हिटाइट भाषा : तुर्कस्तानातील ॲनातोलियाच्या उत्तर-मध्य भागात इ. स. पू. दुसऱ्या सहस्त्रकात ही भाषा वापरली जात असे. ही ⇨ इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील भाषा आहे. तिचे भाषक बहुधा तिला नेसाईट म्हणत असावेत. हिटाइट हे नंतर मिळालेले नाव. बोगाझकई (हॅट्सस) या हिटाइट साम्राज्याच्या राजधानीच्या ठिकाणाच्या उत्खननातून अनेक संहिता सापडल्या आहेत. त्यांवर हिटाइट साम्राज्याचे लेख बाणाग्र चिन्हांनी कोरलेले सापडले. भाषेचा मोठा पुरावा हा दस्तऐवज स्वरूपात आहे; मात्र, भाषकांची नेमकी संख्या किती या प्रश्नाचे उत्तर खात्रीशीर रीत्या देता येत नाही; परंतु इ. स. पू. १७०० ते इ. स. पू. १३०० या दरम्यान ती नक्कीच बोली भाषा असावी. या काळात भाषिक बदलाची चिन्हे ठळकपणे दिसतात. नंतर इ. स. पू. १३०० पर्यंत हिटाइटचा वापर सीमित होऊन ती नामशेष झाली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे.

मेसोपोटेमियाच्या स्थानिक ⇨ क्यूनिफॉर्म लिपीत हिटाइट लिहिली जात होती. ही लिपी या भाषेतील ध्वनींसाठी फारशी साजेशी नव्हती. भाषिक ध्वनींच्या आकलनासाठी ही एक मोठी अडचण ठरते. स्वरांमध्ये अ (यातून इंडो-यूरोपियन अ आणि ओ या दोन्हींचे सूचन होते), ए आणि इ (हे आधीच्या संहितांमध्ये वेगवेगळे दाखविले जात; परंतु नंतर बहुधा एकाच चिन्हाने यांचा निर्देश झाला असावा) आणि उ असे स्वर आहेत. या भाषेत ओष्ठ्य, दंत्य, कंठ्य आणि दंत्य-कंठ्य अशी चार वर्गांतील व्यंजने सापडतात. हिटाइटचा खास विशेष म्हणजे जिच्यात स्वरयंत्रीय प्रवाही ध्वनी टिकून आहेत अशी संपूर्ण इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील ती एकच भाषा आहे. स्विस भाषाभ्यासक ⇨ फेर्दिनां द सोस्यूरने या भाषेत ‘ह’ हा ध्वनी असावा, असा अंदाज बांधला होता. पुढे अधिक पुरावे उपलब्ध झाल्यावर सोस्यूरचा हा अंदाज खरा ठरला. या अंदाजबांधणीला महत्त्व होते; कारण त्यात स्वरयंत्रीय सिद्धान्तच दडलेला होता. तो इतर ध्वनींची संगती लावण्यास उपकारक ठरला आणि त्यामुळे ध्वनिबदलाचे स्पष्टीकरणही हाती आले.

हिटाइट नामे ही स्त्रीलिंगी आणि द्विवचनी नसतात. अर्थात स्त्रीलिंग आणि द्विवचन या विशेषांचा लोप झालेला आहे. आधीच्या संहिता किमान प्रथमा विभक्तीच्या बाबतीत तरी सर्व विभक्ती दाखवितात; परंतु पुढील काळात चतुर्थी आणि सप्तमी या एकरूप झालेल्या आहेत. अनेकवचनात तर रूपे अजूनच कमी झाली आहेत. क्रियापदरूपे ही दोन काळ वर्तमान आणि भूतकाळ ), दोन अर्थ (स्वार्थ आणि आज्ञार्थ) आणि दोन प्रयोग (कर्तरी आणि मध्यगत कर्मप्रधान क्रियामुख) यांचा निर्देश करतात.

इतर पुरातन इंडो-यूरोपियन भाषांसारखाच हिटाइटचा वाक्यविन्यास आहे. हिटाइटचा एक विशेष म्हणजे वाक्याच्या किंवा पदबंधाच्या आरंभी निपात किंवा अव्ययांची आणि सर्वनामांची साखळीच उपस्थित होते. दुसरे म्हणजे भासमान प्रेरकविभक्तीचा वापर. सकर्मक क्रियापदात केवळ (विभक्तिप्रत्ययरहित) कर्ता हा कर्तृस्थानी असू शकत नाही; म्हणून पंचमीचा अर्थ तिथे प्रथमा असा घेतला जातो.

पहा : इंडो-यूरोपियन भाषाकुटुंब.

धारूरकर, चिन्मय; मालशे, मिलिंद