांचे असून अंतर्देशीय उत्पादन किनारपट्टीतील आणि सह्याद्रीच्या परिसरातील तळ्यांच्या प्रदेशात विशेष आहे. १९६७–७० साली सागरी उत्पादन ५२,५८७ टन व किंमतीने १०.२ कोटी रुपये इतके होते.
विद्युत् उत्पादन : विद्युत् उत्पादनात कर्नाटक भारतात एक प्रमुख राज्य गणले जाते. हे उत्पादन जवळजवळ संपूर्णतया जलशक्तीवर आधारलेले असून शिवसमुद्रम्, शरावती व तुंगभद्रा या प्रकल्पांतून मुख्यतः होते. काळी नदी, घटप्रभा व अन्य नद्यांवरही विद्युत् उत्पादन केंद्रे निर्माण होत आहेत. १९७३ साली ९४७ मे. वॉ. वीज उत्पादनक्षमता होती व १४,९२२ खेड्यांपर्यंत वीज पोहोचली होती. शिवाय १.७ लक्ष नलिकाकूपांस वीज पुरविली गेली. कर्नाटकातील विजेचे उत्पादन तेथील जरूरीपेक्षा जास्त होत असल्याने हे राज्य जवळच्या राज्यांना विजेचा पुरवठा करू शकते.
उद्योगधंदे : स्वातंत्र्यापूर्वीही म्हैसूर संस्थान हा औद्योगिकीकरणाबाबत भारतात पुढारलेला भाग समजला जात असे. स्वातंत्र्योत्तर काळात ती परंपरा जास्त बळकट होऊन तिचा फायदा राज्याला मिळू लागला आहे. विद्युत्शक्तीचे उत्पादन कर्नाटकातील औद्योगिक प्रगतीचा मुख्य आधार आहे. १९५६ मध्ये राज्यात १,६३५ कारखाने होते, १९७० मध्ये त्यांची संख्या ३,५०० झाली. छोटे उद्योगधंदे १९६१ मध्ये १,२६१ होते, ते १९७० मध्ये ५,००० झाले व त्यांत सु. एक लाख लोकांस काम मिळाले. साहाय्यक उद्योगांची संख्या १९६१ मध्ये ५० होती, ती १९७० मध्ये ४०० च्या वर गेली. शासनाने राज्यात अनेक औद्योगिक वसाहती स्थापन केल्या असून, उद्योगधंद्यांस उत्तेजन दिले जात आहे. उद्योगधंद्यांमध्ये कापूस पिंजणार्या व गासड्या तयार करून सूत व कापड तयार करणार्या गिरण्यांचा पहिला क्रमांक लागतो. या गिरण्या कापूस उत्पादन करणार्या प्रदेशात प्रामुख्याने आढळून येतात. दावणगेरे, बंगलोर, हुबळी व गोकाक ही मोठ्या गिरण्यांची केंद्रे आहेत. रेशमाच्या उत्पादनात राज्य अग्रेसर असून, चन्नपटण हे तलम रेशमी कापड व साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मँगॅनीज, लोखंड, बॉक्साइट, सोने व अन्य खनिज उत्पादनाचा धंदा महत्त्वाचा आहे. लोखंड व पोलादाने यांत्रिक सामान, विजेची उपकरणे, सिमेंट, कौले, लाकूडकाम, साखर, विविध रसायने, तेल, कागद, सिगारेट, विडी इत्यादींचे कारखाने राज्यात आहेत. मंड्या हे शहर साखर कारखान्यांविषयी प्रसिद्ध आहे. शहाबाद, बागलकोट, बेळगाव, भद्रावती ही सिमेंटकरिता प्रसिद्ध आहेत. बंगलोर, भद्रावती, शिमोगा, कोलार, दावणगेरे, मंगलोर, हुबळी, धारवाड, दांडेली, बेळगाव इ. शहरांतील आणि भोवतीचे औद्योगिकीकरण विशेष महत्त्वाचे आहे. बंगलोर-जळ्हळ्ळी परिसरात भारत सरकारचे मोठे कारखाने आहेत. घड्याळे, दूरध्वनीयंत्रे, इलेक्ट्रॉनीय साहित्य, विमानाचे भाग, कापड, यंत्रे इत्यादींचे कारखाने येथे असून अनेक संशोधनसंस्था कार्यशील आहेत. दक्षिण भारतातील ही महत्त्वाची बाजारपेठ समजली जाते. हरिहरचा किर्लोस्करांचा यंत्र हत्यारांचा कारखाना, भद्रावतीचा पोलाद कारखाना, दांडेलीचा कागद कारखाना, मंगलोरजवळ निघणारा रसायन व खत कारखाना, बेळगावजवळचा ॲल्युमिनियमचा कारखाना हे राज्यातील मोठे उद्योगधंदे होत. होस्पेटला पोलाद कारखाना, कुद्रेमुख व सांडूरजवळ लोखंडाचे कारखाने लवकरच सुरू होत आहेत.
