काराकुम : रशियामधील विस्तीर्ण वाळवंट. हे तुर्कमेन प्रजासत्ताकात आग्नेय–वायव्य पसरलेले असून, त्याच्या नावाचा अर्थ ‘काळे वाळवंट’ असा आहे. क्षेत्रफळ २,८४,९००० चौ.किमी. ह्याचे वायव्येस उश्त-उर्त पठार, ईशान्येस अमुदर्या नदी, दक्षिणेस कोपेतदा पर्वत व पश्चिमेस कॅस्पियन समुद्रकिनारा आहे. येथे वाळू अशी फारशी आढळत नाही. वाळूसारखी माती बरीच आढळते. विहीरींमधून पाणी मिळते, पण तेही खारे असते. येथील भटके लोक शेळ्या, उंट व सुप्रसिद्ध काराकुल मेंढ्या पाळतात. या वाळवंटात तेद्झेन व मुरगाब नावाची मरूद्याने असून ट्रान्सकॅस्पियन लोहमार्ग यातून जातो. स्येर्नी झव्हॉट व दरवाझा येथे गंधक सापडते. येथे हरिण, लांडगा, रानमांजर, रानउंदीर हे प्राणी बरेच असून हिवाळ्यात पक्षी पुष्कळच असतात. अमुदर्या व कॅस्पियन यांना जोडणाऱ्या कालव्याचा प्रकल्प स्थगित झाला असला, तरी वाळवंटाच्या आग्नेय भागातून जाणाऱ्या काराकुम कालव्याची बरीच प्रगती झाली आहे.
लिमये, दि.ह.