कान : श्रवणाच्या इंद्रियाला कान असे म्हणतात. शरीराचा समतोल राखणे हेही अंतर्कर्णाचे कार्य आहे. याचे बाह्य, मध्य व अंतर्कर्ण असे तीन भाग सस्तन प्राण्यांत स्पष्ट दिसतात. सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर (जमिनीवर व पाण्यात वावरणारे) व पक्षी यांत मध्य व अंतर्कर्ण असे दोनच भाग दिसतात. तर जलचरांत फक्त अंतर्कर्णच अस्तित्वात असतो. या लेखात प्रथमत: मानवी कानासंबंधी व त्यानंतर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या आणि मनुष्येतर पृष्ठवंशी प्राण्यांच्या कानांसंबंधी माहिती दिली आहे.

हवेतून आलेल्या ध्वनिलहरी एकत्रित करून बाह्यकर्ण कर्णपटलावर (कानाच्या पडद्यावर) पोहोचवितो. कर्णपटलाचे हे कंपन मध्यकर्णातील अस्थींच्या साखळीने व थोडेफार हवेतून अंतर्कर्णात पोहोचते. सर्पिल कुहरात (अंतर्कर्णातील हाडांनी बनलेल्या नलिकाकार पोकळीत) व श्रोतृ कुहरात (सर्पिल कुहराच्या मध्य भागातील लंबवर्तुळाकार पोकळीत) काही जागी संवेदन ग्राहके (संवेदना ग्रहण करणारी मज्जातंतूची टोके ) असतात. त्यांच्यामार्फत अंगस्थिती (तोल सांभाळण्याच्या दृष्टीने असणारी शरीराची अवस्था) व ध्वनिलहरींमुळे झालेला द्रवदाबातील फरक आपण ओळखू शकतो [→ संस्थिती रक्षण]. पृष्ठवंशी प्राण्यांत समतोलपणाचे ज्ञान श्रवणज्ञानापेक्षा पुरातन आहे. श्रवणाकरिता वापरला जाणारा अंतर्कर्णाचा भाग सस्तन प्राण्यांत जास्त स्पष्ट वाढलेला दिसतो.

बाह्यकर्ण : कर्णपाली (कानाची पाळी) व बाह्यकर्णमार्ग मिळून बाह्यकर्ण बनतो. बाह्यकर्णमार्गाच्या आतल्या टोकाला कर्णपटल असते. कर्णपाली उपास्थीची (मजबूत व लवचिक पेशीसमूहाची कूर्चेची) बनलेली असून तिच्यावर त्वचेचे आवरण असते. कर्णमार्गाचा बाहेरचा भाग उपास्थीचा व आतील अस्थीचा असतो. त्यावर बहुस्तरीय पट्टकीय (एकावर एक थर असलेल्या घट्ट चपट्या) स्तरांचे आवरण अगदी ताणून बसलेले असते. यामुळे त्यावर बारीकसा फोड झाला तरी सुद्धा फार वेदना होतात. या अधिस्तरांत (चपट्या कोशिकांच्या दृढ स्तरांत) लोम (केस) व सूक्ष्म ग्रंथी असतात. त्या ग्रंथी चिकट लालसर स्त्राव निर्माण करतात. घट्ट झालेल्या स्त्रावास कानातील मळ म्हणतात. मार्गाची लांबी सु. २४मिमी. असून तो नागमोडी असतो.

कर्णदर्शिकेतून (कानाच्या आतील भागाच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या नळीतून) बाह्यकर्णमार्गात पाहिल्यास मोतिया रंगाचे कर्णपटल दिसते. ते हाडाच्या खोबणीमध्ये ताणून व तिरकस बसलेले असते. याचा वरील भाग कमी ताणलेला असतो. कर्णपटल कोलॅजन (एक प्रकारच्या प्रथिनाच्या) तंतूंचे बनलेले असून त्याच्या बाह्यांगावर पट्टकीय अधिस्तर व आतल्या अंगास श्लेष्मकलेचा (बुळबुळीत अस्तराचा) स्तर असतो. याचे क्षेत्रफळ ५५ चौ. मिमी. असते. ध्वनिलहरीने हा कंप पावतो आणि आतील बाजूस पडद्याला टेकलेल्या अस्थिकांच्या (लहान हाडांच्या) साखळीत कंप निर्माण करतो. मध्य कर्णातील पुष्कळसे विकार या पटलाच्या तपासणीने समजतात.

 मध्यकर्ण : कर्णपटलाच्या आतील बाजूस व अंतर्कर्णाच्या बाहेर शंखास्थीच्या (कवटीच्या बाजूच्या दोन्हींकडील कमानीसारख्या भागातील हाडाच्या) लहानशा पण पोकळ वेड्यावाकड्या भागास मध्यकर्ण म्हणतात. मध्यकर्णाची रचना समजण्यासाठी प्रथम तो निर्माण का झाला हे पाहणे आवश्यक आहे. सरीसृप, पक्षी व सस्तन प्राण्यांत तो आढळतो, पण जलचर प्राण्यांत आढळत नाही. अंतर्कर्णात संवेदन ग्राहक द्रव माध्यमात असतात. ध्वनिलहरीने द्रव माध्यमात तरंग उत्पन्न झाल्यासच ते ग्राहक चेतवले जातात व ऐकू येते. ध्वनिलहरीउत्पन्न करण्यास द्रवामध्ये हवेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च करावी लागते कारण द्रवाची घनता हवेपेक्षा जास्त आहे. जलचर प्राण्यात पाण्यातून असलेल्या तरंगाच्या उर्जेमुळे अंतर्कर्णातील द्रव सहज कंप पावू शकतो पण भूचर प्राण्यांत ध्वनिलहरी हवेतून येतात व त्यांना द्रवात कंप निर्माण करावयाचा असतो. त्यामुळे ते तरंग अंतर्कर्णापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यातील उर्जेचा साठी वाढविला पाहिजे. तो मध्यकर्णातील अस्थिकांमार्फत होतो म्हणून मध्यकर्णाची आवश्यकता आहे. त्यात बिघाड होताच कमी ऐकू येते.

