कन्या : (व्हर्गो). भारतीय राशिचक्रातील सहावी रास. उत्तराचे शेवटचे तीन चरण (चतुर्थांश), हस्त नक्षत्र व चित्राचे पहिले दोन चरण अशी सव्वादोन नक्षत्रे या राशीत येतात. एका हातात गव्हाची लोंबी व दुसऱ्यात अग्‍नी घेऊन नौकेत उभी असलेली स्त्री ही या राशीची आकृती समजतात. कन्येचा स्वामी बुध आहे व तेथेच तो उच्च समजतात. तिच्यात सहाव्या प्रतीपर्यंचे [Ž→ प्रत] त्रेचाळीस तारे आहेत. ही रास २५ मेच्या सुमारास रात्री नऊ वाजता मध्यमंडलावर (खगोलाचे ध्रुवबिंदू व खमध्य यांतून जाणाऱ्या खगोलावरील वर्तुळावर) येते. यातला चित्रा (स्पायका) हा तारा (प्रत १⋅२१) सूर्यापेक्षा तेजस्वी आहे. गॅमा हे तारकायुग्म आहे. या राशीच्या उत्तर भागात शेकडो अभ्रिका दिसतात. एम-९९ ही एक सर्पिल अभ्रिका त्यांच्यापैकीच आहे. शरत्‌ संपातबिंदू (सूर्य आपल्या वार्षिक भासमान गतीमध्ये शरद ऋतूत जेथे खगोलीय विषुववृत्त ओलांडतो तो बिंदू) याच राशीत असतो. १६ सप्टेंबरला निरयन (संपातचलन लक्षात न घेता) व २१ ऑगस्टला सायन (संपातचलन लक्षात घेऊन) कन्या राशीत सूर्यप्रवेश होतो. गुरू कन्या राशीत असला म्हणजे त्या वर्षाला कन्यागत म्हणतात. सुमारे १२-१३ वर्षांनी असे वर्ष येते. यावर्षी भागीरथी कृष्णेला भेटावयास येते अशी भावना आहे. या कालात कृष्णा व भागीरथी यांच्या मधल्या प्रदेशात विवाह करू नयेत असा संकेत आहे.

पहा : राशिचक्र.

ठाकूर, अ. ना.