कथकळि नृत्य : एक अभिजात भारतीय नृत्यप्रकार.केरळमधील नृत्यनाट्याची परंपरा फार जुनी आहे.काळाच्या ओघाबरोबर ह्या नृत्यनाट्यांनी नवनवी रूपे धारण केली व त्यातूनच सध्याच्या कथकळीचा उदय झाला.मुटियाट्टम्‌ व कूटियाट्टम्‌ ही केरळची पुरातन नृत्यनाट्ये होत.त्यांतील पात्रे स्वतः गाऊन व बोलून अभिनय करीत.त्यानंतरचे चाक्यार कूत्तू हे नृत्य अधिक प्रगत होते.ह्या परंपरेस अनुसरून १६५७ मध्ये कालिकतचा (कोळीकोडे) राजा झामोरीन याने कृष्णाच्या जीवनावर आधारित असे नृत्यनाट्य तयार केले त्याला कृष्णनाट्टम्‌ म्हणत.   कृष्णनाट्टम्‌ फक्त गुरुवायूर (नवनीतगोपाळ) मंदिरात होत असे.कोट्टारक्करा देशाचा राजा त्याने प्रभावित झाला.त्याने आपल्या राज्यातून दोन ब्राह्मण बोलाविले.हा राजा स्वतः ही उत्तम नट होता.त्याने ब्राह्मणांच्या मदतीने एक नवीन नृत्यनाट्य तयार केले ते रामनाट्टम्‌ नृत्य होय.पूर्वी मुखवटे वापरण्यात येत त्यांऐवजी ह्या नृत्यात रंगभूषेचा वापर करण्यात येऊ लागला.ज्या हस्तमुद्रा होत्या, त्या अधिक अर्थपूर्ण आणि विकसित करण्यात आल्या.वाद्यवृंदामध्ये बदल होत गेले.तेव्हापासून पात्रांनी स्वतः गाणे व संवाद म्हणणे बंद झाले.वाद्यवृंदामध्ये दोन स्वतंत्र गायकांचा समावेश करण्यात आला.ह्या नव्या बदलांमुळे नृत्यप्रयोगाची गती व उत्कटता वाढली.ह्या नृत्यनाट्यात प्रभू रामचंद्राच्या जीवनावरील कथा नृत्यांकित केलेल्या असतात.ह्याच कृष्णनाट्टम्‌ व रामनाट्टम्‌ नृत्यनाट्यांतून आज प्रचलित असलेले  कथकळी नृत्य निर्माण झाले.

रंगभूषा: कथकळीच्या रंगभूषेमध्ये सफेद (वेळ्‌ळा), पिवळा (मंञा), हिरवा (पच्चा), निळा (नीला), काळा (करुप्प), लाल (चुवप्प) हे सहा रंग वापरतात.सफेद रंग तयार करण्यासाठी ४ ते ६ तास पाण्यात भिजविलेले तांदूळ गंधाप्रमाणे बारीक वाटतात व सायंकाळी रंगभूषेच्या वेळी त्यात ठराविक प्रमाणात खाण्याचा चुना पाण्यात मिसळून एकजीव करतात.इतर रंग खोबरेल तेलात तयार करतात.याशिवाय कोरडे कुंकू व चमक आणण्यासाठी अभ्रकाची पूड वापरतात.कथकळी मध्ये रंगभूषा करणाऱ्याला ‘चुट्टिक्कारन’ म्हणतात.दोन्ही कानशिलांपासून हनुवटीपर्यंत तोंडाच्या खालच्या जबड्यास तांदूळ व चुन्याच्या मिश्रणाने केलेल्या गोलाकार विशिष्ट रंगभूषेला ‘चुट्टी’ अशी संज्ञा आहे.पुरुषपात्रांच्या रंगभूषेचे हे आगळे रूप आहे.चुट्टी लावण्यास फार वेळ लागतो.म्हणून पात्राला यावेळी झोपवूनच चुट्टी लावण्याचा प्रघात आहे.पण हल्ली वेळ वाचविण्यासाठी जाड कागदाची तयार केलेली चुट्टी वापरण्याची पद्धत हळूहळू रूढ होऊ लागली आहे.दुःशासनाला ‘कटेश’ नावाची कागदाची गोलाकार चुट्टी नाकपुड्यांपासून वर कपाळापर्यंत लावतात.समुद्रफेनापासून लिंबाएवढे दोन गोळे करून एक नाकाच्या शेंड्यावर व दुसरा कपाळावर (मुक्केल चुट्टी,नेटि चुट्टी) चिकटवितात.हे दिसण्यास पांढरे असतात.डोळे, भुवया, नाक, ओठ इत्यादींची रंगभूषा संबंधित व्यक्ती स्वतःच करते.एक प्रकारच्या भाजीचे फूल (चुण्टपूव) व तेन मिळाल्यास वांग्याचे फूल घेऊन त्याच्या पाकळ्या काढून टाकून त्यातील फक्त अपक्व फळ तळहातावर घेऊन अंगठ्याने घोळतात.चारपाच मिनिटांनी ते लालसर झाले, की कपड्यात बांधून ठेवतात व प्रयोगापूर्वी त्यातील बी पाण्याने ओली करून तिचे दोन दोन तुकडे दोन्ही पापण्यांच्या पोकळीत एकेक ठेवतात.त्यामुळे चारपाच मिनिटांत डोळे आरक्तवर्ण होतात.