आ. १. कानाची रचना : (१) कर्णपाली, (२) कर्णनलिका, (३) मध्यकर्ण, (४) कर्णपटल, (५) मुद्गरास्थिका, (६) ऐरणास्थिका, (७) स्थापन्यस्थिका, (८) गोलाकार रंध्र, (९) नासाग्रसनी, (१०) ग्रसनी कर्ण नलिका, (११) शंखास्थी, (१२) कर्णशंकू.

मध्यकर्णामध्ये मुद्गरास्थिका (मेलीयस-हातोडा), ऐरणास्थिका (इंकस- ऐरण) व स्थापन्यस्थिका (स्टेपीज-रिकिब) या अस्थिकांची साखळी, त्यांना जखडणारी अस्थिबंधने व बारीक स्नायू, ग्रसनी-कर्ण नलिका (तोड, नाक, घसा व कानाचा पडदा यामध्ये संबंध प्रस्थापित करणारी नलिका) आणि आनन तंत्रिका (मेंदूतून निघणारी सातवी मज्जा) आढळतात. मध्यकर्णाच्या मध्य भित्तीवर दोन रंध्रे आढळतात. 

आ. २.उजव्या कानाचे छेदन : (१)ऐरणास्थिका, (२) स्थापन्यस्थिका, (३) कर्णपटल कलेवरील मदगरास्थिकेचा दांडा, (४) सोपान संधी, (५) प्रकोष्ठ सोपान व अस्थिमय सर्पिल कर्णशंकुपटल, (६) कर्णशंकुवाहिनी, (७) कर्णपटल सोपान, (८)आतील श्रवणमार्ग (कर्णद्वार), (९) कर्णशंकूची सर्पिल गुच्छिका, (१०) आनन तंत्रिका गुच्छिका.

एक लंबगोल व दुसरे गोल, लंबगोलात स्थापन्यस्थिकेचा पाया रूतलेला असतो व ती अंतर्कर्णातील प्रकोष्ठ सोपानात (मळसूत्राकार नलिकेत) उघडते. गोलाकार रंध्रावर एक पटल असते. त्यास आतील कर्णपटल म्हणतात. याचा संबंध कर्णपटल सोपानाशी असतो. ऊर्ध्व व पश्च भागातून (चुचुकास्थीतून, कवटीच्या तळाच्या व बाजूच्या हाडाच्या बोंडशीच्या आकाराच्या वाढीतून) कर्णपश्चास्थीतील (कानाच्या पाठीमागे असलेल्या शंखास्थीच्या भागातील) वायुविवराशी हे जोडलेले असते. मध्यकर्णाच्या संसर्गात कर्णपश्चास्थीला संसर्ग होण्याचा संभव असतो. तर मुद्‌गरास्थिकेचा एक दांडा कर्णपटलाला आतून चिकटलेला असतो. तर स्थापन्यस्थिकेच्या खालचा वर्तुळाकार पाय अंतर्कर्णाच्या लंबगोलाकार विवरात रोवलेला असतो. या दोन अस्थिका मधल्या ऐरणास्थिकेला जोडलेल्या असतात. यांच्या तरफ क्रियेमुळे व मुख्यत: कर्णपटल व लंबगोल विवराच्या क्षेत्रफळातील अनुपातामुळे (प्रमाण १३ : १)ध्वनिलहरीची तीव्रता सतरापट वाढते.

ग्रसनी – कर्ण नलिकेद्वारा मध्यकर्णातील हवेचा दाब बाहेरील हवेच्या दाबाएवढा ठेवला जातो. ही नलिका कोणत्याही कारणाने (उदा., पडसे, दडा बसणे) बंद झाली तर कान दुखू लागतो व बरोबर ऐकू येत नाही कारण कर्णपटलाच्या दोन्ही बाजूंचा दाब असमतोल होतो. हा अनुभव विमान प्रवाशांना अनेक वेळा येतो. अशा वेळी नाक व तोंड बंद करून श्वास जोराने बाहेर टाकण्याचा प्रयत्न केल्यास ग्रसनी-कर्ण नलिका उघडून हवा कानात शिरते व नीट ऐकू येऊ लागते. या नलिकेस सूज येऊन ती बंद झाल्यास कानाच्या शस्त्रवैद्याकडून ती मोकळी करून घ्यावी लागते.


अंतर्कर्ण : शंखास्थीच्या घन विभागात अंतर्कर्ण असतो. त्याची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्याचे प्रमुख दोन भाग आहेत (१)अस्थिमय सर्पिल कुहर व (२)कलामय (पातळ पटलाचे बनलेले) सर्पिल कुहर. कलामय सर्पिल कुहराभोवती अस्थिमय सर्पिल कुहराचे आवरण असते. या दोन्ही कुहरांच्यामध्ये असणाऱ्या द्रवाला परिलसीका आणि कलामय कुहरात असलेल्या द्रवाला अंतर्लसीका म्हणतात. अस्थिमय कुहराच्या आतील भागावर पर्यास्थी कलेचे (एक प्रकारच्या संयोजी ऊतकाचे म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशीसमुहाचे) आवरण असते. तेथून बारीक तंतू निघून ते कलामय कुहराला जखडून ठेवतात. अस्थिमय कुहराला असलेल्या चाळणी- सारख्या छिद्रांतून मेंदूपासून निघणाऱ्या आठव्या तंत्रिकेचे दोन भाग आत येतात. अस्थिमय सर्पिल कुहराचे तीन भाग आहेत. (१)श्रोतृ कुहर, (२)कर्णशंकू (किंवा कर्णशंबूक, अस्थिमय कुहरातील शंक्वाकार नाल) आणि (३) अर्धवर्तुलाकृती नलिका.

