कांडेचोर : स्तनिवर्गाच्या मांसाहारी गणातील व्हायव्हेरिडी कुलातला प्राणी. हा पॅराडॉक्झ्युरस वंशाचा असून भारतात याच्या सामान्य कांडेचोरमुख्यत्वेकरुन दोन जाती आढळतात. एक सामान्य कांडेचोर व दुसरी तपकिरी कांडेचोर होय.
सामान्य कांडेचोराचे शास्त्रीय नाव पॅराडॉक्झ्युरस हर्माफ्रोडिटस आहे. हा भारताच्या बहुतेक भागांत आढळतो. रंग काळा किंवा काळसर तपकिरी अंगावरचे केस लांब व जाड असून त्यांनी थंडीपासून बचाव होतो हे शीतनिवारक केस गळून पडल्यावर त्यांच्या खाली असलेले पांढरट, बदामी अथवा पिवळ्या केसांचे आवरण उघडे पडते या आवरणात पाठीवर लांब काळसर पट्टे आणि बाजू, खांदे व मांड्या यांवर काळे ठिपके असतात. डोके आणि धड मिळून लांबी ६० सेंमी. शेपूट जवळजवळ तितकेच लांब पाय गडद तपकिरी किंवा काळे डोळ्याच्या खाली पांढरा ठिपका असतो.
हा वृक्षवासी आणि निशाचर आहे. दिवसा झाडाच्या फांद्यांत अथवा खोडाच्या ढोलीत अंगाचे वेटोळे करुन हा झोपतो. रात्री झाडांवर हिंडून किंवा जमिनीवर भटकून तो भक्ष्य मिळवितो. लहान सस्तन प्राणी, पक्षी, किडे, फळे आणि बिया हे याचे भक्ष्य होय. मनुष्यवस्तीच्या आसपास राहणारे कांडेचोर कोंबड्या पळवितात आणि मळ्यांवर धाड घालतात. यांना ताडाचा गोड रस (नीरा) फार आवडतो. ताडाच्या झाडांवर लावलेल्या मडक्यात रस साठला म्हणजे झाडांवर चढून तो चोरुन पितात.
यांच्या गुदग्रंथीतून एक प्रकारचा घाणेरडा स्राव उत्पन्न होतो व स्वसंरक्षणाच्या कामी अखेरचा उपाय म्हणून हे शत्रुच्या अंगावर तो उडवितात.
यांची वीण कोणत्याही ऋतूत होते आणि मादीला दर खेपेस दोन-चार पिल्ले होतात. कांडेचोर सहज माणसाळतो.
तपकिरी कांडेचोर (पॅराडॉक्झयुरस जर्डनाय) दक्षिण भारताततील डोंगरांच्या रांगांत आढळतो. याचा गडद तपकिरी रंग हे याचे वैशिष्ट्य होय.
कर्वे, ज. नी.
“