कॅले : फ्रान्सचे उत्तरेकडील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ७४,६२४ (१९६८). हे डोव्हर सामुद्रधुनीवर, पॅरिसच्या उत्तरेस २३३ किमी. आहे. कॅले आणि इंग्लंडमधील डोव्हर यांमध्ये या दोन देशांतील कमीत कमी (४३ किमी.) अंतर आहे. येथे मच्छीमारी बोटींची बांधणी व दुरुस्ती आणि रेशमी कापड, लेस, होजियरी, दूरध्वनीच्या तारा, बिस्किटे, औषधे इत्यादींचे कारखाने आहेत. उत्तर फ्रान्समधील जलमार्गास हे कालव्याने जोडले आहे. इंग्लंडमधील डोव्हर व फोक्स्टन यांच्याशी येथून मोठी जलवाहतूक चालते. इंग्लंड फ्रान्समधील शतसांवत्सरिक युद्धात १३४७ मध्ये फ्रेंचांनी इंग्लंडच्या तिसऱ्या एडवर्डविरुद्ध अकरा महिने शहर झुंजविले. तेव्हापासून १९५८ पर्यंत कॅले इंग्लंडच्या ताब्यात होते. दुसऱ्या महायुद्धात कॅलेची अपरिमित हानी झाली. मे १९४० ते सप्टेंबर १९४४ पर्यंत ते जर्मनांच्या ताब्यात होते.
ओक, द. ह.