 आ. 3 कलामय सर्पिल कुहराचे अस्थिमय सर्पिल कुहरावर प्रक्षेपित केलेले चित्रण : (1) कर्णशंकुवाहिनी, (2) गोणिका लघुकोश वाहिनी, (3) पश्र्व अर्धवर्तुलाकार नलिकेची कुंभिका, (4) पार्श्र्व अर्धवर्तुलाकार नलिकेची कुंभिका, (5) पश्र्व अर्धवर्तुलाकार नलिका, (6) ऊर्ध्व अर्धवर्तुलाकार वाहिनी, (7) ऊर्ध्व वर्तुलाकार वाहिनीची कुंभिका, (8) गोणिका, (9) लघुकोश,

अस्थिमय व कलामय सर्पिल कुहरांची ठेवण : श्रोतृ कुहरात गोणिका व लघुकोश (गोणिकेपेक्षा लहान पिशवी) या कलेपासून तयार झालेल्या पिशव्या असतात. अस्थिमय कर्णशंकूत कलामय शंकू वाहिनी आणि तीन अर्धवर्तुलाकृती नलिकांत तीन कलामय अर्धवर्तुलाकृती वाहिन्या असतात. कलामय सर्पिल कुहरात काही विशिष्ट जागी संवेदन ग्राहके आढळतात. अंतर्कर्णात श्रवण, शरीराचा समतोल व गतिवर्धनज्ञान हे अनुक्रमे शंकू, गोणिका व तीन अर्धवर्तुलाकृती नलिकांतील संवेदन ग्राहकांमुळे होते. ह्या ग्राहकांची रचना थोड्या फार फरकाने एकाच प्रकारची असते. त्या जागी आधारकोशिका व लोमकोशिकांच्या (सूक्ष्म केस असलेल्या पेशींच्या) अधिस्तरावर जिलेटीनसदृश पदार्थात लोम रोवलेले असतात. विवक्षित हालचालीमुळे लोम ताणले जातात किंवा सैल होतात. परिणामी लोमकोशिका चेतविल्या जाऊन कोशिकांच्या तळाभोवती असलेले तांत्रिकाजाल (मज्जातंतूंचे जाळे) चेतवतात व ती संवेदना आठव्या तंत्रिकेमार्फत मेंदूकडे नेली जाते व तेथे तिचे ज्ञान होते.

तीन अर्धवर्तुलाकार नलिका : ऊर्ध्व (उभी) किंवा अग्र, पश्च (मागील) व पार्श्व (बाजूची) अशा तीन अर्धवर्तुलाकार नलिका आहेत. त्यांतील पहिल्या दोन ऊर्ध्व प्रतलात (पातळीत) असून एकमेंकीस ४५अंशांचा कोन करतात. पार्श्व नलिका ही क्षैतिज (आडव्या) प्रतलाशी ३०अंशांचा कोन करते व ती खालच्या बाजूस तिरकस असते. अशा प्रकारे डाव्या कानातील ऊर्ध्व नलिका उजव्या कानातील पश्च नलिकेच्या प्रतलात असते, तर डाव्यातील पश्च उजव्यातील ऊर्ध्व नलिकेच्या प्रतलात असते. या तीन अर्धनलिका शरीराच्या तीन प्रतलांत असतात. ऊर्ध्व व पश्च नलिकांची टोके एकत्र येऊन गोणिकेत उघडतात. पार्श्व नलिकेचे मागचे टोक स्वतंत्रपणे त्यात उघडते. प्रत्येक अर्धनलिकेच्या पुढच्या टोकावर एक फुगवटा असतो, त्यास कुंभिका म्हणतात. कुंभिकेच्या आतल्या खालच्या भागात कुंभिका-शिखा (लांबट उंचवटा) असते. त्यावरील आधारकोशिकांचा व लोमकोशिकांचा अधिस्तरावरील जिलेटीनसदृश पदार्थाचा झुलता घुमट संपूर्ण कुंभिका व्यापून टाकतो. या घुमटाच्या पुढे किंवा मागे झुकण्याने लोमकोशिका चेतविल्या जातात.

कोनीय गतिवर्धनात अंतर्लसीका द्रव त्याच्या जडत्वामुळे अर्धवर्तुलाकृती नलिकेच्या मागेमागे रहातो त्यामुळे तो कुंभिकेतील घुमटाला मागे ढकलतो. याच्या उलट दुसऱ्या कानातील तशाच अर्धवर्तुलाकृती नलिकेच्या कुंभिकेतील घुमटास तो पुढे खेचतो. घुमटाच्या हालचालीमुळे संवेदना लोमकोशिकांमार्फत मेंदूकडे जातात. उभ्या अक्षात फिरत असताना पार्श्व अर्धनलिकेतील कोशिका चेतविल्या जातात, तर क्षैतिज फिरल्यास इतर दोन अर्धनलिकांतील कोशिका चेतवल्या जातात यामुळे गतिमान प्राण्यास आपली क्षणोक्षणीची अंगस्थिती सभोवतालच्या स्थितीच्या संदर्भात कशी आहे हे समजते.

गोणिका व लघुकोश : एका रेषेत होणारे गतिवर्धन व डोक्याची पुढे, मागे किंवा बाजूस झालेली हालचाल गोणिका व लघुकोश यांतील संवेदन ग्राहकांमार्फत समजते. येथील संवेदन ग्राहक श्रवण तंत्रिका शाखेच्या टोकाशी असतो. या ग्राहकाची मूळ रचना इतर अंतर्कर्ण ग्राहकासारखीच असते. येथे जिलेटीनसदृश पदार्थात रेतीसारखे बारीक स्फटिकरूपी कण असतात.त्यांना

आ. ४. नलिका व तिच्या कुंभिकेच्या लंबाकार छेदातून दिसणारी शिखेच्या भागाची प्लॅस्टिक आकृती (आराखडा): (१) घुमटाची जिलेटीनसदृश पदार्थाची राशी, (२)केसांचे झुबके, (३) मध्यस्थ कला.

कर्णवालुका म्हणतात. त्यामुळेच या संवेदन ग्राहकांस कर्णवालुकाग्राहक असे नाव आहे. जसजशी प्राण्यांच्या डोक्याची स्थिती किंवा वेग बदलतो तसतशा कर्णवालुका गुरूत्वाकर्षणाने ओढल्या जातात, लोमावरील ताण कमीजास्त होतो व हा ताणातील फरक ज्ञात होतो आणि त्यावरून डोक्याची स्थिती समजते. यामुळे येथील संवेदन ग्राहकास गुरूत्वाकर्षण संवेदन ग्राहक म्हणतात.

