कॅलिफोर्नियम : एक मानवनिर्मित घनरूप मूलद्रव्य. चिन्ह Cf. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ९८ अणुभार २४६ समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) अणुभार २४४ ते २५४. सर्व समस्थानिक किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकण्याचा गुणधर्म असलेले). आवर्त सारणी (मूलद्रव्यांची विशिष्टपद्धतीने केलेली कोष्टक-रूप मांडणी) गट ३ स्थिर संयुजा [अणूंची परस्परांशी संयोग पावण्याची शक्ती, → संयुजा] ३.

प्राप्ती : सीबॉर्ग, टॉमसन, घिओर्सो व स्ट्रीट यांनी १९५० साली अमेरिकेतील ‘कॅलिफोर्निया रेडिएशन लॅबोरेटरी’ मध्ये क्यूरियम (२४२) वर हीलियम आयनांचा (विद्युत्‌ भारित अणूंचा) मारा करून ह्या मूलद्रव्याच्या २४५ अणुभाराचा समस्थानिक बनविला. या लॅबोरेटरीच्या व राज्याच्या नावावरून कॅलिफोर्नियम हे नाव देण्यात आले.

96C242

+

2He4

® 

98Cf245

+

0n1

क्यूरियम

 

हीलियम 

 

कॅलिफोर्नियम 

 

न्यूट्रॉन 

युरेनियम (२३८) वर कार्बन आयनांचा मारा केल्यास कॅलिफोर्नियम (२४६) मिळते. याचा २५२ अणुभाराचा समस्थानिक सर्वांत सहज तयार करता येण्यासारखा असून अणुकेंद्रीय विक्रियकांत (अणुभट्‌ट्यांत) काही मिलिग्रॅमपर्यंत मिळू शकतो. याचा अर्धायुःकाल (मूळची किरणोत्सर्गी क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काल) २–६ वर्षे आहे.

कॅलिफोर्नियमाचे रासायनिक गुणधर्म ॲक्टिनाइड (अणुक्रमांक ८९व त्यावरील असणार्‍या) मूलद्रव्यांसारखे आहे. याचे नायट्रेट, सल्फेट क्लोराइड व परक्लोरेट पाण्यात विद्राव्य (विरघळणारे) आहे. लॅंथॅनम फ्ल्युओराइड, ऑक्झॅलेट व हायड्रॉक्साइड यांच्याबरोबर ते सह-अवक्षेपित करता येते (जोडीने साका तयार करता येतो). याचे क्लोराइड षट्‌कोणीय असून याची हॅलाइडे मूलद्रव्यावर हॅलोजनाची विक्रिया करून किंवा ऑक्साइडावर हॅलोजनी अम्‍लांच्या विक्रीया करून मिळविता येतात.

उपयोग : अणुगर्भीय संशोधनात एक मार्गण द्रव्य (ज्याच्या किरणोत्सर्गाचा उपकरणांद्वारे शोध घेऊन विविध प्रक्रियांच्या मार्गक्रमणाचा अभ्यास करण्यात येतो असे मूलद्रव्य) म्हणून याचा उपयोग होतो. याचा २५२ अणुभाराचा समस्थानिक अणुकेंद्रीय भौतिकी व वैद्यकीय संशोधन यांत उपयोगी पडतो.

कारेकर, न. वि.