हस्तकौशल्यावर आधारलेल्या अनेक लहान धंद्यांविषयी कर्नाटक प्रसिद्ध आहे. इरकल व गुळेदगुडच्या साड्या व खण म्हैसूर-शिमोगा-शिर्सी भागांतील हस्तिदंताचे व चंदनाचे सुबक कोरीव जिन्नस म्हैसूरचे चंदन तेल, साबण, उदबत्त्या वगैरे सुगंधी माल शहापूरचे चांदीचे नक्षीकाम चित्रदुर्ग-दावणगेरेची कांबळी उत्तर व दक्षिण कानडा जिल्ह्यांतील चटया व काथ्याकाम नवलगुंदची गुजरे (जमखाने) ही प्रसिद्ध उत्पादने आहेत. कापूस निर्माण करणार्या उत्तर कर्नाटकात गुलबर्गा–रायचूर भागात जवळजवळ प्रत्येक शहरात हातमागावरचे कापड विणले जाते व दावणगेरे, विजापूर, चित्रदुर्ग आणि तुमकूर या डोंगरी व गवताळ प्रदेशांत कांबळी तयार करण्याचा कौटुंबिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्याचप्रमाणे तंबाखूपासून विडी, तपकीर तयार करण्याचा धंदा ठिकठिकाणी चालतो.
दळणवळण : कर्नाटक राज्यात लोहमार्गांची लांबी २,७५७ किमी. असून एकूण सडका ८९,९८७ किमी आहेत. त्यांपैकी राष्ट्रीय मार्ग ११,२६९ किमी., राज्यरस्ते ६,७४९ किमी., प्रमुख जिल्हारस्ते १४,१५२ किमी., इतर जिल्हामार्ग २,४८५ किमी. व इतर रस्ते १४,२५६ किमी. आहेत. काही डोंगराळ भाग सोडल्यास कर्नाटकातील दळणवळणाचे मार्ग समाधानकारक असून विशेषतः रस्त्यांची देखरेख चांगली आहे.
लोहमार्गात बंगलोर-मद्रास बंगलोर-गुंटकल हे रुंदमापी व बंगलोर-हुबळी-मिरज हे अरुंदमापी मार्ग महत्त्वाचे आहेत. मार्मागोवा-हुबळी, बेल्लारी-गुंटकल हे मार्ग खनिज निर्यातीसाठी महत्त्वाचे आहेत. मुंबई-बंगलोर, बंगलोर-मद्रास हे राष्ट्रीय मार्ग व हुबळी-कारवार, शिमोगा-मंगलोर, विरूर-मंगलोर, म्हैसूर-मरकारा, मंगलोर व म्हैसूर-उटी हे पश्चिम भागातील मार्ग व मैदानावर चित्रदुर्ग-विजापूर-सोलापूर मार्ग दळणवळणाच्या व व्यापारी दृष्टीने सोईचे आहेत. हसन-मंगलोर लोहमार्ग बांधण्याची व ठिकठिकाणी ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्याच्या योजना आहेत.
राज्यात १९७०–७१ मध्ये ८,२०८ टपालकचेर्या, १,१९० तारकचेर्या, २८३ दूरध्वनिकेंद्रे व ६३,९४० दूरध्वनियंत्रे होती. राज्यात १९७१ साली १,२३,२५९ मोटारवाहने होती. त्यांपैकी राज्य परिवहन मंडळाच्या २,९९० गाड्या रोज नऊ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करीत होत्या.