कर्णशंकू (कर्णशंबूक) : हा भाग श्रावणाशी संबंधित आहे. हा पावणे तीन वेटोळ्यांचा असतो. अस्थिमय शंकूंच्या वेटोळ्यात कलामय शंकूची वेटोळी असतात. शंकूच्या मधल्या शंक्वाकार कण्यास मध्यनाभी म्हणतात. मध्यनाभीपासून निघणारे नाजूक सर्पिल पत्र (पातळशी पट्टी)सर्व वेटोळ्यांतून जाते. हे पत्र अर्धवट रूंदीचे असून ते शंकुभित्तीपर्यंत पोहोचत नाही. हे मधले अंतर आधारकलेने जाडलेले असते. आधार कला तळाच्या वेटोळ्यांत कमी रूंदीची असते व जसजशी ती शंकूच्या टोकाकडे येते तसतशी ती जास्त रूंद होते. अशा प्रकारे शंकूच्या वेटोळ्याचे दोन भाग पडतात. वरच्या भागाचे `राइसनर’ कलेने (राइसनर नावाच्या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्‍या कलेने) परत दोन भाग होतात. अशा प्रकारे वेटोळ्यात तीन भाग पडतात. वरच्या भागास प्रकोष्ठ सोपान, मधल्यास मध्य सोपान व खालच्या भागास कर्णपटल सोपान म्हणतात. पहिला व तिसरा भाग शंकूच्या टोकात असलेल्या बारीक सर्पिल छिद्राने एकमेकांस मिळतात. याला संधी सोपान म्हणतात. या दोन सोपानांत परिलसीका असते, तर मध्य सोपानात अंर्तलसीका असते मध्य सोपानातील आधारकलेवर आधारकोशिकांची व लोमकोशिकांची एक विशिष्ट मांडणी असते.


त्यावरील जालिकाकार (जाळ्यासारख्या) कलेतून लोम बाहेर पडून ते आच्छादक कलेला लागलेले असतात. आच्छादक कला जिलेटीनसदृश पदार्थाची असते. या कोशिकासमूहांना व निरनिराळ्या कलांना मिळून श्रवणांग किंवा ध्वनिबोधक सर्पिलांग (किंवा कॉर्टी या शास्त्रज्ञांच्या नावावरून कॉर्टी इंद्रिय) म्हणतात. लोमकोशिकांभोवती मध्यनाभी तंत्रिकांचे जाळे असते.

आ. ५. कर्णपटल सोपान : (१) अस्थी, (२) सर्पिल गुच्छिका, (३) सर्पिल बंध, (४) आच्छादक कला, (५) लोमकोशिका, (६)सीमावलय, (७) मध्य सोपान, (८) राइसनर कला, (९) प्रकोष्ठ सोपान.

ध्वनिलहरी अस्थिकांच्या साखळीने लंबगोलाकार विवरात आणल्या जातात व प्रकोष्ठ सोपानातील परिलसीकेत लहरी निर्माण करतात. त्या लहरींच्या दाबांमुळे आधारकला व तीवरील श्रवणांग एका विवक्षित लयीत दोलायमान होते. काही भाग जास्त तर काही कमी दोलायमान होतो. लहरींच्या तीव्रतेवर व त्यांच्या कंप्रतेवर (प्रति-सेकंदातील कंपन संख्येवर) दोलायमानता अवलंबून असते. जेथे कला जास्त हलते तेथील लोमकोशिका जास्त चेतावल्या जाऊन जास्त तीव्र संदेश मेंदूकडे पाठवतात. याउलट कमी हालाचाल असलेल्या जागेपासून कमी संदेश जातात. यामुळे निरनिराळ्या ध्वनिलहरी ओळखल्या जातात आणि शेवटी मेंदूकडे जाणाऱ्या संदेशामार्फत मेंदूत त्यांचे विश्लेषण होऊन त्याचा अन्वयार्थ लावला जातो. यासच श्रवण म्हणतात. शंकूच्या तळाच्या वेटोळ्यांत जास्त तर टोकाकडील वेटोळ्यांत कमी कंप्रतेच्या ध्वनिलहरी ओळखल्या जातात. श्रवणाचे तंत्रिकाकेंद्र शंखखंडात (मेंदूच्या शंखास्थीमधील भागात) असते.

कुलकर्णी, श्री. रा.

कानाचे विकार : कानाचे तीनही विभाग त्वचा, उपास्थी, अस्थी, श्लेष्मकला, तंत्रिका आणि रक्तवाहिन्यांचे बनलेले असल्यामुळे त्या त्या ऊतकांना होणारे सर्व विकार कानातही उद्‌भवू शकतात. मध्य आणि अंतर्कर्ण मेंदूच्याअगदी जवळ असल्यामुळे त्यांच्या विकारापासून मेंदूतही विकृती हेण्याचा संभव असतो.

बाह्यकर्ण विकार :बाह्यकर्णास मार लागल्यास तेथे जखम होऊ शकते तसेच तेथे रक्त साखळल्यामुळे बाह्यकर्णातील उपास्थीमध्ये शोथ (दाहयुक्तत सूज) उत्पन्न होतो. त्यामुळे त्याजागी व्रण उत्पन्न होण्याचा संभव असतो. असा वारंवार मार लागल्यास बाह्यकर्णातील उपास्थी वेड्यावाकड्या होऊन कानाला विद्रूपता येते. मल्लांचे कान चढलेले दिसतात हे याचे उत्तम उदाहरण होय.

बाह्यकर्णामागील ग्रंथीपासून मेणासारखा स्त्राव उत्पन्न होत असतो. तो स्त्राव शुष्क होऊन बाह्यकर्णात साठून राहिला तर त्याचा घट्ट गोळा किंवा खडा (मळ) बनतो. त्याच्यामुळे कमी ऐकू येऊ लागते कान दुखू लागतो. अशा वेळी तज्ञाकडून मळ काढून घेणे योग्य ठरते. कानकोरण्याने अथवा अतज्ञाकडून मळ काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास कर्णपटलाला इजा होण्याचा संभव असतो. मळ घट्ट झाला असल्यास, ग्लिसरीन, सोडाबायकार्ब आणि टर्पेंटाइन तेलाचे थेंब टाकल्यास मळ मऊ होऊन काढून टाकणे सुलभ होते.

