कॅक्स्टन, विल्यम:(सु. १४२२—१४९१). पहिले ब्रिटिश मुद्रक. केंटजवळील जंगल भागात  त्यांचा जन्म झाला. प्रथम ते रॉबर्ट लार्ज या श्रीमंत व्यापाऱ्याकडे शिकावयास होते. लार्ज यांच्या  मृत्यूनंतर (१४४१) ते ब्रूजिस (बेल्जियम) या लोकरीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या गावी गेले.  बेल्जियम, लक्झेंबर्ग व नेदर्लंड्स येथील एक वजनदार इंग्रज व्यापारी म्हणून त्यांनी ३० वर्षे कीर्ती  मिळविली. त्या भागातील व्यापार मंडळाचे त्यांना १४५३ मध्ये सभासद करून घेण्यात आले. १४६३–७० या काळात ते त्या मंडळाचे गव्हर्नर होते. १४७१ मध्ये डचेस ऑफ बर्गंडी यांचे ते आर्थिक  सल्लागार होते. तसेच १४७५ पर्यंत त्यांनी इंग्‍लंडच्या राजाचे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम केले.  तथापि त्यानंतर त्यांचे लक्ष वाङ्मयाकडे वळले.

त्यांनी १४६९ मध्ये The Recuyell of the Historyes of Troye या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर  करण्यास सुरुवात केली व कोलोन येथे १४७१ मध्ये त्यांनी ते पूर्ण केले. कोलोन येथेच त्यांनी मुद्रण  कलेविषयी माहिती करून घेतली. १४७४ च्या सुमारास त्यांनी छापखाना घातला व इंग्रजी भाषेत  छापलेले Recuyell हे पहिले पुस्तक ब्रूजिस येथे १४७५ मध्ये प्रसिद्ध केले. The Game and Playe of the Chesse ह्या बुद्धिबळाच्या खेळासंबंधीच्या फ्रेंच पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करून ते १४७६ मध्ये  प्रसिद्ध केले. तसेच याच सुमारास त्यांनी काही फ्रेंच पुस्तकेही छापली. यानंतर त्यांनी इंग्‍लंडमध्ये  वास्तव्य केले आणि उर्वरीत आयुष्य लेखन व मुद्रण यांत घालविले. Dictes and Sayenges of the Phylosophers हे इंग्‍लंडमध्ये कालनिर्देश केलेले पहिलेच पुस्तक छापून त्यांनी ते १४७७ मध्ये प्रसिद्ध  केले. त्यांनी विविध प्रकारचे १०० हून अधिक ग्रंथ, लेख इ. प्रसिद्ध केले. डच, फ्रेंच व लॅटिन भाषांतील २४ पुस्तकांचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले. ते लंडन येथे मृत्यू पावले.

मिठारी, भू. चिं.