इब्‍न अल्-मुक्फा : (? –७६० ?). अरबी साहित्याच्या सुवर्णकाळातील (७५०–१०५५) एक श्रेष्ठ गद्यलेखक. त्याचे मूळचे नाव रुझबिह असून तो बरऱ्याचा रहिवासी होता. या कालखंडात तत्कालीन राज्यकर्त्यांच्या गरजांमुळे अरबी प्रशासकीय गद्यलेखनाला चालना मिळाली. त्यात राजकुलातील लोकांचा आचारधर्म आणि प्रशासकीय कार्यपद्धती यांसंबंधीचे कथारूप वा निबंधरूप लेखन अंतर्भूत होते. इब्‍न अल्-मुक्फाने संस्कृत पंचतंत्रातील काकोलूकीय तंत्राच्या पेहलवी भाषेतील रूपांतरावरून कलीला वा दिम्‌ना हा ग्रंथ लिहिला. याशिवाय दोर्रा अल् यतिमा (इं. शी. द सॉलिटरी पर्ल) आणि सियर मुलुक उल् अजम (इं. शी. द क्रॉनिकल्स ऑफ द किंग्ज ऑफ इराण) ही सध्या उपलब्ध नसलेली पुस्तकेही त्याने लिहिली असावीत, असे उत्तरकालीन इतर ग्रांथिक पुराव्यांवरून दिसते. यांपैकी पहिले पुस्तक राजनिष्ठेसंबंधी असून, दुसरे पुस्तक एका पेहलवी भाषेतील ग्रंथाचे भाषांतर आहे. अरबीतील पहिला शैलीकार गद्यलेखक म्हणून मुक्फाची प्रसिद्धी आहे. भाषेतील आकर्षक साधेपणा, चित्तवेधक व नीतिपर आशय हे त्याचे लेखनगुण उल्लेखनीय आहेत. काही अज्ञात कारणांसाठी मुक्फाला मन्सुर या दुसऱ्या अब्बासी खलीफाने ठार केले, असे म्हणतात.

जाधव, रा. ग.