सध्या बंगलोर, बेळगाव, मंगलोर ही शहरे विमानमार्गांनी इतर प्रांतांस जोडलेली आहेत. पश्चिम किनार्यावर कारवार, भटकळ, होनावर, मंगलोर इ. लहानमोठी १९ बंदरे असून भारताचे एक मोठे बंदर म्हणून मंगलोरचा विकास करण्यात येत आहे.
देशपांडे, चं. धुं.
लोक व समाजजीवन : कर्नाटक राज्य हा द्रविड प्रदेश समजला जात असला, तरी तेथील लोकांमध्ये सर्व प्रकारचे मिश्रण आढळते. येथे काही मूळ आदिवासी लोक अद्यापही भटके, शिकारी व कंदमुळे गोळा करणारे जीवन जगतात गवती झोपड्यांत राहतात पुढच्या वर्षी दुसर्या भागात जाताना पहिली जाळून टाकतात. अशा अनुसूचित जमातींची संख्या १९७१ मध्ये ०.०८% असून त्यात तोडा, जेनू कुरुबा, बेट्टाद कुरुबा, इरूलिगा, कट्टुनायकन, कणियन, कम्मार, गौडलू, येरावा, हसालास इ. जमातींचा समावेश होतो. याशिवाय येथे अनुसूचित जाती १३.१% होत्या. ऐतिहासिक काळात हा प्रदेश मध्यवर्ती वाटेवर येत असल्याने येथे तमिळ, तेलुगू, मराठी, मलयाळम्, उर्दू, हिंदी वगैरे भाषा बोलणार्यांची वसती झाली. यांची संख्या १९६१ मध्ये ५०% होती. कर्नाटकात, विशेषतः दक्षिणेकडे, पौर्वात्य संस्कृतीचा प्रभाव अधिक जाणवतो.
१९६१–७१ दरम्यान कर्नाटक राज्याची लोकसंख्या २४.०७ टक्क्यांनी वाढली. येथील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला १६३ आहे भारताचे हे प्रमाण १९० आहे. बंगलोर, मंड्या, दक्षिण कानडा, कोलार, बेळगाव, धारवाड हे जिल्हे घन लोकवस्तीचे तर उत्तर कानडा, कूर्ग, रायचूर, चिकमगळूर, गुलबर्गा, बेल्लारी, विजापूर हे जिल्हे कमी लोकवस्तीचे आहेत. बंगलोर, हुबळी-धारवाड, म्हैसूर, मंगलोर, बेळगाव, गुलबर्गा, बेल्लारी, दावणगेरे, विजापूर, शिमोगा, भद्रावती, कोलार ही लाखांवर लोकवस्ती असलेली शहरे असून २६,३७७ खेडी राज्यात होती. शहरवासी लोकांचे प्रमाण २४.३ टक्के होते. दर १,००० पुरुषांमागे राज्यात ९५९ स्त्रिया होत्या बंगलोर जिल्ह्यात हे प्रमाण सर्वांत कमी ९१२, तर दक्षिण कानडा जिल्ह्यात सर्वांत जास्त १,०६१ होते. एकूण कामगारांपैकी ४० टक्के जमीन कसणारे, २६.७ टक्के शेतमजूर व ३३.३ टक्के लोक बिगरशेती कामगार होते.