केसतूड :- कानातील त्वचेतील लोमपुटकाच्या (केसांच्या मुळाच्या) शोथामुळे तेथे फोड उत्पन्न होतो. त्वचा घट्ट ताणलेली असल्यामुळे केसतूड अत्यंत वेदनामय असते. कान शेकला असता वेदना कमी होतात तसेच प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचाही उपयोग होतो. केसतूड पिकल्यावर शस्त्रक्रिया करून ते कापावे लागते.

बाह्यकर्णशोथ : बाह्यकर्णातील त्वचेला शोथ आल्यास बाह्यकर्णशोथ होतो तसेच अधिहृषतेमुळेही (बाह्य पदार्थाच्या पूर्व संपर्कामुळे शरीरात दुसऱ्या संपर्काच्या वेळी होणाऱ्या विकृत प्रतिक्रियेमुळे, ॲलर्जीमुळे) त्वचेला शोथ येऊ शकतो. कानात बोटे घालणे, खाजविणे, आकडे अथवा काडी घालून खाजविणे वगैरे प्रकारांनी आणि काही औषधांसंबंधीच्या अधिहृषतेमुळेही बाह्यकर्णशोथ संभवतो. त्याचे दोन प्रकार दिसतात. एका प्रकारचा शोथ सद्रव असून त्यामुळे कर्णत्वचा चिघळून तीतून पाणी येत राहते व खाज सुटते. दुसऱ्या प्रकाराचा शोथ शुष्क असून त्यामुळे कर्णत्वचेवर कोरड्या खपल्या, पापुद्रे धरल्यासारखे दिसते, खाज सुटते. या दोन्ही प्रकारांचे मूळ कारण शोधून काढून ते नाहीसे करावे लागते. प्रतिजैव पदार्थ कॉर्टिसोन असलेल्या मलमांमुळेही गुण येतो.


मध्यकर्ण विकार : तीव्र मध्यकर्णशोथ :पुष्कळ वेळा सर्दीपासून नाकातील अथवा नासाग्रसनीतील (घशातील नाकाच्या भागातील) जंतुसंसर्ग ग्रसनी – कर्ण नलिकेवाटे कानात पसरतो. गिलायुशोथ (टॉन्सीलची सूज), गोवर वगैरेविकारांमध्ये नासाग्रसनीला शोथ येऊन तो मध्यकर्णात पसरतो. मध्यकर्णातीलशोथामुळे तेथे पू साठू लागतो, कान ठणकू लागतो, कर्णपटल लाल होते. डोकेदुखी, ज्वर वगैरे लक्षणेही दिसू लागतात. थोड्या वेळानंतर कर्णपटलाला छिद्र पाडूनसाठलेला पू बाहेर पडतो त्याला कान फुटणे म्हणतात. छिद्र पडण्यापूर्वीचतज्ञाकडून शस्त्रक्रियेने कर्णपटलामागील पुवाला वाट करून दिली असता पुढेउद्‌भवणारे कर्णपश्चास्थिशोथासारखे उपद्रव टळतात. प्रतिजैव औषधांचाही उपयोगहोतो.

 चिरकारी मध्यकर्णशोथ : मध्यकर्णात अथवा कर्णपश्चास्थीमध्ये संसर्ग मुरून राहतो, त्यावेळी कान बराच काळ सतत अथवा मधून मधून वहात राहतो. ऐकू कमी येते, परीक्षा केली असता कर्णपटलाला छिद्र पडलेले आढळते. कालावधीने आतील संवाहक अस्थिकांच्या साखळीमध्ये खंड पडतो. वेळीच औषधयोजना व स्थानिक चिकित्सा केल्यास उपयोग होतो परंतु पुष्कळ वेळा शस्त्रक्रियेची जरूरी पडते. काही वेळा या चिरकारी शोथामुळे कवटीच्या आत उपद्रव होतात. परिमस्तिष्कशोथ (मेंदूवरील आवरणांची सूज) अवग्रहकारी (इंग्रजी एस्‌ अक्षराच्या आकाराचे वळण असलेल्या) सिराकोटरातील (अशुद्ध रक्तवाहिनीतील) रक्ताचे अंतर्ल्कथन (अंतर्गत गोठणे), मस्तिष्कविद्रधी (मेंदूमधील गळू) वगैरे गंभीर उपद्रव होतात.

कर्णपश्चास्थिशोथ :- (कर्णमुळ). मध्यकर्णातील शोथामुळे कर्णपश्चास्थीतील पोकळीमध्ये सूज येते. कानामागे लाली आणि स्पर्शासह्यता उत्पन्न होते. मेंदूच्या सान्निध्यामुळे ही घटना बरीच धोकादायक ठरते, कारण वर दिलेले कवटीच्या आत होणारे उपद्रव उद्‌भवण्याची शक्यता असते. अशा वेळी तत्काळ शस्त्रक्रिया करून कर्णपश्चास्थीतील पोकळीत तयार झालेल्या पुवास वाट करून द्यावी लागते. अलीकडे प्रतिजैव औषधे वापरण्याच्या प्रघातामुळे या विकाराची तीव्रता बरीच कमी झाली असली, तरी हा विचार चिरकारी स्वरूपात बऱ्याच वेळा आढळतो.

मध्यकर्णास्थिका-कर्कशीभवन : या विकारात मध्यकर्णातील स्थापन्यस्थिका ज्या खोबणीत बसविलेली असते, त्या खोबणीतील अस्थींची घनता वाढते त्यामुळे स्थापन्यस्थिका घट्ट बसून तिची हालचाल मर्यादित होते आणि ध्वनीलहरींना अडथळा उत्पन्न होऊन एक प्रकारचा बहिरेपणा येतो. हा विकार पुरूषांपेक्षा स्त्रियांत अधिक प्रमाणात दिसतो. श्वेतवर्णीयांतही त्याचे प्रमाण अधिक असते. औषधिचिकित्सेचा काही उपयोग होत नाही. शस्त्रक्रियेने स्थापन्यस्थिका काढून त्या जागी तारेचा कृत्रिम अवयव बसवितात.

