निजामी – ए – गंजवी : (११४०–१२०२-३). श्रेष्ठ फार्सी कवी. संपूर्ण नाव निजामी-ए-गंजवी किंवा निझामुद्दीन इलीयास इब्न युसुफ. सध्याच्या सोव्हिएट रशियामधील आझरबैजान ह्या राज्यातील गंजा येथे त्याचा जन्म झाला. ‘निजामी’ एवढ्यातच नावाने तो सामान्यत: ओळखळा जातो. बालपणीच त्याचे आईवडील निवर्तले आणि त्यानंतर त्याचे पालनपोषण करणारा त्याचा चुलताही मरण पावला. ह्या दु:खांमुळे अंतर्मुख होऊन निजामीची वृत्ती आधिकाधिक धार्मिक बनत गेली आणि एक श्रेष्ठ कवी म्हणूनच नव्हे, तर एक सात्विक, धर्मनिष्ठ पुरुष म्हणूनही तो प्रसिद्धी पावला. ‘खमसा’ म्हणून नावारूपाला आलेल्या पाच मसनवींकरिता तो विख्यात आहे. यांपैकी सनाईच्या हदीकाच्या धर्तीवर त्याने मखझनुल असरार या नावाची पहिली मसनवी सु. ११७६ मध्ये लिहीली. बेहराम शहाला समर्पित केलेली ही मसनवी एक धार्मिक व नैतिक स्वरूपाची कविता आहे. तीत वीस प्रवचने असून प्रत्येक प्रवचन उपाख्यानाच्या साहाय्याने सुस्पष्ट केले आहे. ‘खुसरव शेरीन’ ही कविता बहुधा ११८० मध्ये लिहिली गेली असावी. खुसरवचे शिरीन या आपल्या प्रयेसीवरील प्रेमाचे व त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या फरहादच्या शोकांतिकेचे वर्णन असलेले ते एक शृंगारिक प्रेमकाव्य आहे. ११८८ मध्ये निजामीने लिहिलेले लैला-मजनू हे काव्य त्याने अखतीसानला अर्पण केले आहे. शाहनामामधील वृत्तरचनेचा उपयोग करून लिहिलेले त्याचे इस्कंदरनामा (आवृ. पहिली ११९१, आवृ. दुसरी १२००) हे अलेक्झांडर द ग्रेट या विषयावरील काव्य होय. हफ्त पैकर ही त्याची सर्वोत्कृष्ट कलाकृती ११९८ मध्ये लिहिली गेली. सात प्रेयसींच्या-ज्यांतील एक भारतीय होती-प्रेमात पडलेल्या बेहरामगोरचे जीवन हा या काव्याचा वर्ण्यविषय. निजामीने कासीदा व गझलाही लिहिल्या आहेत. कल्पनाप्रधान रूपके आणि नवनवीन विशेषणे हे या काव्याचे लक्षणीय विशेष. इराण, तुर्कस्तान व भारत या देशांतील फार्सी कवींवर त्याच्या काव्याचा पुढे प्रभाव पडलेला दिसून येतो.

नईमुद्दीन, सैय्यद