वेषभूषा: पुरुषपात्रे फुगलेल्या परकराप्रमाणे दिसणारा झगा (उटुत्तु केट्ट) घालतात.त्यावर झुली (पट्‌टुवाल-मुन्ती) व सोनेरी कमरबंध (पटियरंञाणम्‌) असतो. भूमिकेनुसार सफेद, लाल, काळे, निळे, केसाळ असे पूर्ण हातांचे जाकीट (कुप्पायम्‌) घालतात.मनगटात कडे, पोची (वळा,कटकम्‌), दंडावर बाहुभूषणे (तोळपूट्ट परत्तिक्कामणी), गळ्यातकोल्लारम्‌, कळुत्तारम्‌, खांद्यावरून सोडलेली चारपाच उपरणी (उत्तरीयम्‌) अशी इतर वेशभूषा असते. उपरण्यांच्या टोकाशी गोंड्यासारखी फुले लावलेली असतात.हल्ली त्यांमध्ये आरसा बसवतात व प्रयोग चालू असताना पात्रे मोठ्या ऐटीत आपली वेशभूषा नीट आहे किंवा नाही, हे आरशात पाहतात.शिरोभूषणही (तोटा किरीटम्‌) वापरले जाते.केस पाठीमागे बांधतात. कपाळावर भालपट्टी व मण्यांच्या माळा (चुट्टित्तुणि, चट्टिनाटा) असतात.घायपात, अंबाडी किंवा ताग यांपासून तयार केलेले कृत्रिम लांबलचक केस(चामरम्‌) लावण्याची पद्धत आहे. सात्त्विक, राजसिक व तामसिक असे पुरुषवेशाचे भेद असतात. त्यांमध्ये थोडाथोडा फरक असतो. पुरुषपात्रे चांदीची कृत्रिम नखेही वापरतात.स्त्रीपात्रांची साधी वेशभूषा सात्त्विक समजली जाते. ब्राह्मण, नारदमुनी साधाच पेहेराव करतात.स्त्रीपात्रे निऱ्या काढलेली साडी छातीपर्यंत धरून कमरेला नाडी बांधून वरील भाग त्यावरून सोडतात.नंतर निऱ्यांचे खालचे टोक उजवीकडून मागे डाव्या बाजूस खोचतात व उजव्या बाजूचे टोक मागून उजव्या बाजूस खोचतात.साडीच्या वरील बाजूच्या निऱ्यांना छोट्याशा पंख्याप्रमाणे कमरेस दोन्हीकडे खोचतात.यावरून तीन सरांचा कमरबंध बांधतात.इतर सर्व आभरणे पुरुषांच्या आभरणांसारखीच असतात. कानांच्या पुढे कर्णपात्रे (कातिला) व डोक्याच्या डावीकडे कलता अंबाडा (कोण्टा) असतो. कपाळावर मोत्यांची माळा बांधतात व शेवटी  अंबाड्यावरून बोटांच्या टोकांपर्यंत पोहोचणारा रेशमी पडदा (उरुमाल) घेतात. भीरू म्हणजे विदूषक.हा आपले कपडे व दागिने उलटे धारण करतो. दाढीवेशात (ताटिवेशम्‌) कली, दुःशासन, हनुमान यांना अनुक्रमे काळी, लाल व सफेद दाढी फक्त अधिक असते. हनुमानाचा मुकुट गोल (वट्टमुटि) असतो.

