कण्व(काण्व) वंश : उत्तर हिंदुस्थानातील प्राचीन मगध प्रदेशावर इ. स. पू. ७५ ते इ. स. पू. ३० च्या दरम्यान राज्य करणारा एक प्राचीन ब्राह्मण वंश. त्यास काण्वायन असेही म्हणतात. या राजांनी ४५ वर्षे राज्य केले. त्यांच्या शासनकालाविषयी विद्वानांत मतभेद आहेत. त्यांच्या विषयीची थोडीबहुत माहिती पुराणे व बाणभट्टाचे हर्षचरित ह्यांतून मिळते. पुराणांत त्यांना शुंगभृत्य म्हटले आहे. त्यावरून सर रा. गो. भांडारकरांनी तर्क केला की, शेवटचे शुंग राजे व कण्व हे समकालीन होते आणि उत्तरकालीन पेशव्यांप्रमाणे कण्वांनी आपले अधिपती शुंग राजे यांचे नाममात्र स्वामित्व स्वीकारून खरी सत्ता बळकाविली. रॅप्सननेही हेच मत प्रतिपादिले होते, पण ते बरोबर दिसत नाही. पुराणांतील माहितीप्रमाणे शेवटच्या देवभूतिनामक शुंग राजाला एका वसुदेवनामक काण्वायन ब्राह्मणाने ठार मारून सत्ता बळकाविली. बाणाने आपल्या हर्षचरितात या प्रसंगाविषयी जास्त माहिती दिली आहे. तिजवरून असे दिसते की, शेवटचा शुंग नृपती देवभूती हा अत्यंत स्त्रीलंपट होता. म्हणून त्याच्या वसुदेवनामक अमात्याने त्याच्या दासीच्या कन्येला राणीचा वेश देऊन तिच्याकडून तो मदनपरवश असताना त्याचा घात करविला.
पुराणांत पुढील चार कण्व राजांची नावे आणि त्यांच्या कारकीर्दीची वर्षे दिली आहेत : काण्वायन द्विज वसुदेव – ९ वर्षे त्याचा पुत्र भूमिमित्र -१४ वर्षे त्याचा पुत्र नारायण – १२ वर्षे आणि त्याचा पुत्र सुशर्मा – १० वर्षे.
कण्वांच्या राज्याचा विस्तार शुंगांच्या राज्याच्या मानाने पुष्कळच कमी होता. त्यांच्या काळी पंजाब ग्रीकांच्या अंमलाखाली गेला होता. मगधाच्या पश्चिमेच्या भागात उत्तर प्रदेशात अनेक मित्रनामक राजांनी आपली छोटी छोटी स्वतंत्र राज्ये स्थापिली होती. तसेच मध्य भारताचा काही भाग विदिशेच्या उत्तरकालीन शुंग राजांच्या ताब्यात होता असे दिसते. तेव्हा कण्वांचे राज्य सामान्यतः मगधापुरतेच मर्यादित असावे.
पुराणे सांगतात की, शेवटी दक्षिणेच्या आंध्रभृत्यांनी किंवा सातवाहन राजांनी काण्वायनांच्या तसेच शुंगांच्या अवशिष्ट सत्तेचाही उच्छेद करून सम्राटपद बळकावले.
कण्वांच्या राजवटीविषयी विशेष माहिती मिळत नाही. तथापि शुंगांप्रमाणेच तेही ब्राह्मणजातीय असल्याने त्यांच्या काळी वैदिक धर्माला आणि संस्कृत विद्येला राजाश्रय मिळाला असावा. मनुस्मृतिसारख्या धर्मग्रंथांची निर्मिती याच काळात झाली असावी, असे मानले जाते.
मिराशी, वा. वि.