राज्यात १९७१ मध्ये ३१.५० टक्के लोक साक्षर असून कूर्ग, दक्षिण व उत्तर कानडा, बंगलोर, धारवाड या जिल्ह्यांतील साक्षरतेचे प्रमाण ३८ टक्क्यांहून जास्त, तर गुलबर्गा, बीदर, रायचूर या जिल्ह्यांतील साक्षरतेचे प्रमाण २० टक्क्यांच्या आसपास होते. १९७१–७२ मध्ये १३,०६६ माध्यमिक शाळांतून ८,८८,४१३ विद्यार्थी व ४,५५,२३१ विद्यार्थिनी शिकत होत्या. २१,६८६ प्राथमिक शाळांतून १७,५६,९७८ विद्यार्थी व १३,०८,८२८ विद्यार्थिनी शिकत होत्या. पूर्वप्राथमिक ८०७ शाळांतून ६३,८७७ विद्यार्थी शिकत होते. शेतकी, व्यापारी, अभियांत्रिकी इ. व्यावसायिक प्रकारच्या ३५० शाळांतून ३२,१३७ विद्यार्थी व १२,४११ विद्यार्थिनी होत्या. विद्यापीठे व उच्च शिक्षणाच्या ३०२ संस्थांमधून १,५१,६७१ विद्यार्थी व ३८,८४४ विद्यार्थिनी होत्या. म्हैसूर, बंगलोर व धारवाड येथे विद्यापीठे असून, बंगलोर येथे कृषिविज्ञान विद्यापीठ, विज्ञानसंस्था, उद्यान संशोधन संस्था व अन्नविषयक संशोधन संस्था आहेत. हनुमानमट्टी येथे मौनी विद्यापीठाप्रमाणे संस्था असून, बंगलोर येथे उद्योग व तंत्रविषयक संग्रहालय आहे.
१९७१ मध्ये एकूण सार्वजनिक रुग्णालयांची संख्या १९५ होती व सार्वजनिक दवाखान्यांची संख्या ७९१ होती. दोन्ही मिळून २६,१८३ खाटा होत्या. राज्यात ९ वैद्यकीय महाविद्यालये होती.
राज्यातील ८६⋅४६ टक्के लोक हिंदू, १०⋅६३ टक्के इस्लाम धर्मीय, २⋅०९ टक्के ख्रिश्चन, ०⋅०२ टक्के शीख, ०⋅०५ टक्के बौद्ध व ०⋅७५ टक्के जैन धर्मीय होते. धार्मिक सहिष्णुता हे राज्याचे ऐतिहासिक काळापासूनचे वैशिष्ट्य होय. आद्य शंकराचार्यांचा एक प्रमुख मठ शृंगेरी येथे होता श्री रामानुज अनेक वर्षे मेलुकोटे येथे होते. येथे जैन धर्मीय अनेक राजे होऊन गेले. लिंगायतांचे संस्थापक बसवेश्वर यांची तर ही कर्मभूमी. विजापूरची आदिलशाही व हैदर-टिपू यांच्यामुळे मुसलमानांची अधिसत्ता काही वर्षे येथे होती. या सर्वांमुळे राज्यात निरनिराळ्या धर्मांचे लोक, काही अपवाद वगळल्यास, सुखाने नांदत होते.
शाह, र.रू.
भाषा-साहित्य : कन्नड की राज्याची अधिकृत भाषा असली, तरी इतर भाषिकांची संख्याही मोठी आहे. किनारपट्टीत तुळू व कोकणी, कूर्गमध्ये कोडगू व आदिवासी जमातींच्या विविध कन्नड बोली रूढ आहेत. उत्तरेकडे आर्य भाषांतील शब्द मिसळलेली, तर दक्षिणेकडे द्राविडी भाषांतील शब्द मिसळलेली कन्नड बोलली जाते. शब्दसंपत्ती व उच्चारपद्धती अंतराअंतरावर बदलत जाते.
