नॉर्थ्रप, जॉन हॉवर्ड : (५ जुलै १८९१ – ). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. एंझाइमांच्या (सजीवांमधील जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांच्या) व त्यांच्याशी निगडित अशा द्रव्यांच्या स्फटिकीकरणासंबंधी त्यांनी मूलभूत महत्त्वाचे कार्य केले. या कार्याबद्दल त्यांना ⇨ जेम्स बॅचलर सम्नर व ⇨ वेंडेल मेरेडिथ स्टॅन्ली यांच्याबरोबर १९४६ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. त्यांचा जन्म याँकर्स (न्यूयॉर्क) येथे व शिक्षण कोलंबिया येथे झाले. १९१२ मध्ये बी. एस्., १९१३ मध्ये एम्. ए. व १९१५ मध्ये पीएच्. डी. ह्या पदव्या त्यांनी मिळविल्या. रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी झाक लब यांच्याबरोबर आयुर्मर्यादा सिद्धांताविषयी अभ्यास केला. १९२४ मध्ये त्या संस्थेचे ते सभासद झाले. १९४९ मध्ये बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात सूक्ष्मजीवविज्ञानाचे संशोधन प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.

नॉर्थ्रप यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात ॲसिटोन व एथिल अल्कोहॉल तयार करण्याच्या किण्वनाच्या (आंबविण्याच्या) क्रियेसंबंधी केलेल्या संशोधनापासूनच पचन, श्वसन आणि सर्वसाधारण जीवनावश्यक प्रक्रियांना आवश्यक असणाऱ्या एंझाइमांच्या अभ्यासास चालना मिळाली. एंझाइमांना रासायनिक नियम लागू पडतात, हे त्यांनी दाखवून दिले. १९३० मध्ये त्यांनी पेप्सीन शुद्ध स्फटिकीय स्वरूपात तयार केले. मोझेस कुनिट्झ यांच्या मदतीने त्यांनी ट्रिप्सीन व कायमोट्रिप्सीन ही एंझाइमे आणि ट्रिप्सिनोजेन व कायमोट्रिप्सिनोजेन ही त्यांची पूर्वगामी द्रव्ये (ज्या आधीच्या द्रव्यापासून ही एंझाइमे मिळतात अशी द्रव्ये) स्फटिकरूपात तयार केली. रॉजर एम्. हेरिओट यांच्या मदतीने त्यांनी स्फटिकीय पेप्सिनोजेन वेगळे केले. मांस व्हायरस व प्रतिपिंडे (ज्यांमुळे प्राण्यांना सूक्ष्मजंतू, त्यांची विषे किंवा इतर काही पदार्थांना प्रतिकार करण्याची क्षमता मिळते असे रक्तरसात उत्पन्न होणारे विशिष्ट पदार्थ) यांच्या प्रथिनांचा अभ्यास केला. सूक्ष्मजंतूंचा नाश करणारा सूक्ष्मजंतुभक्षक (एक प्रकारचा व्हायरस) त्यांनी सस्तन प्राण्यांच्या आतड्यापासून वेगळा केला. यांशिवाय त्यांनी स्टार्च, सूक्ष्मजंतूंचे समूहन (एकत्र येणे), कीटकांवरील तापमानाचा परिणाम इ. विषयांचेही संशोधन केले. १९४१ मध्ये त्यांनी घटसर्पावरील प्रतिविषाचे शुद्धीकरण केले.

क्रिस्टलाइन एंझाइम्स हा त्यांचा ग्रंथ १९३९ मध्ये प्रसिद्ध झाला. तसेच रॉकफेलर इन्स्टिट्यूटतर्फे प्रकाशित होणाऱ्या जर्नल ऑफ जनरल फिजिऑलॉजी  या पत्रिकेचे संपादन ते करीत होते. दुसऱ्या महायुद्धात ते अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संशोधन समितीचे सल्लागार होते.

 

जमदाडे, ज. वि.