कनिंगहॅम, सरअलेक्झांडर : (२३ जानेवारी १८१४ — २८ नोव्हेंबर १८९३). भारतीय पुराणवस्तुसंशोधनसर अलेक्झांडर कनिंगहॅमसर अलेक्झांडर कनिंगहॅम खात्याचा पहिला संचालक व एक ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. इंग्‍लंडमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात वेस्टमिन्स्टर येथे जन्मला. तो वयाच्या एकोणिसाव्या वर्षी बंगालमध्ये काही अभियंत्यांच्या तुकडीतून कमिशन घेऊन आला आणि पुढे त्याने १८३३ ते १८६२ पर्यंत सु. २८ वर्षे हिंदुस्थानातील ईस्ट इंडिया कंपनीच्या भूसेनेत निरनिराळ्या हुद्यांवर काम केले. अखेर हिंदुस्थानातच मेजर जनरल होऊन तो निवृत्त झाला. ह्या काळात त्याचा समकालीन पुरातत्त्वज्ञ जेम्स प्रिन्सेप ह्याच्याशी निकटचा परिचय झाल्यामुळे त्यास उत्खनन-संशोधनाचा व्यासंग जडला आणि त्याने नाणकशास्त्र व इतिहास या विषयांचा अभ्यास केला. प्रथम त्याने १८३७ मध्ये सारनाथला भेट देऊन तिथे उत्खनन केले. पुढे लष्करातील काही कामानिमित्त त्यास काश्मीर व लडाख ह्या भागांत जावे लागले त्यावेळी त्याने तेथील मंदिरांचा अभ्यास करून मंदिरांच्या वास्तुशिल्पांवर एक विस्तृत निबंध लिहिला. तसेच १८५० मध्ये त्याने सांचीचा स्तूप पाहिला आणि तेथे उत्खनन करून त्यावर एक पुस्तक प्रसिद्ध केले. त्याच्या शिफारशीवरूनच पुढे हिंदुस्थानातील प्राचीन वास्तूंचा आढावा घेण्यात आला आणि तेव्हाचे व्हाइसरॉय लॉर्ड कॅनिंग ह्यांनी उत्तर हिंदुस्थानकरिता पुराणवस्तुसंशोधन खाते स्थापन केले. त्या खात्याचे प्रमुख म्हणून कनिंगहॅमची १८६२ मध्ये नियुक्ती करण्यात आली. प्राचीन अवशेषांची पाहणी करणे, त्यांच्याशी संलग्न असलेला इतिहास व परंपरा ह्यांची नोंद करणे, ही कामे त्याच्यावर सोपविण्यात आली. १८६२ ते ६५ च्या दरम्यान कनिंगहॅमने उत्तर हिंदुस्थानातील अनेक प्राचीन स्थळांची पाहणी केली. परंतु त्याचे कार्य वाढत असतानाच, लॉर्ड लॉरेन्स याने हे पद रद्द केले. त्यामुळे कनिंगहॅमच्या कार्यात काही काळ खंड पडला. पण १८७० मध्ये लॉड मेयोने ही जागा पुन्हा प्रस्थापित करून कनिंगहॅमलाच दिली. यानंतर कनिंगहॅमने ह्युएनत्संगाने उल्लेखिलेल्या या स्थळांची पाहणी करून अवशेषांच्या द्वारे त्यांची निश्चिती करण्याचा प्रयत्‍न केला. आपल्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत त्याने नाणकशास्त्र, भूगोल या विषयांवर तसेच, मंदिरे, स्तूप वगैरे वास्तूंसंबंधी अनेक पुस्तके लिहिली. ह्याशिवाय पुरातत्त्वखात्यातर्फे करण्यात आलेल्या संशोधनकार्याचे सु. २१ वृत्तांत (अहवाल) प्रसिद्ध केले. त्याने लिहिलेल्या बहुविध पुस्तकांपैकी कॉर्पस इन्स्क्रिप्शन्स (१८७७), कॉइन्स ऑफ इंडिया (१८९१), एन्शंट जीआग्राफी ऑफ इंडिया (१८७१), बुक ऑफ इंडियन इराज (१८९२) इ. प्रसिद्ध आहेत. त्याने भारहूतचा स्तूप व बोधगया येथील बौद्ध अवशेष यांचा अभ्यास व सर्वेक्षण करून त्यांवरही संशोधनपर लेख प्रसिद्ध केले.  त्याच्या कारकीर्दीत मुख्यत्वे सर्वेक्षण, उत्खनन आणि अवशेषांचे जतन ह्या गोष्टींवरच विशेष भर देण्यात आला. कारण त्यावेळी अवशेष झपाट्याने  उपलब्ध होत गेले. त्यामुळे त्याचा शास्त्रीय दृष्ट्या उत्खनन करण्याकडे व कालनिश्चितीकडे विशेष कल नव्हता. परंतु एवढे मात्र खरे, की भारतीय  पुरातत्त्वविषयक विविध शाखांतील संशोधनाचा पाया त्याने घातला.

सर अलेक्झांडर कनिंगहॅम

संदर्भ :Roy, Sourindranath, The story of Indian Archaeology, 1784-1947, New Delhi, 1961. 

देव, शां. भा.