कन्नड साहित्य प्राचीन असून समृद्ध आहे. राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष (८१४—८८०) याच्या कविराजमार्ग या दंडीच्या काव्यादर्शावर आधारलेल्या ग्रंथापासून कन्नड साहित्याचा आरंभ मानला जातो. दहाव्या शतकात आदिकवी पंप, पोन्न, रन्न, भट्टनारायण, चावुंडराय हे कवी होऊन गेले. अकराव्या शतकातील चंपूशैलीचे काव्य रामायण, महाभारतातील कथानकांना जैन धर्माच्या चौकटीत बसवून निर्माण झाले. बाराव्या शतकात श्री. बसवेश्वरांच्या वीरशैव पंथामुळे कन्नड भाषेला धर्मभाषेची प्रतिष्ठा लाभली. अक्कमहादेवी, हरिहर, राघवांक, चामरस, रुद्रभट, विरुपाक्ष पंडित हे प्रसिद्ध वीरशैव धर्मकवी होत. पंधराव्या शतकापासून वैष्णव साहित्याचीही वाढ होत गेली. ‘कुमारव्यास’, ‘कुमारवाल्मिकी’ अशी कविनामे घेऊन वैष्णव कवींनी काव्यरचना केली. सोळाव्या शतकात पुरंदरदासाची कीर्तने लोकप्रिय होती. कनकदास या दलित कवीचे मोहनतरंगिणी हे भक्तिकाव्य उल्लेखनीय आहे. विजयानगराच्या साम्राज्याचा शेवट झाल्यानंतर कन्नड साहित्याला उतरती कळा लागली. ब्रिटिश काळापासून आधुनिक कन्नड साहित्याला जोराची चालना मिळून अनुवाद व भाषांतर या रूपाने ते संपन्न होऊ लागले. १९२० नंतर द. रा. बेंद्रे, के. व्ही. पुटप्प, शिवराम कारंत, डी. व्ही गुंडाप्पा, मास्ती वेंकटेश अयंगार, शं. बा. जोशी, आद्य रंगाचार्य, प्रा. गोकाक, प्रा. मुगळी इत्यादींनी साहित्याच्या विविध क्षेत्रांत मौलिक स्वरूपाची निर्मिती केली. द. रा. बेंद्रे यांना भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कारही लाभला. स्वतंत्र कर्नाटक राज्यात भाषासमृद्धी, कोशसाहित्य, परिभाषानिर्मिती यांसाठी शासकीय व विद्यापीठीय स्तरांवरून प्रयत्न होत आहेत. [à कन्नड भाषा कन्नड साहित्य].
दिवेकर, गु.व्यं.
कला : कर्नाटकातील कलापरंपरा दीर्घ व समृद्ध आहे. पाचव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत कर्नाटकातील मंदिरादी वास्तुनिर्मितीचा प्रवाह अखंडपणे वाहत राहिला. उत्तरेकडील नागर वास्तुशैली आणि दक्षिणेकडील द्राविड वास्तुशैली यांच्या सुरेख संगमातून चालुक्य वंशाच्या काळात चालुक्य वास्तुशैली जन्मास आली. या शैलीने नटलेली सर्वसाधारणतः सुस्थितीत असलेली अनेक मंदिरे पट्टदकल, बादामी, महाकूट, ऐहोळे, आलमपूर, इट्टगी, गदग वगैरे ठिकाणी आढळतात. त्यांतील दुर्गा, हुच्चीमल्लीगुडी, पापनाथ, विरुपाक्ष, संगमेश्वर, विश्वब्रह्म वगैरे मंदिरे कलादृष्ट्या अप्रतिम आहेत. इट्टगी व गदग येथील मंदिरे अकराव्या शतकात चालुक्यांनी बांधली. या मंदिरांतील मूर्तिकाम हे प्रमाणबद्धता, सजीवता व ढब या दृष्टीने फारच बोलके आहे. हीच शैली पुढे होयसळांच्या काळात अधिक परिणत झाली. तिला कर्नाटक शैली असेही म्हणतात. तिचे अवशेष हळेबीड, बेलूर, दोड्डगद्दवळ्ळी, अरसिकेरे, नुग्गिहळ्ळी आणि सोमनाथपूर येथे आढळतात. यांतील मंदिरांचे विधान चतुष्कोणी नाही. ते उंच अशा तारकाकृती पायावर छायाप्रकाशाचा परिणाम साधण्यासाठी बहुकोनांकित केलेले असून शिखरांऐवजी गोपुरांची बांधणी त्यांत दिसते. ती वर निमुळती होत गेली आहेत. येथील मंदिरांच्या बांधणीत कठीण ग्रॅनाइट व संगजीरा (बळू) हा मऊ दगड वापरल्यामुळे येथील मूर्तिकामात अधिक सफाईदारपणा दिसतो. यांतील होयसळेश्वर व चेन्नकेशव ही मंदिरे मूर्तिशिल्पांच्या दृष्टीने लक्षणीय आहेत. मूर्तिकाम विविधतापूर्ण असून रामायण-महाभारतातील कथांबरोबरच विष्णुवधन, त्याचा दरबार आणि त्याची राणी शांतला यांचीही शिल्पे आढळतात. तथापि दाट कलाकुसर, आत्यंतिक आलंकारिकता, मूर्तिशिल्पांचा बुटकेपणा व पृथुलता या मर्यादा या मूर्तिकलेत जाणवतात. या मूर्तिशिल्पांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही मूर्तींच्या खाली शिल्पकारांनी आपली नावे खोदली आहेत.
