कँपॅन्यूलेलीझ : (घंटापुष्प गण). फुलझाडांच्या (आवृतबीज, द्विदलिकित) एका गणाचे नाव.यामध्ये एकूण चार मुख्य कुले [कँपॅन्यूलेसी, गुडेनिएसी, स्टायलिडेसी व ⇨कंपॉझिटी ], सु. ९००च्यावर वंश व १६,९२० जाती असून बहुतेक सर्व ओषधी [→ ओषधि], क्षुपे (झुडपे) व क्वचित वृक्ष आहेत. सर्व कुले सामान्यपणे अधिक प्रगत असून त्यांचा प्रसार सर्वत्र आहे. पुष्पबंध, परागकोश, किंजमंडल व फळे यांसंबंधीच्या लहानमोठ्या फरकांवरून भिन्न कुले ओळखली जातात. सर्व जातींत सामान्यपणे चीक असलेल्या नलिका किंवा तैलनलिका असतात. पुष्पबंध अकुंठित [→ पुष्पबंध] फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, अरसमात्र किंवा एकसमात्र, अपिकिंज व पंचभागी परागकेसर पूर्णपणे किंवा अंशतः जुळलेले, किंजदलांची संख्या इतर दलांपेक्षा कमी व किंजदले जुळलेली किंजपुट बहुधा अध:स्थ [→ फूल] फळे भिन्न प्रकारांनी फुटणारी बोंडे. देवनळ, सहदेवी, सूर्यफूल, करडई, ॲस्टर, झिनिया इ. उपयुक्त वनस्पती ह्या गणातीलच आहेत.

घन, सुशीला प.