करमरकर, विनायक पांडुरंग : (२ ऑक्टोबर १८९१ – १३ जून १९६७). आधुनिक काळातील एक प्रख्यात महाराष्ट्रीय शिल्पकार. सासवने, जि. कुलाबा येथे जन्म. बालवयातच कलांची आवड निर्माण झाली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे जी. डी. आर्ट ही पदविका घेतली (१९१३). रॉयल ॲकॅडमी ऑफ आर्ट, लंडन येथे उच्च शिल्पशिक्षण. १९१६ पासून कलकत्ता, गोंडल (सौराष्ट्र), बडोदे व अखेरीस मुंबई येथे शिल्पव्यवसाय. तैलचित्रण हा त्यांचा आवडता छंद. ओटो रॉथफील्ड यांच्या उत्तेजनाने ते शिल्पव्यवसायाकडे वळले. इंग्लंड, फ्रान्स, इटली, हंगेरी व अमेरिका या देशांत शिल्पविषयक अधिक अभ्यास व शिल्पव्यवसाय या निमित्तांनी प्रवास केला. अखिल भारतीय शिल्पकार संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष, ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ चे अध्यक्ष, ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ चे उपाध्यक्ष, लोकसभेतील सजावटीसाठी नेमलेल्या तज्ञ समितीचे सदस्य आदी विविध पदांवर त्यांनी कार्य केले. १९६४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब मिळाला. त्याच वर्षी ललित कला अकादमीचे फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली. करमरकरांना पुणे येथील शिवाजी महाराजांच्या ब्राँझच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे (१९२८) दिगंत कीर्ती लाभली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, विठ्ठलभाई पटेल, चित्तरंजनदास, रविंद्रनाथ टागोर इ. त्यांची व्यक्तिशिल्पे प्रख्यात आहेत. त्यांच्या अन्य शिल्पांत ‘धीवरकन्या’, ‘कोकरू’ ‘भक्ती’, ‘संघर्ष’, ‘विसावा’, ‘नमस्ते’, ‘गवळण’, ‘कंबुवादिनी’, ‘प्रवासी’, ‘तल्लीनता’, ‘बकर्‍यास घास देणारी स्त्री’, ‘ग्रीष्म ऋतू’ इ. उल्लेखनीय आहेत. शिल्पांमधील लय व सजीवपणा यांमुळे ती वैशिष्ट्यपूर्ण ठरली. चेंबूर, मुंबई येथे निधन.

अश्वारूढ शिवाजी महाराज : करमरकरांची एक उत्कृष्ट शिल्पाकृती

इनामदार, श्री. दे.