विजयानगरच्या साम्राज्यकाळात होस्पेट, हंपी इ. ठिकाणी अनेक मंदिरे बांधण्यात आली. यांतील विठ्ठलस्वामी, विरुपाक्ष, हजारा राम, भोगनंदीश्वर, अनंतशयन, वेदनारायण, यांसारखी काही मंदिरे प्रसिद्ध असून त्यांची वास्तुशैली पारंपारिक आहे. भोगनंदीश्वर मंदिर बंगलोरजवळ नंदी टेकडीच्या पायथ्याशी असून त्याचे बांधकाम ८०१ मध्ये द्राविड वास्तुशैलीच्या नमुन्यावर सुरू झाले आणि पुढे ते विजयानगराच्या राजांनी सोळाव्या शतकात पूर्ण केले. तथापि त्याच्या बांधणीतील सुसंगती, एकात्मता व सौंदर्य तीळमात्र कमी झालेले नाही. यातील नंदीची मूर्ती व त्याचा मंडप भव्य आहे. मात्र या काळात उत्तुंग गोपुरे, प्रशस्त मंडप आणि त्याला साजेशा नृत्यशिव, नृसिंह, गणपती, रंगनाथ वगैरेंच्या भव्य उठावदार मूर्ती खोदण्यात आल्या. कृष्णदेवरायाने शेकडो गोपुरे उभारल्याने ‘रायगोपुर’ असा शब्दप्रयोग रूढ झाला. विजयानगराचे राज्य सर्व दक्षिण हिंदुस्थानात पसरले होते. त्यामुळे तत्कालीन गोपुरे आंध्र आणि तमिळनाडू राज्यांतूनही पहावयास मिळतात. या काळात मूर्तिशिल्पात रामायण-महाभारताबरोबर श्रीकृष्णाच्या बाललीला हा विषयही लोकप्रिय झालेला दिसतो. कर्नाटकात जैन धर्माचे अस्तित्व गंग राजांपासून होते आणि होयसळ राजांनी त्याला आश्रय दिला. साहजिकच गोमटेश्वर वा बाहुबलीच्या भव्य मूर्ती काही ठिकाणी उभारण्यात आल्या. उदा., ९८३ मध्ये श्रवणबेळगोळ (१८ मी. उंच), १४८१ मध्ये कारकल (१२⋅५ मी. उंच) व १६०३ मध्ये वेन्नूर (११ मी. उंच). याशिवाय कॅनरा जिल्ह्यात मुडब्रिदी येथे काही जैन मंदिरे बांधण्यात आली. त्यांचे स्तंभ कलाकुसरयुक्त आहेत. यांतील काही मंदिरांची शैली नेपाळ व ब्रह्मदेश यांतील वास्तुशैलीसारखी दिसते.
