कसकस : स्तनिवर्गाच्या मार्सुपिएलिया गणातील फॅलँजरिडी कुलातला प्राणी. हा फॅलँजर वंशाचा असून याच्या सु. सात जाती आहेत. न्यू गिनी, बिस्मार्क द्वीपसमूह, सॉलोमन बेटे, क्वीन्सलँड इ. ठिकाणी कसकस आढळतात. हे अरण्यात आणि झुडपांच्या दाट जंगलात राहणारे वृक्षवासी प्राणी आहेत. कसकसच्या सामान्य जातीचे शास्त्रीय नाव फॅलँजर मॅक्युलेटस असे आहे. कसकस पांढऱ्या, तांबूस, फिक्कट पिवळ्या, गडद तपकिरी, काळ्या इ. विविध रंगांचे असतात. एकाच जातीच्या कसकसांचे रंगदेखील सारखे नसतात.

कसकस

शरीर मजबूत पण स्थूल असून डोक्यासकट त्याची लांबी ३५–६५ सेंमी आणि शेपटीची २४–६० सेंमी असते अंगावरील केस दाट व मऊ लोकरीसारखे असतात डोळे बटबटीत, कान लहान आणि नाक चकचकीत पिवळे असते. पायांची बोटे सारख्या लांबीची नसून त्यांच्यावर लांब, वाकडे नखर (नख्या) असतात. शेपूट परिग्राही (पकडण्याच्या उपयोगी) असून त्याच्या टोकाकडील भागावर केसांच्या ऐवजी खवले असतात. मादीला मोठी भ्रूणधानी (विकास पावणारी अंडी, भ्रूण अथवा पिल्ले ठेवण्याकरिता असणारी उदरावरील पिशवी) असून तिच्यात चार स्तनाग्रे असतात. भ्रूणधानीमध्ये एकाच वेळी २–४ पिल्ले आढळली आहेत.

कसकस दिवसा झाडावर किंवा झाडाच्या ढोलीत झोपतात आणि रात्री बाहेर पडतात. यांच्या सगळ्याच हालचाली मंद असतात. यांचे मुख्य खाद्य फळे व पाने होय, पण ते किडे, पक्षी व त्यांची अंडी देखील खातात.

भट, नलिनी