कडू कवठ : (कडवी कवठ, खष्ट, खैट, कौटी हिं, काष्टेल, कवा क. गरुडफळ, निरदिवित्तुलू लॅ. हिद्नोकार्पस लॉरिफोलियाकुल-फ्लॅकोर्टि एसी ). सु. १२-१५ मी. उंच वाढणारा हा सदापर्णी वृक्ष उष्णकटिबंधातील दाट जंगलात व भारतात (पश्चिम घाटात, कोकणाच्या दक्षिणेस व घाटाखाली कारवार आणि मलबारात) दमट जागी, विशेषतः पाण्याजवळ आढळतो त्रावणकोरमध्ये सामान्यपणे ६२॰ मी. उंचीपर्यंत आढळतो. कोवळ्या भागांवर भुरी लव असते. पाने मोठी साधी, अंडाकृती किंवा लांबट भाल्यासारखी, टोकास निमुळती आणि चिवट फुले पांढरी, एकाकी किंवा मंजरीवर जानेवारी-एप्रिलमध्ये येतात. मृदुफळे कठीण, लवदार, लंबगोल, लिंबाएवढी बिया पुष्कळ, साधारणत: कोनयुक्त.

कडू कवठ (फळासह फांदी)

बियांपासून सु. ४४% मेदी (चरबीयुक्त) तेल (कवटेल, खैटेल) मिळते ते पिवळे पण स्वादहीन व बेचव असून त्यामध्ये हिद्नोकार्पिक अम्ल (४८.७%), चौलमुग्रिक अम्ल (२७%) ओलेइक अम्ल (६.५%) इ. घटक असतात. रासायनिक संघटन व भौतिक गुणधर्म चौलमुग्रा तेलासारखे असतात. ते दिव्यात जाळण्याकरिता व औषधाकरिता फार उपयुक्त असते. त्वचारोग व महारोगावर अत्यंत गुणकारी. फळ श्रीलंकेत माशांना गुंगविण्यासाठी वापरतात. लाकूड पांढरे व बऱ्यापैकी असून तुळया, वासे इत्यादींकरिता वापरतात.

चौलमुग्रा तेल गायनोकार्डीया ओडोरॅटा  व हिद्नोकार्पस कुर्झी  या दोन जातींपासून काढतात पण त्याचे गुणधर्म कमी प्रतीचे असतात.

पहा : चौलमुग्रा;  फ्लॅकोर्टिएसी.

जमदाडे, ज. वि.