काकडी : (खिरा क.सवटीकाई सं.सुशीलता इं.कुकंबर लॅ.कुकुमिस सटिव्हस कुल-कुकर्बिटेसी). उत्तर भारत हे या वेलीचे मूळ मूलस्थान असून ती भारतात ३,००० वर्षापासून लागवडीत आहे. ख्रिसतपूर्व २०० वर्षापासून चीनमध्येही लागवडीत असून नंतर ही इतरत्र पसरली. ⇨ वेर्किन हा काकडीचा एक प्रकार आहे. कोवळेपणी फळे पांढरी, हिरवी किंवा पिवळसर परंतु जून फळे तांबूस पिंगट असतात. मद्रासकडील `मुंडोसा’ प्रकारावर बारीक काटे असतात तो महाराष्ट्रातही पिकवतात. सर्व प्रकार उत्तम, जीवनसत्वयुक्त व खाद्य आहेत. बिया थंड आणि पौष्टिक असून त्यात स्वच्छ पिवळट तेल असते. मगज (गर) दाहनाशी बी मूत्रल (लघवी साफ करणारे) व शीतक (थंडावा देणारे) पानांचा उकळा (काढा) जिऱ्याच्या चूर्णाबरोबर घशाच्या विकारांवर चांगला. ह्या वेलीची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कुकर्बिटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
क्षीरसागर, व. ग.
जाती : भारतात काकडीच्या पुष्कळ जातींची लागवड करतात. भारतीय कृषि अन्वेषण संस्थेने जपानी लांब हिरवी आणि स्ट्रेट एक ह्या जातींची शिफारस केली आहे. पुणे खिरा व बालम खिरा ह्या जातीची सर्व साधारणतः लागवडीत आहेत.
हवामान : हे उन्हाळी पीक असून त्याला कडक थंडीपासून अपाय होतो. १८० अंश – २४० अंश से. तापमानाला उगवण उत्तर होते.
जमीन : सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक घेतात, पण पीक लवकर तयार होण्यासाठी रेताड जमिनीत घेतात व जास्त उत्पन्नासाठी भारी जमिनीत लागवड करतात. जमिनीला उत्तम निचरा असावा व तिचे pH मूल्य ५.५-६.७ असावे [पीएच मूल्य].
लागवड : लागवड दोन पद्धतींनी करतात. आळे पद्धतीत एका आळ्यात पुष्कळ बिया लावतात. सरीला एका बाजूने किंवा दोन्ही बाजूंनी लागवड करतात. दोन्ही बाजूंना लागवड केल्यास दोन सऱ्यांमधील अंतर दुप्पट ठेवतात. जात आणि जमिनीचा पोत यांप्रमाणे दोन सऱ्यांत १.५-२.५ मी. अंतर ठेवतात व दोन झाडांतील अंतर ६०-९० सेंमी. ठेवतात. उन्हाळी पीक जानेवारी-फेब्रुवारीत लावतात व पावसाळी पीक जून-जुलैमध्ये लावतात. हेक्टरी अदमासे २.५ किग्रॅ. बी लागते.
प्रत्येक आळयात तीन रोपे ठेवून विरळणी करतात. सरीला लागवड केलेली असल्यास एका जागी एकदोन रोपे ठेवतात. वेल जमिनीवर पसरू देतात.
खत : हेक्टरी २५-३० टन चांगले कुजलेले शेणखत घातल्यास उत्तर पीक येते. नुसत्या वरखतावरही उत्पन्न चांगले येते. भरखताच्या जोडीला जमिनीच्या मगदूराप्रमाणे वरखते दिल्यास उत्पन्न वाढते.
लागवडीपासून दीड-पावणेदोन महिन्यांनी फळे तोडण्यास तयार होतात. ती फार मोठी व पक्व होण्यापूर्वी तोडतात. दोन-चार दिवसांच्या अंतराने तोडणी करतात. तोडणीचे काम दोन महिन्यांपर्यंत चालते. हेक्टरी सरासरी आठ ते दहा हजार किग्रॅ. उत्पन्न येते.