अंत्रकर्ण विकार : कर्णनाद : कानाच्या अनेक विकारांत कानात आवाज होणे म्हणजे कर्णनाद हे एक महत्वाचे लक्षण असते. मध्यकर्ण विकार, ग्रसिका – मध्यकर्ण नलिका विकार, कर्णास्थिकाठिण्य तसेच प्रकोष्ठ तंत्रिका आणि श्रवण तंत्रिका यांवर ताण वा दाब पडणे वगैरे कारणांमुळे कर्णनाद हे लक्षण दिसते. मद्यासक्तीसारखी इतर कारणेही कर्णनाद उत्पन्न करतात. ज्यावेळी कर्णनादाबरोबरच शरीराचा तोल जाणे हे लक्षण दिसते त्यावेळी विशेष काळजीने तपासणी करून निदान करणे जरूरीचे असते.

अर्बुदे : अंतर्कर्णातील तंत्रिकांवर काही वेळा अर्बुदवृद्धी (कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे गाठ येणे) होते. त्या अर्बुदाला श्रवण तंत्रिकार्बुद असे नाव असून त्याच्यामुळे बहिरेपणा, तोल जाणे आणि कर्णनाद ही लक्षण दिसतात. शस्त्रक्रियेने हे अर्बुद काढता आले तर ही लक्षणे नाहीशी होऊ शकतात.

बहिरेपणा : श्रवणशक्तती कमी होण्यालाच बहिरेपण असे म्हटले जाते. थोडे कमी ऐकू येण्यापासून संपूर्ण बहिरेपणासाठी ही संज्ञा वापरतात. परंतु ज्यांना किमान ८२डेसिबलपर्यंतचे (ध्वनीची तीव्रता मोजणाऱ्या एककास डेसिबल हे नाव आहे) ध्वनी ऐकणे शक्य होत नाही त्यांनाच `बहिरा’ ही संज्ञा वापरावी आणि ज्यांना कमी ऐकू येते त्यांना `मंद श्रवण’ ही संज्ञा वापरावी असा संकेत आहे. बहिरेपणाचे (१)संवाहक, (२)संग्राहक आणि (३)मिश्र असे तीन प्रकार कल्पिले आहेत.

(१)संवाहक : या प्रकारामध्ये बाह्यकर्ण, कर्णपटल अथवा कर्णास्थिकांमध्ये काही बिघाड झाल्यास ध्वनिलहरींचे संवाहन अंतर्कर्णामध्ये नीट होत नाही त्यामुळे मंद श्रवण उत्पन्न होते.

(२)संग्राहक : श्रवण तंत्रिका ज्या श्रवणांगापासून निघते ते अंतर्कर्णामध्ये असते त्या इंद्रियामध्ये अथवा खुद्द श्रवण तंत्रिकेमध्ये अथवा मस्तिष्कातील श्रवणकेंद्रामध्ये काही बिघाड झाला, तर ध्वनिलहरी अंतर्कर्णापर्यंत पोहोचून सुद्धा श्रवणाची जाणीव होत नाही. या प्रकाराला संग्राहक बहिरेपण म्हणतात.

(३)मिश्र : वरील दोन्ही कारणांमुळे उद्‌भवणाऱ्या बहिरेपणाला मिश्र बहिरेपण म्हणतात. वयोमानाप्रमाणे बहिरेपणाची कारणमीमांसा पुढीलप्रमाणे करण्यात येते.

(१)अर्भक : काही कुटुंबांत बहिरेपण आनुवंशिक दिसते. कानाच्या वाढीमध्ये काही दोष राहिल्यास

हा प्रकार जन्मजात असतो.

गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत मातेला कांजिण्या, देवी वा तत्सम साथीचे रोग झाले , तर त्या रोगाच्या विषाणूंचा (अतिसूक्ष्म जीवांचा, व्हायरसांचा) परिणाम रक्तामार्गे गर्भाच्या वाढत्या तंत्रिकाकोशिकांवर होतो व त्यामुळे अर्भकात बहिरेपणा जन्मजात असू शकतो. उपदंश, ऱ्हीसस [वानर विशेष, ऱ्हीसस नावाच्या वानरांच्या रक्तातील कोशिका आणि मानवी रक्तातील कोशिका यांतील एका समान गुणधर्माकरिता वापरण्यात येणारी संज्ञा, →ऱ्हीसस घटक] विरूद्ध धर्म अथवा प्रसूतिसमयी झालेली इजा यांमुळेही अर्भकवयात बहिरेपण येऊ शकते. जन्मानंतर पहिल्या वर्षामध्ये विषाणुजन्य विकार झाल्यासही श्रवणावर विपरीत परिणाम होतो.


(२)बालवय : मध्यकर्णातील जंतुसंसर्गामुळे कर्णपटलास छिद्र पडते, आतील अस्थिकांच्या साखळीत दोष उत्पन्न होतो व त्यामुळे संवाहक बहिरेपणा येऊ शकतो. गोवर, गिलायुशोथ हे रोग याच वयात अधिक प्रमाणात होत असल्यामुळे बालबहिरेपणाची ती महत्वाची कारणे आहेत.

(३)प्रौढवय : ३० ते ५० वर्षांपर्यंतच्या वयामध्ये कर्णास्थिकाकर्कशीभवन (जाड होणे) हे महत्वाचे कारण असते. या विकारामध्ये लंबगोल रंध्रामध्ये असलेल्या स्थापन्यस्थिकेच्या पायाभोवती अस्थिजनन होऊन ती अस्थिका लंबगोल रंध्रामध्ये घट्ट चिकटून बसते, त्यामुळे ध्वनिलहरींचे संवाहक कमी होऊन बहिरेपणा येतो.

