काराकोरम : हिमालय पर्वतश्रेणीचा पश्चिमेकडील अत्यंत महत्त्वाचा भाग. ३४° उ. ते ३७° उ. व ७४° पू. ते ७८° पू. संस्कृत वाङ्मयात यास कृष्णगिरी असे नाव आहे. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने या पर्वताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तो अफगाणिस्तानच्या सीमेपासून सु.४८० किमी. आग्नेयीकडे श्योक नदीपर्यंत पसरलेला आहे. यातील ५,६५४ मी. उंचीवरील, काश्मीर–सिंकियांग मार्गावरील काराकोरम खिंड इतिहासप्रसिद्ध आहे. काराकोरमच्या चार प्रमुख रांगा आहेत : विशाल काराकोरम किंवा मुझताघ काराकोरम, अधिल काराकोरम, कैलास काराकोरम व लडाख.
काराकोरम पर्वतीय प्रदेशाची शास्त्रीय पहाणी १८५८ च्या सुमारास त्यावेळच्या सर्व्हे ऑफ इंडियाच्या भूमापन विभागाने प्रथमच करून ठेवली आहे. काराकोरममधील सर्वांत उंच शिखर व जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अत्युच्च शिखर के-टू ८,६११ मी. उंच असून, ते पूर्वी मौंट गॉडवीन ऑस्टिन या नावाने ओळखले जात असे. या पर्वतश्रेणीतील जवळजवळ ३३ शिखरे सर्वसाधारणपणे ७,००० मी. पेक्षा अधिक उंच आहेत. या प्रदेशातील हिस्पार, बालतोरो, बिआफो, स्याचेन आणि रोमो या हिमनद्या फार मोठ्या आहेत. ६६ किमी. लांबीची फेडचेंको हिमनदी ही विशेष प्रसिद्ध आहे. ६० किमी. लांबीच्या बालतोरो हिमनदी प्रदेशात ८,००० मी. पर्यंत उंचीच्या जगातील एकूण १४ शिखरांपैकी ४ शिखरे आढळतात : के-टू ८,६११ मी., हिडन पीक ८,०६८ मी., ब्रॉडपीक ८,०४७ मी. व गाशेरब्रुम-दुसरे ८,०३५ मी., रकपोशी ७,७८८ मी. आणि हारमोश ७,३९७ मी. ही दुसरी महत्त्वाची शिखरे आहेत. उंच पर्वतशिखरे व जलद वहाणाऱ्या हिमनद्या हे या पर्वतश्रेणीचे वैशिष्ट्य होय. अनेक मध्यहिमोढांची निर्मिती हिमनद्यांच्या प्रवाहमार्गात आढळून येते. स्याचेन हिमनदी पुढे नुब्रा नदीला मिळते तिला अनेक उपप्रवाह येऊन मिळत असल्यामुळे जवळजवळ १२ मध्यहिमोढांची निर्मिती होते. रीओ हिमनदीही वेगळ्याच प्रकारची आहे. ती उत्तरवाहिनी यार्कंद व दक्षिणवाहिनी श्योक या दोहोंनाही पाणीपुरवठा करते.
काराकोरमचा दक्षिण भाग हा ग्रॅनाइटी आणि स्फटिकी खडकांचा बनलेला असून सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरला आहे. अधून मधून रूपांतरित आणि स्तरिक खडक आढळतात. ट्रायसिक चुनखडीचाही समावेश यात होतो. उंच पर्वतीय शिखरांच्या प्रदेशात रूपांतरित आणि स्तरित खडक एकमेकांत मिसळलेले आढळतात. परंतु यात स्तरित खडक सर्वांत महत्त्वाचे आहेत. काराकोरम खिंडीच्या भागात विशेषतः ट्रायासिक आणि क्रिटेशस खडक आढळून आले आहेत. पूर्वेकडील भाग मात्र जुरासिक थरांचा बनलेला आहे. मधूनच तृतीयक थर आढळतात. बरीचशी शिखरे ही तीव्र उताराची श्रृंगे आहेत.
पश्चिमेकडील थंड हवामान वैशिष्ट्यामुळे बऱ्याच हिमनद्या खाली पर्वतउतारावर येतात. पूर्वेकडे मात्र त्यामानाने हिमनद्या उंच प्रदेशातच आढळतात.
काराकोरम पर्वतश्रेणीतील दऱ्याखोऱ्यांचा भाग उन्हाळ्यात अत्यंत उष्ण असतो. परंतु रात्री दिवसांपेक्षा अत्यंत थंड असतात. या दऱ्यांखोऱ्यांतील तुटलेले व विस्कळीत दगड कदाचित अशा हवामानाचे परिणाम असू शकतील. ब्राल्डू आणि बाशा या शिगारच्या उपनद्या असून त्यांच्या दरीमार्गात अशाच विस्कळीत दगडांची भूमी आढळते. एकंदरीत सर्व नदीदऱ्या या भागात सपाट तळाच्या असल्यामुळे मानव वसाहतीस योग्य आहेत.
स्टेप प्रकारचा आणि अर्ध वाळवंटीय भूप्रदेश हा काराकोरम पर्वतश्रेणीचा विशेष म्हणावा लागेल. अधून मधून फक्त दऱ्यांखोऱ्यांतून जलसिंचन सुविधेमुळे फळांच्या बागा मरुद्यानांसारख्या भासतात. ब्राल्डूदरीतील आश्कोल हे असेच एक मरूद्यान आहे. हे काराकोरममधील सर्वांत जास्त उंचावरील वस्तीचे ठिकाण आहे.
खातु, कृ. का.
“