कांगारू : स्तनिवर्गाच्या मार्सुपिएलिया गणातील (शिशुधान प्राणि-गणातील) मॅक्रोपोडिडी कुलात कांगारू आणि वॉलबी या प्राण्यांचा समावेश होतो. हे दोन्ही प्राणी दिसायला आणि संरचनेच्या दृष्टीने सारखेच असतात पण ज्याच्या पावलाची (नखे सोडून) लांबी २५ सेंमी. पेक्षा जास्त असते त्याला कांगारू आणि ज्याची यापेक्षा कमी असते त्याला वॉलबी म्हणण्याचा संकेत रूढ झाला आहे.

सगळ्या शिशुधान (मादीच्या उदरावर असलेली व जिच्यात पिल्लाची वाढ पूर्ण होते अशा पिशवी असलेल्या) प्राण्यांमध्ये कांगारू सर्वांत मोठा आहे. कांगारू ऑस्ट्रेलियात आणि टॅस्मेनियात आढळतात. कांगारूच्या तीन जाती आहेत : (१) मॅक्रोपस जायगॅंटियस  ही जाती ‘करडा कांगारू’ म्हणून ओळखली जाते. विरळ अरण्ये आणि झुडपांची दाट जंगले यांत ही रहाते (२) मॅक्रोपस रूफस या जातीला ‘लाल कांगारू’ असे म्हणतात आणि ती ऑस्ट्रेलियाच्या मैदानी प्रदेशात आढळते आणि (३) मॅक्रोपस रोबस्टस ही जाती किनाऱ्यावरील पर्वतात आणि अंतर्देशीय खडकाळ डोंगरांच्या रांगांत राहते. या जातीच्या कांगारुला ‘वालरू’ व ‘यूरो’ ही नावेही आहेत.

कांगारूची डोक्यासह शरीराची लांबी सामान्यतः ८०—१६० सेंमी. शेपटीची ७०—११० सेंमी. आणि वजन २५—७० किग्रॅं. असते. तथापि सर्व आयुष्यभर कांगारूची वाढ होत असल्यामुळे यापेक्षाही मोठे प्राणी आढळतात. अंगावरचे केस दाट आणि चरचरीत असतात. केसांचा रंग लालसर, तपकिरी, करडा अथवा काळसर असतो. मॅक्रोपस रूफस या जातीचा नर लालसर व मादी निळसर करडी असते.

 पिल्लासह कांगारू मादी

कांगारूचा ढुंगणाकडचा भाग बराच मोठा असून त्यातील स्नायू अतिशय मजबूत असतात. शेपटी मजबूत, बुडाशी जाड व टोकाकडे निमुळती होत जाते बसताना शेपटीचा उपयोग तिसऱ्या पायासारखा होतो मागचे दोन पाय आणि शेपटी सरळ जमिनीवर टेकून तो बसतो. उडी मारताना शेपटीचा उपयोग सुकाणूसारखा आणि शरीराचा तोल सांभाळण्याकरिता होतो. मागचे पाय पुढच्या पायांपेक्षा बळकट आणि मोठे असतात पाऊल लांब असते पावलावर पहिले बोट नसते दुसरे व तिसरे लहान व ती त्वचेने जोडलेली असतात चौथे बोट मजबूत व लांब असते आणि पाचवे साधारण लांब असते. पुढचे पाय लहान असून त्यांवर प्रत्येकी लहानमोठी पाच बोटे असतात. या बोटांच्या टोकांवर नखर (नख्या) असतात.

गवत, झुडपांची पाने व कोवळे भाग हे यांचे भक्ष्य होय. चरताना चारही पाय आणि शेपटी यांचा उपयोग करुन हे हळूहळू चालतात, पण उड्या मारीत जाणे हे यांचे वैशिष्ट्य होय. साधारण गतीने जात असताना कांगारू एका उडीत १–२ मी. अंतर ओलांडतो पण जास्त वेगाने जात असताना एका उडीत ९ मी. किंवा त्यापेक्षाही जास्त अंतर तो तोडतो. उघडया प्रदेशात तो ताशी ४८ किमी. वेगाने धावू शकतो.

कांगारू निशाचर असल्यामुळे रात्रभर चरत असतो आणि दिवसा विश्रांती घेतो. लाल कांगारूंचे मोठाले कळप कधीकधी एके ठिकाणी विश्रांती घेतात. वॉलरू पुष्कळदा गुहांचा आसरा घेतात. कांगारू पाण्याशिवाय दोनतीन महिने सहज राहू शकतो.

प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नसतो पण बहुतेक पिल्ले हिवाळ्यात जन्मतात. गर्भावधी ३०—४० दिवसांचा असतो. जन्माच्या वेळी पिल्लांची लांबी सु. पाच सेंमी. असते. मादीच्या उदरावर एक पिशवी असून तिचे तोंड पुढे असते. हिला शिशुधानी म्हणतात. शिशुधानीत चार सड असतात. पिल्लू जन्मल्यानंतर मादी त्याला आपल्या ओठांनी उचलून शिशुधानीतील एका सडाला चिकटविते. पिल्लाला दूध चोखून प्यावे लागत नाही सडातून ते त्याच्या तोंडात आपोआप येते. पिल्लाच्या अंगावर केस येऊन ते आपले भक्ष्य मिळवू लागेपर्यंत शिशुधानीत राहते. सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील गोऱ्या वसाहतवाल्यांनी कांगारूची मोठ‌्या प्रमाणावर हत्या केली. तेथील आदिवासी कांगारूचे मांस खातात.

दातार, म. चि.