जोराच्या आवाजामुळे कानांतील ग्राहकांवर अभिघात झाल्यामुळे बहिरेपणा येतो, जोराचा स्फोट, यंत्रांचे आवाज, विमानप्रवासातील आवाज वगैरे अलीकडील यांत्रिकयुगामध्ये होणाऱ्या अभिघातांमुळेही बहिरेपणा उत्पन्न होतो.

(४)वृद्धावस्था : वयोमानाप्रमाणे अंतर्कर्णातील तंत्रिका ऊतकाचा अपर्कष (ऱ्हास) होऊ लागून श्रवण मंद होत जाते या प्रकाराला जराबधिरता असे म्हणतात.

उपचार : सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की, संवाहक प्रकारात चिकित्सा करून गुण येणे शक्य असते. मध्यकर्णातील संसर्गावर प्रतिजैव व इतर औषधे वापरणे, शस्त्रक्रियेने संवाहक योजना दुरूस्त करणे वगैरे प्रकारांनी बहिरेपणावर चिकित्सा करणे शक्य असते. कर्णपटलछिद्र भरून काढणे, कर्णास्थिका-कर्कशीभवनामुळे होणाऱ्या बहिरेपणासाठी शस्त्रक्रिया करून अवयव बसविण शक्य झाले आहे.⇨श्रवण साहाय्यकांचाही उपयोग होतो. संग्राहक प्रकारात शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही. अभिघातजन्य बहिरेपणा येऊ नये म्हणून कर्कसंरक्षकांचा उपयोग करतात. कर्कसंरक्षकांचे (१)कर्णपटलात बसविता येण्यासारखा, (२)बाह्यकर्णावर संपूर्ण बसविता येण्याजोगे आवरण आणि (३)संबंध डोक्याला आच्छादित करता येण्यासारखे शिरस्त्राण असे तीन प्रकार आहेत. बाह्यकर्णपटलावरील आवरण व कर्णपटलावरील संरक्षक हे दोन्ही एकत्र तसेच शिरस्त्राणात वरील दोन्ही संरक्षक वापरण्याचीही पद्धत आहे. पाण्याच्या दाबापासुन कानांचे संरक्षण करण्यासाठीही पाणबुड्यांना अशा प्रकारचे संरक्षक वापरावे लागतात.

कानावर करण्यात येणाऱ्या विविध शस्त्रक्रियासंबंधी `शस्त्रक्रिया’ या नोंदीत माहिती दिलेली आहे.

बहिऱ्या व्यक्तींवर होणारे मानसिक परिणाम व त्यांचे पुनर्वसन ही एक मोठी समस्या आहे. अशा व्यक्तींना विशिष्ट प्रकारे शिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होत आहे. [→ अपंग कल्याण व शिक्षण].

गोसावी,द. कृ.

अपृष्ठवंशी प्राण्यांचे आणि मनुष्ये तर पृष्ठवंशी प्राण्यांचे कान : काही अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ध्वनिलहरी ग्रहण करणारे कर्णपटलांग जरी असले तरी ते शीर्षावर नसते कीटकांमध्ये ते उदर, वक्ष किंवा पायांवर असते आणि त्याचा कोणत्याही प्रकारे सस्तन प्राण्याच्या कानाशी संबंध नसतो. अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये शरीराचा समतोल राखणारी अथवा संतुलन अंगे पोकळ पिशवीच्या स्वरूपाची असून त्यांना संतुलन पुटी म्हणतात. संतुलन पुटीत लोमकोशिका आणि कॅल्शियम कार्बोनेटाचे किंवा वाळूचे बारीक कण अथवा संतुलनाश्म असतात. प्राणी हालचाल करू लागला म्हणजे या कणांचा संवेदी लोमकोशिकांना स्पर्श होतो व त्या उत्तेजित होतात.

सगळ्या पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये मनुष्याच्या अंतर्कर्णाशी जुळणारी किंवा त्याच्यासारखी संरचना असते. भ्रुणाची वाढ होत असताना त्याच्या ऊतकाचे एक जाड व घट्ट ठिगळ एके जागी दिसू लागते ही कानाची सुरूवात होय. जीवाची जसजशी वाढ होत जाते तसतसे या ठिगळासारख्या भागाचे कवटीच्या आत अंतर्वलनाने तयार होणाऱ्या कप्प्यावर कंगोरे उत्पन्न होऊन पुढे त्यांच्या अर्धवर्तुलाकार नलिका बनतात. खुद्द कप्प्याची गोणिका बनते आणि तिच्यापासून लघुकोश आणि लॅजीना (कर्णशंबुकाची प्राथमिक अवस्था) नावाची संरचना तयार होते. उच्च श्रेणीच्या पृष्ठवंशींमध्ये लॅजीनाचा कर्णशंबूक बनतो.

मासे : शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांवरून काही माशांना ऐकू येत असावे असे दिसते, परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजांतील फरक त्यांना जाणवतो किंवा नाही या विषयी काहीच माहिती नाही. माशांना बाह्यकर्ण व मध्यकर्ण नसतो आणि त्यांचा अंतर्कर्ण मुख्यत: शरीराचा तोल राखण्याचे कार्य करतो. अतिशय विकास पावलेले मासे आणि अस्थिमस्य यांत कलामय सर्पिल कुहर अंतर्लसिकेने भरलेले असते आणि वाहिन्यांमध्ये कॅल्शियम कार्बोनेटाचे लहान स्फटिक (कर्णाश्म) असतात. काही उपास्थिमिनांमध्ये (शार्क, रे वगैरे माशांमध्ये) एक उघडा अंतर्वलन नाल असतो. तो शीर्षाच्या पृष्ठापासून लघुकोशाला गेलेला असतो. हा नाल समुद्रातील पाण्याने भरलेला असतो. काही शार्क माशांत लघुकोशात कर्णाश्मांच्या ऐवजी वाळुचे कण असतात.

