करकोचा : या पक्ष्याचा ग्रुइडी या पक्षिकुलात समावेश केलेला आहे. याचे शास्त्रीय नाव ग्रुस ग्रुस असे आहे. हा एक स्थलांतर करणारा पक्षी असून भारतात तो हिवाळी पाहुणा म्हणून येतो. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासून यांच्या झुंडीच्या झुंडी उत्तर आशियातून उत्तर भारतात येतात त्यांचा मुक्काम मुख्यत: उत्तर भारतात असलातरी ते दक्षिणेकडे महाराष्ट्रात आणि पूर्वेकडे ओरिसा आणि आंध्रप्रदेशापर्यंत पसरतात. एप्रिलच्या सुरुवातीला ते परत जातात.
हा एक मोठा पक्षी असून त्याची लांबी सु. ११५ सेंमी. असते. डोक्याचा वरचा भाग आणि डोळ्यापुढील भाग काळा मानेच्या काट्यावर मोठा तांबडा डाग डोक्याच्या दोन्ही बाजूंवर डोळ्यापासून निघालेला पांढरा पट्टा हनुवटी, गाल, गळा आणि मानेचा पुढचा भाग काळसर शरीराचा बाकीचा भाग करडा पंखांच्या आणि शेपटीच्या पिसांची टोके काळी चोच टोकदार आणि मळकट हिरवट रंगाची मान लांब पाय लांब व काळे शेपटी लोंबत्या पिसांच्या झुपक्याखाली दडलेली असते. हा स्थलचर पक्षी आहे.
करकोच्यांच्या लहान टोळ्या किंवा मोठे थवे असतात. सकाळी व संध्याकाळी ते शेतात जाऊन धान्य, कोवळी रोपे, किडे आणि लहान सरडे वगैरे प्राणी खातात. शेतीचे ते बरेच नुकसान करतात. दुपारी आणि रात्री ते एखाद्या नदीच्या पात्रात किंवा तलावाच्या काठी राहतात. ते अतिशय जागरूक असतात.
करकोच्याचा आवाज तुतारीच्या आवाजासारखा खणखणीत असतो. तो फार लांब अंतरापर्यंत आणि वेगाने उडू शकतो. उडत असताना टोळीची अथवा थव्याची रचना ∧(उलट्या व्ही अक्षरासारखी) अशा आकृतीची असते.
भारतातून परत गेल्यावर मे आणि जून महिन्यांत पूर्व सायबीरिया आणि तुर्कस्तान येथे यांची वीण होते. या पक्ष्याचे घरटे म्हणजे पालापाचोळ्याचा एक मोठा अव्यवस्थित ढिगारा असतो आणि तो बहुधा उघड्या किंवा झुडपे असलेल्या दलदलीच्या जागी केलेला असतो. मादी दर खेपेला दोन अंडी घालते. त्यांचा रंग हिरवट तपकिरी असून त्यांच्यावर गडद किंवा फिक्कट तांबूस तपकिरी रंगाचे लहानमोठे ठिपके असतात.
पहा : करकरा.
कर्वे, ज. नी.
“