करटोले : (हिं. कक्सा, गोलकंद गु. कंटोळा क. माडहागल सं. कर्कोटकी लॅ. मोमोर्डिका डायोइका कुल-कुकर्बिटेसी). फळभाजीचे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) पीक. ते श्रीलंकेत, मलायात व भारतात आढळते. लागवड १,५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात होऊ शकते.वेल बिनकाटेरी, पाने तीन ते पाच पाळ्यांची, अंडाकृती फुले महाराष्ट्रात जून ते ऑगस्टमध्ये एक एकटी येतात. वेलात नर – मादी असे दोन भेद असतात. करटोलीच्या वेली रानटी अवस्थेत कुंपणातही वाढताना आढळतात. फळे तीन ते सहा सेंमी. लांब, अंडाकृती असून त्यांच्या सर्वांगावर कारल्यासारखे तोकडे नरम उंचवटे असतात. शेंड्याला तोकडी चोच असते.

करटोलीला कसदार, निचर्‍याची, पाण्याची सोय असलेली बागायती जमीन व उष्ण हवामान लागते. जमिनीत ३० सेंमी. व्यासाची आणि तितकीच खोल आळी करून त्यात प्रत्येकी आठ – दहा किग्रॅ. शेणखत घालून करटोलीचे कंद पावसाळ्याच्या सुरुवातीला लावतात. बेणे उगवून वेल चांगले जगले म्हणजे दर आळ्यामध्ये ५० – ७५ ग्रॅ. सल्फेट ऑफ अमोनिया घालतात. खुरपणी, मांडव घालणे, पाणी देणे वगैरे बागायती पिकाप्रमाणे आंतर मशागत करतात. ऑगस्टपासून फेब्रुवारीपर्यंत कोवळी फळे भाजीसाठी काढतात. हेक्टरमधून ३,००० – ४,००० किग्रॅ. फळे मिळतात.

पहा : कारले.

पाटील, ह. चिं.