सगळे उपास्थिमीन आणि अस्थिमत्स्य यात तीन अर्धवर्तुलाकार नलिका, गोणिका, लघुकोश आणि लघुकोशापासून निघालेला लॅजीना असतात. हॅगफिश आणि लॅंप्री या आदिम माशांमध्ये बाह्य अर्धवर्तुलाकार नलिका नसते. सगळ्या माशांमध्ये अर्धवर्तुलाकार नलिकेच्या एका टोकाशी एक फुगवटा (कुंभिका) असून त्याच्या आत एके ठिकाणी संवेदी लोमकोशिका असतात.

उभयचर : उभयचरांचा मध्यकर्ण क्लोम-विदरापासून (घशापासून कल्ले असलेल्या भित्तीमध्ये उघडणाऱ्या रंध्रापासून) तयार होतो आणि त्याचे बाहेरचे छिद्र, डोक्याच्या बाजूवरील त्वचेच्या सपाटीत असलेल्या कर्णपटलाने झाकलेले असते. कर्णपटल एका लांब अस्थीने-कर्णस्तंभिकेने (कर्णशंबुकाच्या शंकूच्या आकाराच्या अक्षाने) पदाधानपट्टाला जोडलेले असते. मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण यांच्यामध्ये असणाऱ्या छिद्रात हा पट्ट असतो. लघुकोशापासून उद्वर्धाच्या (बाह्यवाढीच्या) स्वरूपात उत्पन्न झालेल्या लॅजीनाच्या बुडाशी उभयचरांमध्ये एक महत्वाचे संवेदी क्षेत्र असते हे क्षेत्र म्हणजे बहुधा खऱ्या कर्णशंबुकाचा अल्पविकास होय.


सरीसृप : सरीसृपांचे कर्णपटल कवटीत खोल गेलेले असते व यामुळे उत्पन्न झालेल्या नालाचे द्वार खवल्यांनी झाकलेले असते. हा नाल सस्तन प्राण्यात विशेष स्पष्ट रूपाने असलेल्या बाह्य कर्णाची सुरूवात मानली जात असल्याने तो क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) दृष्टिकोनातून महत्वाचा ठरतो. लॅजीना आणि आधार-पिंडिका (लघुकोशापासून निघालेला दुसरा उद्वर्ध) यांच्या एकीकरणाने कर्णशंबुकांसारखी एक लांब संरचना उत्पन्न होते. एका आधारकलेने लॅजीनाचे दोन भाग होतात. हे दोन्ही भाग कर्णशंबुकाप्रमाणेच एका द्रवाने भरलेले असतात. ग्रसनी-कर्ण नलिका कान ग्रसनीशी जोडते. स्तंभिकेचे तीन स्पष्ट भाग होतात आणि त्यापैकी स्थापन्यस्थिका कलेने आच्छादिलेल्या एका छिद्रात घट्ट बसते. कूर्म आणि सर्प यांचा कर्णशंबूक उभयचरांप्रमाणेच अल्पविकसित असतो, परंतु मगरांमध्ये तो लांब आणि गुंडाळ्या पडलेला असून त्याच्या टोकावर लॅजीना सूक्ष्म उपांगाच्या स्वरूपात असतो. त्याचप्रमाणे श्रवणांग, कर्णपटल सोपान आणि प्रकोष्ठ सोपान यांची लक्षणे किंवा चिन्हे दिसून येतात. सापांमध्ये कर्णपटल नसते.

पक्षी : पक्ष्यांमध्ये कर्णपटल खोलवर असल्यामुळे बाह्यकर्ण नाल असतो आणि घुबडांमध्ये या नालाचे बाहेरचे छिद्र त्वचेच्या एका लहान चल दुमडीने झाकलेले असते. ही दुमड म्हणजेच सस्तन प्राण्यात आढळणाऱ्या कर्णपालीचा आरंभ होय असे म्हणता येईल. कर्णपटल एका स्तंभिकेने अंतर्कर्णात उघडणाऱ्या खिडकीला किंवा छिद्राला जोडलेला असतो. लॅजीना सस्तन प्राण्यांच्या कर्णशंबुकासारखा दिसू लागतो आणि त्यात श्रवणांग असते.

  

सस्तनप्राणी : सस्तन प्राण्यांचा कान हे एक अतिविकसित श्रवणेंद्रिय आहे. बाह्य कर्णपाली असते आणि तिच्या खेरीज स्तंभिकेच्या जागी तीन वेगवेगळ्या अस्थी उत्पन्न झालेल्या असतात गोणिका आणि लघुकोश स्पष्टपणे वेगळे झालेले असून दोहोंच्या मध्ये दळणवळणाकरिता लहान वाहिनी असते. लॅजीना लांब होऊन त्याचा सर्पिल कर्णशंबूक बनलेला असतो. श्रवणांगाची लांबी वाढल्यामुळे वेगवेगळ्या कंप्रतेचे आवाज ऐकू येणे शक्य होते.

सगळ्या सस्तन प्राण्यांमध्ये जरी सर्पिल कर्णशंबूक असला, तरी निरनिराळ्या जातींमध्ये त्याची लांबी आणि वेढ्यांची संख्या कमीअधिक असते. माणसात कर्णशंबुकाची लांबी जवळजवळ ३.५ सेंमी. असून त्याचे पावणेतीन वेढे असतात हत्तीचा कर्णशंबूक ६ सेंमी. लांब असतो व त्याचे अडीच वेढे असतात आणि गिनीपिगामध्ये लांबी केवळ १.८ सेंमी असून वेढे पाच असतात. लॅजीनाचा केवळ अवशेष असतो. श्रवणांगाची चांगली वाढ झालेली असते. मोठा मध्यकर्ण आणि कर्णशंबूक असणारे सस्तन प्राणी अगदी थोड्या कंप्रतेचे आवाज सहज ऐकू शकतात, तर ऊंदरासारखे लहान प्राणी उच्च कंप्रतेच्या आवाजांना उत्तम प्रतिसाद देतात.

कर्वेज. नी.

पहा:- श्रवणक्रिया

संदर्भ:1. Ballenger, H.G. Ballenger, J.J. Diseases of the Nose, Throat and Ear, Philadelphia, 1965 2.Davis, H.Hearing and Deafness, New York, 1960.

3.Mawson, S.Diseases of the Ear, Baltimore, 1963.