कावेरी : दक्षिण भारतातील प्रमुख व पवित्र नदी. लांबी ७६० किमी. जलवाहन क्षेत्र सु.९४,४०० चौ.किमी. कर्नाटक राज्याच्या कूर्ग जिल्ह्यातील ब्रह्मगिरी डोंगरावर १,४२५ मी. उंचीवर उगम पावून ती सामान्यतः आग्नेयीकडे वाहते. परंतु तिच्या प्रवाहाची दिशा अनेक वेळा एकदम बदललेली दिसते. ती प्रथम पूर्वेस, मग काहीशी ईशान्येस, नंतर आग्नेयीस, मेत्तूर जलाशयापूर्वी कर्नाटक-तमिळनाडू सीमेवर नैर्ऋत्येस, जलाशयानंतर तमिळनाडूच्या कोईमतूर व सेलम जिल्ह्यांच्या सीमेवरून थेट दक्षिणेस, भवानी ते श्रीरंगम्‌ पुन्हा आग्नेयीस व त्यानंतर पूर्वेस वाहत जाते. श्रीरंगम्‌पासून एक फाटा कॉलेरून नावाने ईशान्येकडे जाऊन चिदंबरम्‌च्या दक्षिणेकडून बंगालच्या उपसागराला मिळतो. दुसरा फाटा तंजावरवरून जाऊन नागापट्टणम्‌जवळ समुद्रास मिळतो. हा फाटा कावेरीच्या सुपीक व समृद्ध त्रिभुज प्रदेशातील कालव्यांना पाणी पुरवितो.

कावेरीवरील शिवसमुद्रम् धबधबा

सुरुवातीच्या ब्रह्मगिरी ते कुशलनगर टप्प्यात कावेरी डोंगरातून कोरून काढलेल्या, नागमोडी, दाट वनस्पतीयुक्त व उंच उंच कडांच्या दरीतून येते. नंतर ती कर्नाटक पठाराच्या सु.३५ किमी. रुंद व १,००० मी. उंचीच्या मलनाड भागातून पुढे पठाराच्या `मैदान’ भागातून जाते. ती अत्यंत खडकाळ भागातून वाहते. त्यात ग्रॅनाइट खडक विशेषतः आढळतो. तिच्या मार्गात अनेक द्रुतवाह व धबधबे तयार झाले आहेत. त्यांत चंचनकट्टी येथील प्रपात अत्यंत मनोवेधक आहे. त्यानंतर नदी सु.३००–४०० मी. रुंद होऊन तिच्यात श्रीरंगपटण हे पहिले बेट तयार झाले आहे. त्याचे आधी म्हैसूरपासून सु.१८ किमी. अंतरावर या नदीला धरण बांधून कृष्णराजसागर नावाचा जलाशय तयार केला आहे. तेथेच वृंदावन नावाचे सुरम्य विश्रामस्थान उभारलेले आहे. पुढे शिवसमुद्रम्‌ येथेही प्रवाहाचे दोन भाग होऊन मध्ये बेट तयार झालेले आहे. पश्चिमेकडील प्रवाहाला गगनचुक्की व पूर्वेकडील प्रवाहाला भारचुक्की म्हणतात. येथे कावेरी सु.१०० मी. खोल उडी घेते. त्याचा फायदा घेऊन १९०२ पासून येथे वीजनिर्मिती केली जाते. ही वीज शेतीला, कोलार येथील सोन्याच्या खाणींना आणि बंगलोर, म्हैसूर व कोलार शहरांना पुरविली जाते. कर्नाटक राज्यात कावेरीला अनेक बांध घालून तिचे पाणी शेतीला पुरविलेले आहे. सेलम जिल्ह्यात मेत्तूर येथे कावेरीला १९३८मध्ये प्रचंड धरण बांधले असून तेथे मोठया प्रमाणावर वीज उत्पन्न केली जाते व कालव्यांनी शेतीला पाणी पुरविले जाते. नंतर एरोडवरून श्रीरंगम्‌ येथे आल्यावर पुन्हा नदीत बेट तयार झालेले आहे. जवळच तिरुचिरापल्ली हे प्रसिद्ध शहर आहे. येथून कावेरीला संपन्न त्रिभुजप्रदेश सुरू होतो. कर्नाटक राज्यात कावेरीला ककब्बे, सुवर्णवती, हेमावती, शिम्शा, कर्णावली, कब्बनी इ. उपनद्या मिळतात आणि तमिळनाडू राज्यात भवानी, नोयिल, अमरावती या मिळतात. कावेरी कर्नाटक व तमिळनाडू या दोन्ही राज्यांतून वाहत असल्यामुळे आणि दोन्ही राज्यांना तिच्यापासून जलविद्युत्‌ आणि शेतीसाठी भरपूर पाणीपुरवठा हवा असल्यामुळे या राज्यांत `कावेरी पाणी तंटा’ उपस्थित झाला आहे. केंद्र सरकारचे धोरण पसंत नसल्यामुळे तमिळनाडू शासनाची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेण्यापर्यंत मजल गेली आहे आणि आपले म्हणणे एेकून घेतल्याखेरीज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय करू नये, अशी कर्नाटक शासनाची भूमिका आहे.

