कालाख : इराकमधील प्राचीन ॲसिरियन नगर व राजधानीचे ठिकाण. आधुनिक नाव निमरुद. हे प्राचीन निनेव्हच्या (आधुनिक मोसूल) दक्षिणेस ३२ किमी., टायग्रिसच्या पूर्व तीरावर वसले असून याचा उल्लेख बायबलमध्ये आढळतो. इ.स. पू. तेराव्या शतकात पहिला शॅल्मानीझर याने याची स्थापना केली असली, तरी इ. स. पू. नवव्या शतकात दुसरा आशुर–नासिर–पाल याने आपल्या राजधानीचे हे ठिकाण ठरवून शहराच्या बांधकामास सुरुवात केली व ते त्याचा पुत्र दुसरा शॅल्मानीझर याने पूर्ण केले. एकोणिसाव्या शतकातील उत्खननात येथे धर्म व जादू यांवरील बराच मोठा ग्रंथसंग्रह, अनेक करारनामे व महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आणि शेजारील किल्ल्यात फारच मोठा हस्तिदंती शिल्पांचा साठा सापडला.

जोशी, चंद्रहास