कँथर्डिन : लिटा व मायलॅब्रिस या वंशांतील कीटकांपासून (मुख्यत्वेकरून स्पॅनिश माशीपासून) मिळणारे एक कार्बनी द्रव्य. रेणुसूत्र (रेणूमध्ये असणारी मूलद्रव्ये आणि त्यांची संख्या दर्शविणारे सूत्र) C10H12O4. याची संरचना गॅडॅमर यांनी १९१४ मध्ये ठरविली. १९५३ मध्ये स्टार्क यांनी संश्लेषणाने (कृत्रिम रीतीने) हा पदार्थ बनविला.
वर्णहीन स्फटिक, वितळबिंदू २१८० से., पाण्यात व अल्कोहॉलात अल्प प्रमाणात विद्राव्य (विरघळते) ईथरे, एथिल ॲसिटेट, क्लोरोफॉर्म व ॲसिटोन यांत अधिक विद्राव्य. क्षारामध्ये (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देणाऱ्या पदार्थामध्ये) विरघळविले असता कँथर्डिक अम्लाची लवणे मिळतात. कँथर्डिनाच्या किंवा त्याच्या विद्रावाच्या संपर्काने त्वचेवर फोड येतात.
कँथर्डिन मिळविण्यासाठी विशिष्ट कीटकांची कोरडी पूड ईथर किंवा एथिल ॲसिटेटा मध्ये(त्यात थोडे खनिज अम्ल घालून) निष्कर्षण करतात (इष्ट पदार्थ मिश्रणातून काढून घेण्यासाठी योग्य द्रवात विरघळवितात) व निष्कर्ष गाळतात. त्यातील विद्रावक (पदार्थ ज्यामध्ये विरघळलेला आहे तो द्रव) बाष्पीभवनाने काढून टाकला म्हणजे जो अवशेष राहतो त्यातील चरबीचा अंश कार्बन डाय सल्फाइडाने विरघळवितात. उरलेला पदार्थ अल्कोहोलात विरघळवून स्फटिकीभवन (स्फटिक बनविण्याची क्रिया) केले म्हणजे शुद्ध कँथर्डिन मिळते.
त्वचेवर लावावयाच्या काही मलमांमध्ये, तसेच मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या) व कामोत्तेजक औषधांमध्ये ते वापरतात. अत्यल्प प्रमाणात केशवर्धक तेलातही याचा उपयोग करतात.
देशपांडे, ज. र.
“