कातेन्या : इटलीच्या सिसिली बेटातील कातेन्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ३,९८,८०९ (१९७१). एटना ज्वालामुखीच्या पायथ्याशी असल्याने अनेक वेळा उद्ध्वस्त झालेले. कातेन्या अनेक वेळा बसविण्यात आले. हे महत्त्वाचे बंदर तसेच व्यापारी आणि औद्योगिक शहर असून, गंधक शुध्दीकरण व ॲस्फाल्ट उत्पादन हे येथील प्रमुख उद्योग होत. ख्रि.पू.आठव्या शतकात वसलेले हे शहर ग्रीक व रोमन अंमलाखाली होते. १८६२ मधील गॅरिबाल्डीच्या रोमवरील स्वारीला येथूनच सुरुवात झाल्याने इटलीच्या अर्वाचीन इतिहासातही कातेन्याला महत्व दिले जाते. बाराव्या शतकातील कॅथीड्रल, सम्राट दुसरा फ्रीड्रिख याचा किल्ला व वेधशाळा या येथील प्रेक्षणीय प्राचीन वास्तू असून, पंधराव्या शतकात स्स्थापन झालेले येथील विद्यापीठ प्रसिध्द आहे.
ओक, द.ह.