कार्नो, निकोलास लेओनार्ट सादी : (१ जून १७९६—२४ ऑगस्ट १८३२). फ्रेंच भौतिकीविज्ञ आणि अभियंते, ऊष्मागतिकीविषयी (उष्णता आणि यांत्रिक व इतर रूपांतील ऊर्जा यांच्यातील संबंधाचे गणितीय विवरण करणाऱ्या शास्त्राविषयी) महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला आणि शिक्षण एकोल पॉलिटेक्निकमध्ये झाले. १८१७—२८ या काळात त्यांनी सैन्याच्या अभियांत्रिकी विभागात काम केले.
त्यांनी १८२४ मध्ये एका निबंधाद्वारे आवर्तनात कार्य करणाऱ्या एका आदर्श एंजिनाची कल्पना मांडली. लॉर्ड केल्व्हिन यांनी पुढे १८४८ मध्ये या महत्त्वाच्या कल्पनेचा पुरस्कार केला. निरंतर गतीच्या अशक्यतेच्या आधारे कार्नो यांनी असे सिद्ध केले की, ऊष्मागतिक एंजिनापासून उपलब्ध होणारे कार्य हे फक्त ज्या दोन पदार्थांत उष्णतेचा विनिमय होतो त्यांच्या तपमानातील फरकावर अवलंबून असते. या सिध्दांताद्वारे त्यांनी अभिजात ऊष्मागतिकीचा पाया घातला. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.
पहा : ऊष्मागतिकी.
भदे, व.ग.