सेवा क्षेत्र : अर्थव्यवस्थेतील तीन भागांपैकी तिसरा भाग म्हणजे सेवाक्षेत्र. प्राथमिक क्षेत्र व द्वितीयक (निर्माणक) क्षेत्र ही पहिली दोन क्षेत्रे होत. प्राथमिक क्षेत्रात कृषी, पशुपालन, मासेमारी, इत्यादींचा; तर द्वितीयक क्षेत्रात उत्पादन, प्रक्रिया व बांधकाम यांचा समावेश असतो. तृतीयक क्षेत्रात अर्थव्यवस्थेतील सर्व प्रकारच्या अदृश्य स्वरूपातील सेवांचा समावेश होत असल्याने त्यास सेवाक्षेत्र असे संबोधले जाते. माणसाच्या उत्क्रांतीतही तो सर्वप्रथम निसर्गावर अवलंबून होता. त्यामुळे त्यावेळची अर्थव्यवस्था शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम अशा निसर्गाकडून उपलब्ध होणाऱ्या गोष्टींवर अवलंबून होती, म्हणून या क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र असे म्हणतात. तदनंतर मनुष्यप्राण्याने निसर्गनिर्मित गोष्टींवर प्रक्रिया करून नवनव्या वस्तूंचे उत्पादन व निर्माण सुरू केले. सबब हे द्वितीयक क्षेत्र झाले. सेवांच्या पुरवठ्यावर अर्थव्यवहार हा माणसाच्या उत्क्रांतीतील त्यानंतरचा टप्पा झाला, म्हणून सेवाक्षेत्र हे त्यानंतरचे तृतीयक क्षेत्र अस्तित्वात आले.

सेवा या वस्तूसारख्या दृश्य नसतात. या अदृश्य स्वरूपातील सेवांमुळे प्राथमिक आणि द्वितीयक क्षेत्रे धारणीय व अधिक उपयुक्त स्थितीत येतात. सेवाक्षेत्रातील उद्योगांना ‘ज्ञान अर्थव्यवस्थे’वर लक्ष केंद्रित करावे लागते. सेवांची निर्मिती व पुरवठा हे या क्षेत्राचे प्रमुख वैशिष्ट्य असून ग्राहकांना सामान्य दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असतो. सेवाक्षेत्रात प्रामुख्याने व्यापार, वाहतूक, दळणवळण, वित्तपुरवठा व व्यावसायिक स्वरूपाच्या अदृश्य सेवांचा समावेश होतो. ग्राहकांची गरज ओळखून तिची जलद व कमीतकमी किंमतीला पूर्तता करणे हे सेवाक्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. ‘बँकिंग’ या सेवाक्षेत्रातील महत्त्वाच्या घटकाकडे पाहिल्यास माहिती व संचार तंत्रज्ञानाचा वापर करून किमान मनुष्यबळाच्या साहाय्याने किमान खर्चात उत्तम व चोवीस तास उत्कृष्ट सेवा देण्यात झालेले बदल सहज समोर येतात.

उत्पादकता, उपयुक्तता, क्षमता, टिकाऊपणा आणि संभाव्यता यांत सुधारणा करण्यासाठी माणसाने आपल्या ज्ञानाचा व वेळेचा उपयोग करून केलेल्या सर्व बाबी सेवाक्षेत्रात येतात. अशा अदृश्य सेवांत वस्तूत सुधारणा करणे, सल्ला देणे, मदत, अनुभव, चर्चा, तज्ज्ञता यांचा समावेश होतो. सद्यस्थितीत सेवाक्षेत्राची व्याप्ती वाढत असून त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे : दूरसंचार, पर्यटन, वित्तपुरवठा, माध्यमे, आदरातिथ्य, कायदेविषयक सेवा, अन्नप्रक्रिया उद्योग, सल्ला सेवा, शिक्षण, गुंतवणूक. किरकोळ विक्री सुविधा इत्यादी. जागतिक पातळीवर समान धोरण असावे.

किरकोळ विक्री सुविधा इत्यादी. जागतिक पातळीवर समान धोरण असावे यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) व्यापारातील सेवासंबंधी सामान्य करार (गॅट) १९९१ नुसार सेवाक्षेत्राचे बारा विभागात वर्गीकरण करण्यात आलेले आहे, ते विभाग खालीलप्रमाणे :

(१) व्यवसायविषयक सेवा : सर्व व्यवसायिकांच्या (प्रोफेशनल्स) सेवा, संगणक व संगणक संबंधित (हार्डवेअर, सॉफ्टवेअर) सर्व सेवा, संशोधन व विकास, स्थावर मालमत्ताविषयक सेवा, भाडेपट्ट्याने सेवा देणे इत्यादी.

(२) दळणवळण सेवा : पोस्टल सेवा, कुरियर सेवा, दूरसंचार सेवा, ऑडिओ व्हिझ्युअल (दृक्श्राव्य) व इतर सेवा.

(३) वितरणविषयक सेवा : सर्व मध्यस्थांच्या, घाऊक व किरकोळ व्यापारासंबंधीच्या प्रायोजकत्वाबाबतीतील सेवा व इतर सेवा.

(४) बांधकाम व स्थापत्यविषयक सेवा : इमारत बांधकाम, नागरी अभियांत्रिकी संबंधीची कामे, विविध प्रकल्प उभारणी, साधनसामुग्री एकत्रीकरण, बांधकाम पश्चात सेवा व इतर सेवा.