कावेरीच्या काठचा सर्वच प्रदेश अत्यंत नयनरम्य आहे. कालवे काढून या नदीचा उपयोग शेतीसाठी करण्याची कल्पना पहिल्या शतकातील चोल राजांपासूनची आहे. अकराव्या शतकात बांधलेला ग्रॅंड ॲनिकट हा कालवा व सतराव्या शतकात चिक्कदेव राजाने बांधलेली तीन धरणे आजही चालू आहेत. तंजावरचा प्रदेश तर दक्षिण भारतातील बगीचा म्हणून प्रसिद्ध आहे. कावेरीकाठच्या प्रदेशात भात, नारळ, केळी, तंबाखू, ऊस, भुईमूग, कापूस, मिरची, तेलबिया, कॉफी, वेलदोडे, काजू, मिरी, चंदन, इमारती लाकूड, रेशीम, हिरे-माणके, मॅंगॅनीज, लोखंड इ. अनेकविध उत्पन्ने होतात. कावेरीला दक्षिण गंगाच म्हणतात. कावेरीच्या काठची श्रीरंगपट्टण, श्रीरंगम्‌, कुंभकोणम्‌, तंजावर, तिरुवैय्यर, कावेरीपटनम्‌ इ. तीर्थक्षेत्रे शेकडो वर्षे प्रसिद्ध आहेत. समृद्ध शेती, सुंदर नगरे, उंच उंच गोपुरे, प्रत्येक देवळाजवळचे बांधीव, रम्य तलाव यांनी कावेरीचा परिसर गजबजलेला आहे. कावेरीच्या उगमाजवळ दरवर्षी श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते. गंग, होयसळ, चोल इ. राजे व टिपू सुलतान वगैरेंच्या काळातील ऐतिहासिक आणि पुराणवस्तुविषयक अवशेषही कावेरीकाठच्या भागात आढळतात.

ब्रह्मगिरीवर अपत्यप्राप्तीसाठी तप करणाऱ्या कवेर मुनीला ब्रह्मदेवाने आपल्याला विष्णूकडून मिळालेली लोपामुद्रा ही कन्या दिली. कवेराची कन्या म्हणून तिला कावेरी नाव मिळाले. तिने तप करून लोकोपकारार्थ नदीरूप मिळविले, अशी स्कंदपुराणात कथा आहे. क्षणभरही आपल्याला सोडून कोठे जाता कामा नये, या अटीवर कावेरीने अगस्ती ऋषीशी विवाह केला, परंतु ती अट मोडल्यामुळे तिने नदीरूप घेतले. मग त्याच्या विनवणीवरून ती नदी व लोपामुद्रा या दोन्ही रूपांनी राहिली, अशी व अगस्तींनीच कावेरीचा प्रवाह उत्पन्न केला अशीही आख्यायिका आहे.

कुमठेकर, ज.ब.