रंगमंच : काही मंदिरांतून बांधलेले कूत्तंपलम्‌ (रंगमंच), जेथे रंगमंच नसेल, तेथे देवळाचे प्रांगण किंवा एखाद्या अंगणात चार कोपऱ्यांत चार खांब पुरून, वर आडवे बांबू टाकून व त्यावर नारळीच्या विणलेल्या झावळ्या टाकून तयार केलेली जागा रंगमंच म्हणून वापरतात. त्याच्या तीनही बाजूंस लोक बसतात. रंगमंचावर पुढेमागे पडदा नसतो परंतु प्रवेशाच्या सुरुवातीस व शेवटी लुंगी (वेष्टी) नेसलेले दोन पुरुष एक पडदा (तिरशीला) प्रेक्षकांसमोर धरतात. रात्री कार्यक्रमांच्या वेळी नृत्यदीप (कळिविळक्क) म्हणजे सु.सव्वा मी.उंचीची मोठी समई वापरतात. त्या समईतील एक वात नर्तकाकडे व दुसरी वात प्रेक्षकांकडे पेटवून ठेवली, म्हणजे रंगमंचाची सिद्धता झाली. रंगमंचावरील दुसरी वस्तू म्हणजे उरल(लाकडाचे मोठे उखळ). ते उलटे ठेवून त्याचा स्टुलाप्रमाणे उभे राहण्यासाठी व बसण्यासाठी उपयोग करतात. विशिष्ट पात्रे त्यावर एक पाय ठेवून उभी राहिली, की मोठी भारदस्त वाटतात.

संगीत : कथकळीमध्ये पूर्वी सोपान किंवा सोमान संगीत वापरीत.उण्णायी वारियर व इरयिम्मन तंपी यांनी देशी कर्नाटक संगीतपद्धती प्रथम सुरू केली. सध्या हीच पद्धत रूढ आहे. कथकळी मध्ये रागतालांत बद्ध केलेल्या रामायण व महाभारत यांतील एकंदर १३० कथा आहेत. त्यांत वेगवेगळे ५०-६० राम वापरलेले आहेत. तेच गाण्याचा परिपाठ आहे. बहुतेक कथा शृंगारपदाने सुरू होऊन धनाशी (धन्याशी) रागाने संपतात.

 ताल: कथकळी मध्ये फक्त ६ ताल वापरतात.हे केरळ प्रांताचे स्वतंत्रताल समजले जातात.या तालांची नावे अशी : (१) पंचारी, (२) तृपुटा, (३) मुरियटंता, (४) चंपटा, (५) चंपाव (६) अटंता.त्यांच्या अनुक्रमे ६, ७, ७, ८, १०, १४ अशा मात्रा आहेत.

प्रयोग: खेड्यामध्ये कथकळी प्रयोगाची सुरुवात चार प्रकारांनी केली जाते : (१) सूर्यास्ताच्या वेळी तालवाद्ये वाजवितात, त्यास ‘केळिकोट्‌टु’ म्हणतात. (२) प्रयोगाच्या वेळी रंगदीप (अरंगुकेळी) पेटवितात. (३) प्रयोग सुरू होताना वाद्यवृंद पाठीमागे येऊन उभा राहतो. तालवाद्ये सुरू होताच प्रेक्षकांसमोर पडदा धरला जातो. प्रवेशानुक्रमाने पात्रप्रवेश होऊन पडद्याच्या आत ‘तोट्यम्‌’ नावाचा नृत्तप्रकार संपवितात. (४) नंतर वंदन श्लोक (पुरप्पाटु तोळील) होऊन प्रारंभ नृत्य (पुरप्पाट) सुरु होते व क्रमाक्रमाने पडदा खाली आणला जातो. पडदेवाले तो घेऊन निघून जातात.गाणारा सूत्रधाराप्रमाणे कोणाचा प्रवेश होणार हे श्लोकात वर्णन करतो. त्याप्रमाणे प्रवेश होऊन प्रसंगानुसार गीतवाद्यावर अभिनय करतात. मध्येच गाणे थांबवून फक्त तालवाद्यांवर नृत्त करतात. आपले स्वतंत्र कौशल्य दाखविण्यास पात्रांना येथे वाव मिळतो.