मुसलमानांच्या आक्रमणानंतर हिंदू वास्तुकला व मूर्तिकला यांची प्रगती खुंटली. तथापि मशिदी व कबरी यांचे बांधकाम होत राहिले. अर्थात मुस्लिम सत्तेची केंद्रस्थाने असलेल्या विजापूर, श्रीरंगपटण, गुलबर्गा व बीदर या ठिकाणी अशा वास्तू उभारण्यात आल्या. मुस्लिम काळात स्तंभांऐवजी कमान आली आणि रोमन व इराणी छाप वास्तूंवर दिसू लागली. त्याला दख्खन शैली असे स्वतंत्र नामाभिधानही प्राप्त झाले. यांतील बीदर येथे महंमद गवान या विद्वान दिवाणाने बांधलेल्या मदरसाची इमारत, तिचे विधान आणि इंडो-सार्सानिक शैली यांकरिता प्रसिद्ध असून तीत पूर्वी सु. ३,००० हस्तलिखितांचे अप्रतिम ग्रंथालय होते. तसेच विजापूरचा गोलघुमट (बोलघुमट) प्रतिध्वनीसाठी व त्यावरील घुमटाकरिता जगप्रसिद्ध आहे तर गुलबर्ग्याची जुम्मा मशीद प्रशस्त असून श्रीरंगपटण व बंगलोर येथील राजप्रासाद त्यांतील भित्तिचित्रांकरिता प्रसिद्ध आहेत. या काळातच काही मोठ्या उद्यानांची निर्मिती करण्यात आली. इब्राहिम रोझा, दर्या दौलत या वास्तू सूक्ष्म अपोत्थित कलाकुसरीसाठी तसेच बगीचांच्या कलात्मक विधानाकरिता ख्यातनाम आहेत. अलीकडची लालबाग व वृंदावन बाग व वोडेयरांचा राजप्रासादही कलादृष्ट्या अप्रतिम आहेत. ब्रिटिश अंमलात अनेक ख्रिस्ती मंदिरे, राजवाडे, टाउन हॉल्स बांधण्यात आले. त्या सर्वांवर पाश्चात्य वास्तुशैलीची छाप असून काही राजवाडे इंडो-सार्सानिक पद्धतीचे आहेत, तर टाउन हॉल्स अक्रॉपलिसच्या बांधणीचे आढळतात, कारण त्यांचे स्तंभ डोरिक शैलीचे आहेत. बंगलोरची विधान सौध ही अलीकडची सर्वांत सुंदर आधुनिक वास्तू असून तीत पाश्चात्य, सार्सानिक व भारतीय वास्तुशैलींचा सुंदर मिलाफ पहावयास मिळतो.
देशपांडे, सु.र.
संगीत : कर्नाटक संगीत ही कर्नाटकाने जोपासलेली श्रेष्ठ संगीत परंपरा होय. कर्नाटकातील वीरशैव व वैष्णव संप्रदायातील कवींनी गीतरचनेची एक अखंड परंपराच निर्माण केली. श्रीपादराया स्वामी याने कन्नड गीते विस्तृत प्रदेशात लोकप्रिय केली. श्री व्यासराय स्वामी, पुरंदरदास यांच्या रचनेत संगीतप्रधान गीतरचनेची परिणत अवस्था दिसते. पुरंदरदासाची कीर्तने म्हणजे संगीतविषयक वेगवेगळे प्रयोगच होत. त्यागराजाने कर्नाटक संगीत अधिक लोकप्रिय केले. लोकसंगीताचा आविष्कार कन्नड यक्षगानातून दिसून येतो. अलीकडच्या काळात शेषण्णा (वीणावादन), कृष्णप्पा (कंठसंगीत), वासुदेवाचार्य (संगीतरचना), चौडैया (व्हायोलिनवादन) हे संगीतक्षेत्रातील उल्लेखनीय कलावंत होत. कर्नाटक संगीतपरंपरेत बसवराज राजगुरू, मल्लिकार्जुन मन्सूर, भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल ह्या श्रेष्ठ कलावंतांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
रंगभूमी : कर्नाटकात तुंगभद्रेच्या उत्तरेस उत्तर भारतीय पद्धतीचे नृत्य, नाट्य, संगीत इ. लोकप्रिय आहे, तर तिच्या दक्षिणेस कर्नाटक संगीत व दाक्षिणात्य नृत्य, नाट्य, संगीत प्रचलित आहे. लोकजीवनात यक्षगान किंवा बयलाट हे नृत्यनाट्य अनुनर्श प्रचारात आहे. म्हैसूर संस्थानात अनेक विद्वानांनी संस्कृत व इंग्रजी नाटकांची रूपांतरे केली, त्यांत बसप्पाशास्त्री, सुब्बाशास्त्री, अनंत नारायण शास्त्री, अय्यशास्त्री, गिरिभट्टरतिमय्य, व्यंकटाचार्य, नंजनगुडू श्रीकंठशास्त्री, बेळ्ळाबे नरहरिशास्त्री यांचा अंतर्भाव होतो. सिंगरायकृत श्री हर्षाच्या रत्नावलीचे १७०० मधील कन्नड रूपांतर उपलब्ध आहे. आधुनिक नाटके सादर करणार्यांत गरूड सदाशिवराव, गुब्बी वीराण्णा हे अग्रेसर होत. लोकजागृतीसाठी विडंबनात्मक नाटकेही लिहिण्यात आली. शॉ, इब्सेन यांच्या नाटकांच्या अनुकरणाचाही प्रयत्न करण्यात आला. टी. पी. कैलासम्, आद्य रंगाचार्य, मास्ती वेंकटेश अयंगार यांची नाटके उल्लेखनीय आहेत. गिरीश कार्नाड या तरुण नाटककाराच्या प्रयत्नांमुळे कन्नड रंगभूमीवरील नव्या प्रयोगांस चालना मिळाली. कन्नड रंगभूमी ही विकासाच्या मार्गावर आहे.