रोग : काकडीवर बरेच रोग पडतात. त्यामुळे काही भगांत काकडीची किफायतशीर लागवड करणे अवघड आहे.
मर : हा रोग सूक्ष्मजंतुजन्य असून त्याचा प्रसार काकडीवरील पट्टेरी भुंगेऱ्याने होतो. रोग पानांवरुन पसरत देठावर जातो व शेवटी खोडात जातो. त्यामुळे झाडे मरतात. नियंत्रणाचा खास उपाय नाही. तरी पण पट्टेरी भुंगेऱ्याचा बंदोबस्त करुन त्याला आळा घालता येतो.
केवडा : हा कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे होणारा) रोग असून त्यामुळे पानावर लहान पिवळसर किंवा जलासिक्त (पाण्यात भिजल्यासारखे) भाग दिसतात. ते जलद मोठे होऊन तपकिरी होतात. फळावरही रोग दिसू लागतो. २८ ग्रॅ. पारायुक्त कवकनाशक २८-३२ लिटर पाण्यात विरघळवून त्यात बी पाच मिनिटे बुडवून लावतात व पिकावर ताम्रयुक्त कवकनाशकाची फवारणी करतात.
डाउनी मिल्डयू : ह्या कवकजन्य रोगामुळे पानांच्या वरील बाजूवर पिवळसर ते तांबूस तपकिरी ठिपके पडतात. बोर्डो मिश्रण व गंधक ह्यामुळे पिकाला इजा होत असल्यामुळे हेक्टरी १५-२० किग्रॅ. ट्रायबेसिक कॉपर सल्फेटाची भुकटी उडवितात. पामेट्टो, पी.आर.२७, सॅंती व पॅलोमार ह्या रोगप्रतिकारक्षम जाती उपलब्ध आहेत.
भुरी : हाही कवकजन्य रोग असून त्यामुळे जून पानाच्या खालच्या बाजूवर पांढरे ठिपके पडतात. खोडावरही रोग येतो. यावर उपाय म्हणून हेक्टरी २५-४५ किग्रॅ. कॅरॅथेन भुकटी उडवतात. रोगप्रतिकारक्षम जाती लावतात.
कोनीय टिक्का : काकडी वर्गाचा हा महत्त्वाचा कवकजन्य रोग आहे. त्यामुळे पानावर व फळावर जलासिक्त ठिपके दिसतात. पानावर हे ठिपके शिरांलगत असतात. हे ठिपके करडे ते पिवळसर तपकिरी होतात. उपाय म्हणून बियांवर पाण्यात विरघळणाऱ्या पारायुक्त कवकनाशकाची पाच मिनिटे प्रक्रिया करतात व बी पुन्हा धुवून लावण्याने रोगाचे अंशतः नियंत्रण होते. स्ट्रेप्टोसायक्लिनाच्या फवारणीनेही रोगाला बराच आळा बसतो.
मोझेक : हा व्हायरसजन्य रोग असून माव्याव्दारे त्याचा प्रसार होतो, बियांतून होत नाही. त्यासाठी माव्याचे नियंत्रण करतात. शॅमरॉक इलिमा, ओहायओ-एम आर-२००, ओहायओ-एम आर-१७ इ. रोगप्रतिकारक्षम जाती लावणे हाच त्याच्या नियंत्रणाचा उपाय होय.
कीड : भोपळयावरील लाल भुंगेरा, मावा, कुरतडणाऱ्या अळ्या व फळमाशी यांच्या नियंत्रणासाठी १० टक्के बीएचसी भुकटी उडवतात. तसेच मॅलॅथिऑन किंवा फॉलिडॉल फवारतात. फळमाशी ही महत्वाची कीड आहे.
सूत्रकृमीमुळे मुळावर गाठी येतात. त्यामुळे पिकाची वाढ खुटते. नेमॅगॉनाची जमिनीस धुरी देतात.
पाटील, ह. चिं. जमदाडे, ज. वि.
“