फिटोनिया : शोभिवंत पानांमुळे बागेत निश्वितपणे स्थान मिळवणाऱ्या काही वनस्पतींच्या वंशाचे शास्त्रीय नाव. या वंशाचा अंतर्भाव फुलझाडांपैकी ⇨ ॲकँथेसीमध्ये (वासक कुलात ) केला असून त्यात अलीकडे तीन (काहींच्या मते दोन) जाती समाविष्ट केलेल्या आढळतात. त्या सर्वच मूळच्या द. अमेरिकेतील पेरू देशातील असून सर्वत्र उद्यानात लावल्या जातात. त्या सर्व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), लहान, ओषधीय [ ⟶ ओषधि] असून खोडावरील समोरासमोर असलेल्या मोठ्या, हृदयाकृती व विविधरंगी शिरा व उपशिरा यांच्या जाळ्यामुळे ठळकपणे दिसून येणाऱ्या पानांबद्दल त्या प्रसिद्ध आहेत. खोड व शाखा यांच्या टोकांस थोड्या सच्छद, लहान फुलांचा कणिश प्रकारचा फुलोरा [⟶ पुष्पबंध] येतो. शुष्क फळात (बोंडात) साधारणतः चार बिया असतात.  फिटोनिया अर्जिनोन्यूरा ह्या जातीच्या पानांवरचे शिरांचे जाळे पांढरे असते, तर फि. व्हेरशाफेल्टय आणि फि. जायगँशिया यांच्या पानांवर तांबडे झाळे असते. पानांच्या आकारात, केसाळपणात व खोडांच्या उंचीत या जातींत किरकोळ फरक असतात. पहिल्या दोन जातींत फुले पिवळी असतात. तिसऱ्या जातींत फुलावर तांबूस पट्टे असतात. उष्ण कटिबंधात या जाती सावलीत व पादपगृहात (नियंत्रित परिस्थितीमध्ये वनस्पती वाढविण्याच्या बंधिस्त जागेत) लावतात. मोठ्या झाडांखाली कोठे कोठे जमिनीवरची मोकळी जागा भरून काढण्यासही याचा उपयोग करतात. अभिवृद्धी (लागवड) कलमे लावून करतात.  फि. पिअरसाय हा फि. व्हेरशाफेल्टाय जातीचा एक प्रकार मानला जातो.

पहा : ॲकँथेसी.

संदर्भ :  Bruggeman. L. Tropical Plants and Their Cultivation, London, 1962.

पाटील, शा. दा. पराडेकर, शं. आ.

फिटोनिया : (१) फिटोनिया अर्जिरोन्यूरा, (२) फिटोनिया पिअरसाय.