कामरूख:(गु. कामरूख हिं. कामरंग, कारमल क. दरेहुळ्ळी, किरिहुली इं. कॅरंबोला ॲपल, कोरोमंडल गूजबेरी लॅ. ॲव्हरोआ कॅरंबोला कुल-ऑक्सॅलिडेसी). सु. ४⋅५ ते ९⋅५ मी. उंची असलेल्या या लहान वृक्षाचे मूलस्थान मोलुकाज (इंडोनेशिया) असून त्याचा प्रसार भारतात सर्वत्र व इतर उष्ण प्रदेशात (द. कॅलिफोर्निया, वेस्ट इंडीज इ.) झाला आहे. शोभेकरिता व खाद्य फळाकरिता त्याची बागेत लागवड करतात. त्याच्या फांद्या लोंबत्या व दाटीने राहतात. साल करडी पाने एकांतरित (एकाआड एक), संयुक्त व विषमदली पिच्छाकृती (पिसासारखी) दले ५ – ११ व स्पर्शग्राही (स्पर्शाला संवेदनशील असणारी) प्रत्यक्ष खोडापासून किंवा पानांच्या बगलेतून पांढऱ्या जांभळ्या फुलांच्या मंजऱ्या मे-ऑगस्टमध्ये येतात. या वृक्षाच्या (आणि ॲव्हरोआ बिलिंबी या लहान वृक्षाच्या) वंशाचा समावेश काही वनस्पतिशास्त्रज्ञांनी जिरॅनिएसी कुलात (→ जिरॅनिएलीझ) केला असून अलीकडे बहुतेकांनी ऑक्सॅलिडेसी कुलात केला आहे. फुलात पाच परिहित संदले, पाच परिवलित, सुटी प्रदले दहा केसरदलांपैकी पाच लहान व वंध्य पाच किंजदले किंजपुट संयुक्त, पाच कप्प्यांचा (→ फूल) मृदुफळ लंबगोल, पिकल्यावर पिवळे, पंचकोनीय, ७⋅५ – १२⋅५ सेंमी. लांब, सुवासिक व आंबट गोड असते थंडीच्या मोसमात ती भरपूर येतात. बिया अनेक व अध्यावरण (बीजाच्या देठापासून त्यावरील सूक्ष्म छिंद्रांच्या जवळील भागापासून तयार झालेली वाढ) युक्त असतात. पिकलेल्या फळापासून जेली, मुरंबे व सुमधुर पेये करतात आंबट व गोड मगज्ज (गर) असलेली फळे येणारे असे दोन प्रकार असतात. आंबट मगजाच्या फळांचे लोणचे करतात. फळांचा रस पितळी भांड्यांना चकाकी आणण्यास वापरतात कपड्यांवरील डाग या रसाने घालवितात. सुकी फळे शीतकर, पाचक, स्कर्व्हीनाशक (क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारा रोग शमविणारी) असून ती ज्वरामध्ये देतात. पक्व फळ रक्ती मूळव्याधीवर, तहान शमविण्यासाठी व ज्वरोत्पन्न क्षोभावर उपयुक्त. नवीन लागवड बियांपेक्षा गुटी कलमांनी करतात. सुंदरबनात याचे लाकूड घर बांधणीस व किरकोळ सजावटी सामानास वापरतात. कच्ची फळे रंगबंधक म्हणून वापरतात. बिलिंबी या याच वंशातील लहान वृक्षाची फळे फार आंबट असून त्यांचे लोणचे घालतात. द. अमेरिकेत त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
जमदाडे, ज. वि.