दिवेकर, गु.व्यं.
प्रेक्षणीय स्थळे : ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यापारी इ. कारणांनी प्रसिद्ध अशी अनेक ठिकाणे राज्यात असून शासनाने पर्यटकांसाठी उत्तम सुखसोयी केल्या आहेत. सह्याद्रीचे अनेक उंच माथे राज्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत. बंगलोर वातानुकूलित शहर समजले जाते तर मरकारा, बेळगाव, धारवाड, हसन ही गरिबांची थंड हवेची ठिकाणे होत. सह्याद्रीची दाट जंगले, त्यांतील निसर्गसौंदर्य व वन्य प्राणी ही येथील खास आकर्षणे. हत्तीची शिकार संस्थान-कारकीर्दीत प्रसिद्ध होती. चंदन व सुगंधी सामान म्हणजे म्हैसूर दसरा महोत्सव म्हैसूरलाच पहावा कोलार म्हणजे सोने व बंगलोर म्हणजे तलम रेशमी कापड अशी वैशिष्ट्ये आजही सुप्रसिद्ध आहेत. बादामी, ऐहोळे, बेलूर, सोमनाथपूर, हळेबीड, पट्टदकल, गदग, लक्कुंडी, बनवासी, हंपी, विजापूर, गुलबर्गा, श्रीरंगपटण, म्हैसूर इ. इतिहासप्रसिद्ध व कलाकुसरपूर्ण वास्तुशिल्पांनी नटलेली येथील अनेक स्थळे भारतभर प्रसिद्ध आहेत. ब्रिटिश अमदानीला विरोध करणार्या राणी चेन्नमाचे कित्तूर व बाबासाहेब नरगुंदकरांचे नरगुंद ही स्थळेही कर्नाटकवासियांना प्रिय आहेत. व्यापार व उद्योग यांसाठी अनेक स्थळे प्रसिद्ध असून धारवाड, बंगलोर ही शिक्षणक्षेत्रे म्हणूनही प्रसिद्ध आहेत. जवळजवळ सर्व धरणांच्या ठिकाणी विजेचा व पाण्याचा योजनापूर्वक वापर करून पुष्पवाटिका व फलोद्याने निर्माण करून सृष्टिसौंदर्यात भर घातली आहे. म्हैसूरजवळील वृंदावन उद्यान यासाठी जगप्रसिद्ध आहे. जोग, गोकाक, शिवसमुद्रम् हे धबधबे पाहण्यास प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. गोकर्ण महाबळेश्वर, शृंगेरी, बसवकल्याण, उडुपी, शिर्सीं, कुडलसंगम, श्रवणबेळगोळ यांना धार्मिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे.
देशपांडे, चं.धुं.
संदर्भ : 1. Aiyangar, S. K. Ancient India and South Indian History and Culture, 2 Vols., Poona, 1941-43.
2. Krishna Rao, M. V. Glimpses of Karnataka, Banglore, 1960.
3. Learmonth A. T. A. Bhat, L. S. Mysore State, Vol. I & II, Bombay, 1961.
4. Mugali, R. S. The Heritage of Karnataka, Banglore, 1946.
5. Ramachandriah, N. S. Mysore, New Delhi, 1972.
6. Sheshadri, M. Prehistoric and Protohistoric Mysore, London, 1956.
7. Wilks, Mark, History of Mysore, 2 Vols., Mysore, 1930-32.
“