कावेरीपटनम्‌ : प्राचीन काळातील एक प्रसिद्ध बंदर व चोल राजांची राजधानी. तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यात कावेरी नदीच्या मुखाशी ते वसले आहे. लोकसंख्या १२,११० (१९७१). प्राचीन संस्कृत आणि तमिळ वाङ्मयात तसेच तमिळ शिलालेखांत त्याची कावीरपट्टन, पुहार, काकम्दि, कावेरीपुंपट्टिनम्‌, काविरिप्पूंबटनम्‌ इ.नामांतरे आढळतात. टॉलेमीने त्याचा खवेरिस एंपोरियम ह्या नावाने उल्लेख केला आहे. इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात कावेरीपटनम्‌ फार मोठे व्यापारी केंद्र होते, याचा पुरावा पेरिप्लस ऑफ द एरीथ्रिअन सी ह्या ग्रंथात आणि टॉलेमीच्या लिखाणात मिळतो. त्याचे बंदर आणि नगर असे दोन भाग होते. त्यांमधील मोकळ्या जागेत बाजारपेठ होती. बंदराजवळ गुदामे होती. सुवर्ण, मौक्तिक, रत्ने, रेशीम, उत्तम घोडे, दालचिनी तसेच इतर खाद्यपदार्थ यांचा व्यापार तिथे चाले. बंदराजवळच रोमन व्यापाऱ्यांची वसाहत होती. अनेक कलाकार आणि कारागीर राहत. चोल राजाचा प्रासाद भव्य होता व त्याला रत्नजडित खांब आणि सोन्याने मढविलेल्या भिंती होत्या. प्रासादाभोवती खंदक होता आणि प्रवेश द्वारावर वाघांचे पुतळे होते. याशिवाय उद्याने, मंदिरे, विहार आणि पुष्करिणी अनेक होत्या. १९६२ ते १९६४ या काळात झालेल्या उत्खननांत इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकांतील तलावाचे व मालधक्क्याचे काही अवशेष सापडले आहेत.

संदर्भ : 1. Indian Archaeological Survey, Indian Archaeology, A review–1962–64, New Delhi, 1965. 2. Kanakasabhai, V. The Tamils Eighteen Hundred Years Ago, Madras, 1956.

देव, शां. भा.