कदंब वंश : दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तर कानडा (कॅनरा) प्रदेशातील एक प्राचीन वंश. ह्या वंशातील राजांनी उत्तर कानडा,हानगल, गोवा व त्याच्या जवळपासच्या प्रदेशांवर ३४० ते ६१० च्या दरम्यान, जवळजवळ अडीचशे वर्षे राज्य केले. त्यांच्या लेखांवरून त्यांच्या वंशाची काहीशी कल्पना येते, मात्र त्यांच्या काळाविषयी निश्चित माहिती मिळत नाही. या वंशाला कदंब हे नाव त्याच्या मूलस्थानाजवळ वाढलेल्या कळंब वृक्षावरून पडले, असे काकुस्थवर्म्याच्या ताळगुंद येथील स्तंभलेखात म्हटले आहे. या वंशाचा मूळ पुरुष मयूरशर्मा हा वेदाभ्यासाकरिता पल्लवांच्या राजधानीत गेला असता, तेथे त्याचा पल्लवांच्या एका अधिकार्याशी कलह होऊन त्याला ब्राह्मणजातीच्या असहायतेची जाणीव झाली. म्हणून त्याने क्षत्रिय पेशा स्वीकारून सीमेवरच्या अधिकाऱ्याचा पराभव केला, बाण राजांना जिंकले आणि उत्तरेस श्रीशैलपर्यंत आपला अंमल बसविला. तेव्हा पल्लव राजाने त्याच्याशी संधी करून त्याला पश्चिम किनाऱ्याचा वैजयंती (उत्तर कानडा जिल्ह्यातील वनवासी) जवळचा प्रदेश दिला. मयूरशर्मा ३४० – ३७० ह्या दरम्यानच्या काळात होऊन गेला. त्याने वनवासी ही राजधानी करून स्वतंत्र राज्य स्थापन केले.
मयूरशर्म्याचा कर्नाटक प्रदेशातील चित्रदुर्ग जिल्ह्यात चन्द्रवळ्ळी येथे एक शिलालेख सापडला आहे. त्याचा काळ सु. ३५० आहे. त्यात त्याने त्रैकूटक, आभीर, पल्लव, शक, सेंद्रक इत्यादिकांवर मिळविलेल्या विजयांचा निर्देश आहे. मयूरशर्म्याचा पुत्र कंगवर्मा (३७० — ३९५) याने ब्राह्मणत्वद्योतक शर्म उपपदाचा त्याग करून वर्मोपपदान्त नाव धारण केले आणि धर्ममहाराजाधिराज ही पदवी धारण केली. तीच प्रथा त्याच्या वंशजांनी चालू ठेवली. कदंब राजे स्वतःस मानव्य गोत्री आणि हारीतीपुत्र म्हणवीत. कंगवर्म्याचा मुलगा भगीरथ (३९४ — ४२०) हा कुंतल प्रदेशाचा स्वामी असावा.
कंगवर्म्याचा नातू काकुस्थवर्मा (सु. ४३० – ४५०) याच्या एका लेखात त्याने गुप्तादिराजकुळात आपल्या मुली देऊन त्यांना संपन्न केले, असे म्हटले आहे पण त्यात अतिशयोक्ती वाटते.
काकुस्थवर्म्याच्या मृत्यूनंतर कदंब वंशात शांतिवर्मा (४५० – ४७५) व कृष्णवर्मा ह्या काकुस्थवर्म्याच्या दोन मुलांत दोन शाखा होऊन वडील शाखा वैजयंतीहून आणि धाकटी शाखा पलाशिका (हळशी) येथून राज्य करू लागली. यांची पल्लव व पश्चिमेच्या गंग राजांशी वारंवार युद्धे होत.
काकुस्थवर्म्याचा नातू वनवासीचा मृगेशवर्मा (सु. ४७५ – ४९०) हा विद्वान असून हस्तिविद्या आणि अश्वविद्या यांत निष्णात होता. ह्याने गंग व पल्लव राजांचा पराभव केल्याचे निर्देश तत्कालीन लेखांत आढळतात. त्याचा कल जैन धर्माकडे होता. त्या वेळी कदंबाच्या आधिपत्याखाली जैन धर्माचा बराच प्रसार झाला. त्यानंतर मांधातृवर्मा (सु. ४९० – ४९७) ह्या कुमारवर्म्याच्या मुलाने (शांतिवर्मा याचा पुतण्या) काही काळ कदंबांच्या सत्तेचा उपभोग घेतला. मात्र मृगेशवर्म्याचा पुत्र रविवर्मा (सु. ४९७ — ५३७) याने धाकट्या शाखेच्या राजाचा पराभव करून त्याला आपला मांडलिक बनविले होते. याचा पुत्र हरिवर्मा (सु. ५३७ – ५४७) याच्या कारकीर्दीत त्याचा मांडलिक बदामीचा पहिला पुलकेशी याने आपले स्वातंत्र्य पुकारले. हरिवर्म्याचा पराभव धाकट्या शाखेच्या दुसऱ्या कृष्णवर्म्याने करून त्याचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला. अशा रीतीने या ज्येष्ठ शाखेचा अस्त झाला.
धाकट्या शाखेचा मूळ पुरुष पहिला कृष्णवर्मा (सु. ४७५ – ४८५) याने अश्वमेध यज्ञ करून आपली सत्ता प्रबळ केली होती, पण तो पल्लवांबरोबरच्या युद्धात मारला गेला. त्याचा पुत्र विष्णुवर्मा (सु. ४८५ – ४९७) याला पल्लवांचे स्वामित्व कबूल करावे लागले. त्याचा नातू दुसरा कृष्णवर्मा (सु. ५४० – ५६५) यानेही अश्वमेध यज्ञ केला. पण त्याचा पुत्र अजवर्मा (सु. ५६५ – ६०६) याचा उच्छेद बदामीच्या पहिल्या कीर्तिवर्म्याने केला. ऐहोळे येथील शिलालेखात कीर्तिवर्म्याला कदंब राजवंशाची काळरात्र असे म्हटले आहे. अजवर्म्याचा पुत्र भोगिवर्मा (सु. ६०६ – ६१०) ह्याने आपल्या वंशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा बदामीच्या दुसऱ्या पुलकेशीने पराजय करून वनवासी ही राजधानी उद्ध्वस्त केली व कदंबांचे राज्य आपल्या राज्यात समाविष्ट केले. ह्या घटनेचा ऐहोळे येथील कोरीव लेखात उल्लेख आहे.
संदर्भ :Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.
मिराशी, वा. वि.