(५) शिक्षणविषयक सेवा : प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापीठीय शिक्षण, प्रौढ शिक्षण, सर्व शैक्षणिक उपक्रम यांबाबतच्या सेवा.

(६) पर्यावरण सेवा : स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व इतर सेवा.

(७) वित्तीय पुरवठा : बँका, सर्व वित्तीय संस्था, विमा कंपन्यांकडून होणारा अर्थपुरवठा, भांडवलबाजार व मध्यस्थांच्या सेवा.

(८) आरोग्य व सामाजिक सेवा : सर्व दवाखाने, इस्पितळे यांमधील सेवा, आरोग्यासंबंधी सेवा पुरविणाऱ्या संस्था, सामाजिक कार्याबाबतच्या सेवा व इतर सेवा.

(९) पर्यटन व प्रवासविषयक सेवा : हॉटेल्स व उपहारगृहे यांमधील सेवा (निवास व भोजन व्यवस्थेसह), पर्यटन संस्थांच्या सेवा, पर्यटन मार्गदर्शक सेवा.

(१०) मनोरंजन, सांस्कृतिक व खेळविषयक सेवा : मनोरंजन क्षेत्रातील सर्व सेवा, वृत्तपत्र सेवा, ग्रंथालये, संग्रहालये, सार्वजनिक उद्याने, क्रिडांगणे यांबाबतीतील सेवा.

(११) वाहतूकविषयक सेवा : जहाज, समुद्रमार्गाने होणारी प्रवासी व मालवाहतूक सेवा, विमान व अंतरिक्ष सेवा, रस्ते, रेल्वे वाहतूक तसेच वाहतूक आनुषंगिक सर्व प्रकारच्या सेवा..

(१२) उपरोक्त सेवांमध्ये समाविष्ट न झालेल्या सर्व सेवा.

गेल्या तीन-चार दशकात देशाच्या आर्थिक-सामाजिक विकासात सेवाक्षेत्र हे ‘जीवन रेखा’ ठरले असून त्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत उत्पादन, उत्पन्न व रोजगार यांत सेवाक्षेत्राचे महत्त्व लक्षणीय आहे. जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था व स्पर्धा यांमुळे सेवाक्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. ज्ञान- विज्ञान, परस्पर सुसंवाद, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जटील प्रश्नांची उकल करण्याची क्षमता यांमुळे सेवाक्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा अतिमहत्त्वाचा घटक होत आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी शासकीय तसेच खाजगी संस्था व व्यक्तींच्या पातळीवर प्राधान्य देण्यात येत आहे. प्राथमिक आणि द्वितीयक क्षेत्राच्या तुलनेत सेवाक्षेत्राचा विकास अधिक वेगाने होत असून पाश्चात्त्य देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र झाले आहे. अमेरिकेत ७०%, तर जपानमध्ये जवळपास ६०% कर्मचारी सेवाक्षेत्रात कार्यरत आहेत. २०१२-१३ मधील काही प्रमुख देशांचे सेवाक्षेत्रातील योगदान पुढीलप्रमाणे (आकडे अब्ज डॉलरमध्ये) : अमेरिका – १२,९४१, यूरोपियन युनियन – १२,६६२, चीन – ४,०२३, जपान – ३,६७७, जर्मनी – २,५५८, फ्रान्स – २,१८६, ग्रेट ब्रिटन – १,८९५, ब्राझील – १,६५१, इटली – १,५३८, रशिया – १,३९०, कॅनडा – १,२८३, भारत – १,२८२, ऑस्ट्रेलिया – १,१०३ (संदर्भ – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, २०१३). भारतात सेवाक्षेत्राचा १९५०-५१ मधील एकूण ठोकळ उत्पन्नातील हिस्सा ३३.३% एवढा होता, तर २०१२-१३ मध्ये वाढून तो ५६.५% इतका झाला आहे. यावरून अर्थव्यवस्थेतील सेवाक्षेत्राचे महत्त्व झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते.

सेवाक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रशिक्षणाची सोय असल्याने ते क्षेत्र अधिक समृद्ध व शास्त्रशुद्ध झाले आहे. उदा., एम्. एस्. डब्ल्यू. (मास्टर ऑफ सोशल वर्क) या अभ्यासक्रमास जागतिक मान्यता असून हे प्रशिक्षित समाजसेवक, इस्पितळे, समुपदेशन केंद्रे, चिकित्सालये, विद्यालये व महाविद्यालये, औद्योगिक क्षेत्रातील तणावमुक्ती केंद्रे येथे महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात.

सेवापुरवठा करणाऱ्यांना वस्तुपुरवठा करणाऱ्यांपेक्षा वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा सेवा अदृश्य स्वरूपात असल्याने संभाव्य ग्राहकांना सेवेपासून निश्चित किती लाभ होणार व त्याचे निश्चित मूल्य काय असेल याची स्पष्ट कल्पना येत नाही. मध्यस्थ अगर सल्लागार शुल्क आकारतात, परंतु सेवेची पूर्ण हमी देत नाहीत. आकारण्यात येणाऱ्या शुल्कात खूपशी भिन्नता असते व एकूण सेवा खर्चापैकी शुल्काचे प्रमाणही जास्त असते. उत्पादन क्षेत्राच्या तुलनेत सेवाक्षेत्रातील खर्चाचे प्रमाण वाढत जाणारे असते.

गोविलकर, विनायक; चौधरी, जयवंत; इन्दुरवाडे, स. ही.