कननोर :  केरळमधील जिल्ह्याचे ठिकाण व अरबी समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ५५,१६२ (१९७१). हे कालिकतच्या ८० किमी. उत्तरेस असून केरळमधील कापड-होजिअरी धंद्याचे केंद्र समजले जाते. येथे नुकताच प्लायवुडचा मोठा कारखाना उभारला गेला आहे. याशिवाय आगपेट्या, फर्निचर इत्यादींचे उद्योग येथे असून काथ्या, खोबरे, लाकूड, मसाल्याच्या वस्तू आदींची येथून निर्यात होते. मध्ययुगात अरबी व्यापाऱ्यांची ही महत्त्वाची उतारपेठ होती. मलबारच्या इतिहासात कननोरला महत्त्वाचे स्थान आहे. पोर्तुगीज, डच व इंग्‍लिश व्यापाऱ्यांच्या येथे वखारी होत्या. येथून जवळच तालिपरंबा येथे भातसंशोधन केंद्र आहे.

शाह, र. रू.