कार्तिकस्नान : कार्तिकमासातील धार्मिक कृत्य. आश्विन पौर्णिमेपासून कार्तिकस्नानास प्रारंभ करुन एक महिनाभर म्हणजे कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे करावयाचे असते. आश्विन शुल्क दशमी अथवा एकादशीपासूनही प्रारंभ करतात. दोन घटका रात्र शिल्लक असतानाच जलाशयावर जाऊन, संकल्प आणि विष्णुदेवतेचे स्मरण करुन स्नान करावयाचे असते. स्नानानंतर पाण्यात दिवे सोडतात. महिनाभर स्नान करणे शक्य नसल्यास, शेवटचे पाच अथवा तीन दिवस तरी ते करावे असे सांगितले आहे. कुरुक्षेत्र, पुष्कर, काशी इ. पवित्रक्षेत्री कार्तिकस्नान केले असता विशेष फल मिळते अशी श्रध्दा आहे.
जोशी, रंगनाथशास्त्री