कपिशा : बौद्धकालीन प्राचीन देश. आधुनिक ईशान्य अफगाणिस्तानात याचे स्थान असून पूर्वेस कुनार नदी व गंधार देश, पश्चिमेस पंजशीर नदी, हिंदुकुश पर्वत व बाल्ख देश, उत्तरेस व ईशान्येस हिंदुकुश पर्वत आणि दक्षिणेस कुभा (आधुनिक काबूल नदी) व कोहिस्तान देश, अशा याच्या भौगोलिक परिसीमा होत्या. कपिसेने, कफसा, कापिश, क-पि-शे-ये, क-पि-शिह, कि-पिन् व काफिशीस्तान अशी याची नामांतरे होती. काफिरीस्तान हे काफिशीस्तानाचे अपभ्रष्ट रूप असावे. येथील राजा बुद्धानुयायी होता. तो बौद्धपरिषद भरवी व चांदीच्या विशाल बौद्ध प्रतिमेची पूजा करून विपुल दानधर्म करी. येथे शंभर बौद्धमठ, विविध विशाल स्तूप व महायान पंथीय सहा हजारांवर बौद्ध भिक्षू होते. त्यांखेरीज जैनांची वस्ती सु. हजार असून कपालधारी शैव आणि पाशुपत लोकही येथे होते. कपिशा (पंजशीर व घोरबंद यांच्या संगमाजवळील आधुनिक बेग्राम) ही या देशाची राजधानी असून ती मध्य आशियातील त्याकाळची प्रमुख बाजारपेठ होती. त्यामुळे अनेक प्रकारच्या निरनिराळ्या वस्तूंची येथे आयात होत असे. हा देश केशर, गहू, फळे, इमारती लाकूड व घोडे यांसाठी प्रसिद्ध होता.
जोशी, चंद्रहास