नृत्त : कथकळी नृत्तबोलांना ‘कलाशम्‌’ म्हणतात.स्त्रीवेषांनी नाचायची व पुरुषवेषांनी नाचायची कलाशम्‌ वेगवेगळी असतात.त्यांचे पाच प्रकार आहेत : (१) रंगमंचभर गोल फिरण्याचे बोल (वट्टमिट्ट कलाशम्‌), (२) गाण्याच्या दोन ओळींच्या मध्ये येणारे बोल (इरट्टी किंवा इटक्कलाशम्‌), (३)समेवर आल्यानंतर पुन्हा पूरक म्हणून येणारा बोल (अटक्कम्‌), (४) आव्हानाच्या वेळी कोणताही निर्णय घेतल्यावर व प्रवेशाच्या शेवटी घेतला जाणारा बोल (एटुत्तुकलाशम्‌) व (५) वेगवेगळ्या तालांत येणारे मोठे नृत्तबोल (वलियकलाशम्‌ आणि अष्ट कलाशम्‌).


नृत्य: कथकळीमध्ये शब्दार्थ दाखविण्यासाठी वेगवेगळे २४ हस्त असून ७५० मुद्रा आहेत. हे सर्व हस्तलक्षणदीपिका या ग्रंथातून घेतले आहेत. दोन कथकळी नर्तक एकमेकांशी एकही शब्द न बोलता तासन्‌तास बोलू शकतात. शब्दार्थाखेरीज त्यातील व्याकरणही शुद्ध असते. कथकळी नृत्यगीतांचे प्रसिद्ध कवी वळ्ळत्तोळ ऐकू शकत नव्हते परंतु हाताने भरभर बोलण्याइतपत त्यांना हस्तमुद्रांचा सराव होता. वनवर्णन, स्वर्गवर्णन,युद्धाचीतयारी, रथ तयार करणे इ.कथकळीच्या नृत्तनृत्याची खास वैशिष्ट्ये आहेत.

नाट्य : कथकळी नृत्यनाट्याची बैठकच नाट्याची आहे.प्रत्येक पात्र आपली भूमिका इतक्या सफाईने करते, की त्याचा अर्थ प्रेक्षकांच्या अंतःकरणापर्यंत सहजतेने पोहोचतो. काही नर्तकांना त्यांच्या प्रसिद्ध भूमिकांच्या नावानेच लोक ओळखतात. अभिनयात नाट्यधर्म प्राधान्याने असतो,म्हणून कथकळीचा अभिनय जास्त प्रभावी वाटतो.

प्रसिद्ध नर्तक : पांचाली करुणाकर पणिक्कर, तकळी केशव पणिक्कर आशान, कोच्चुपिळ्ळ पणिक्कर आशान, पळ्ळियंपी वेलुपिळ्ळ आशान,गुरू शंकरन्‌ नंपूतिरी,कंटियूर वेलुपिळ्ळ आशान, अंपू पणिक्कर, रामुण्णी मेनन, वेच्चूर रामन्‌पिळ्ळ आशान, कुरुच्ची कुंजन पणिक्कर आशान,मात्तूर कुंजनपिळ्ळ आशान.

सध्याचे थोर नर्तक : चेंगन्नूर रामन्‌पिळ्ळ आशान, वाळेंकट कुंचुनायर, राघवन्पिळ्ळ आशान, कलामंडलम्‌ कृष्णन्‌ नायर, मांकुळम्‌ विष्णू नंपूतिरी, चंपक्कुळम्‌ पाच्चुपिळ्ळ, गुरू गोपिनाथन्‌, गुरू कुंचू कुरूप, गुरू कृष्णन्‌ कुट्टीइ.अनेक थोर नर्तक आजही कथकळी रंगमंचावर आहेत.

सुप्रसिद्ध कथकळी नृत्यकथा लिहिणारे साहित्यिक दीडशे आहेत.त्यांपैकी कोट्टयम्‌ तंपुरान, इरयिम्मन तंपी, पन्निश्शेरी नाणुपिळ्ळ, वळ्ळत्तोळ नारायण मेनन हे विशेष प्रसिद्ध आहेत. 

पार्वतीकुमार

  

कथकळितील 'करुप्प ताटिवेशम्' (काळा दाढीवेश) रंगभूषा. कथकळितील रामाच्या सात्त्विक भूमिकेची 'पच्चा' (हिरवी) रंगभूषा. कथकळितील रावणाची रंगभूषा.
कथकळितील 'चुवप्प ताटिवेशम्' (लाल दाढीवेश) रंगभूषा. एका कथकळि नृत्यनाटच्यतील श्रीकृष्ण-सुदामा भेटीचा प्रसंग.