शेरीफ : (नगरपाल). ब्रिटिशांच्या राज्यव्यवस्थेमधील एक महत्त्वाचे शासकीय पद. नॉर्मन लोकांनी इ. स. १०६० मध्ये संपूर्ण इंग्लंड पादाकांत करण्याच्या आधीपासून इंग्लंडमध्ये परगणे (काउंटीज), महानगरे (सिटीज) व इतर शहरांसाठी (टाउन्स) शेरीफ या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येई व आजतागायत हे पद कायम आहे. पूर्वी परगण्यांसाठी उच्च शेरीफची नेमणूक स्वतः लॉर्ड चान्सेलर जुन्या प्रघातानुसार दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी करीत. इतर शेरीफांच्या नेमणुका स्थानिक राज्यमंडळांकडून करण्यात येत.

सुरूवातीला शेरीफकडे आपापल्या कक्षेतील भूभागाचे सर्व शासकीय व न्यायालयीन अधिकार केंद्रीभूत झालेले होते परंतु इ. स. बाराव्या शतकामध्ये व विशेषतः दुसऱ्या हेन्रीच्या कारकीर्दीत (११५४ – ८९) गुन्ह्यांचा प्राथमिक तपास करणे, मोठे गुन्हे करणाऱ्या आरोपींना कोठडीत ठेवणे व छोट्या गुन्ह्यांची दखल घेऊन त्यांचा निकाल देणे, एवढीच कामे शेरीफच्या हातात राहिली. ⇨कोरोनर, स्थानिक ⇨ पोलीस,जे. पी. (जस्टिस ऑफ द पीस) इ. पदांच्या निर्मितीमुळे तसेच पंधराव्या व सोळाव्या शतकांतील ट्यूडर घराण्याच्या राजवटीत निरनिराळ्या स्थानिक राज्यसंस्थांची स्थापना झाल्यामुळे शेरीफ हे फक्त मानाचे व दिखाऊ स्वरूपाचे पद झाले. १८७७ सालचा शेरीफ अधिनियम संमत झाल्यानंतर इंग्लंडमध्ये सर्व शेरीफांना समान स्वरूपाचे अधिकार बहाल करण्यात आले. त्यांपैकी न्यायाधीशांना मदत करणे, रिट अर्जांची अंमलबजावणी करणे, ज्यूरी बनण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तींची यादी बनविणे, संसदेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक निर्वाचन अधिकारी म्हणून काम करणे आणि १९६५ सालचा मनुष्यवध-अधिनियम (देहदंड शिक्षेचे उच्चटन) संमत होण्याअगोदर, न्यायालयाने दिलेल्या देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करणे, एवढेच अधिकार शेरीफकडे उरलेले आहेत. स्कॉटलंडमध्ये मात्र अजूनही शेरीफकडे दिवाणी दावे व फौजदारी खटले चालविण्याची न्यायालयीन अधिकारिता आहे. इंग्लंड व स्कॉटलंड यांमधील सर्व शेरीफांना शांतताभंग किंवा दंगाधोपा होण्याचा संभव टाळण्यासाठी योग्य ती ठोस पावले उचलण्याचे अधिकार आहेत.

अमेरिकेतील संयुक्त संस्थानांमध्ये शेरीफ हा त्या त्या परगण्यातील शासकीय अधिकारी व न्यायालयीन प्रमुख सेवक असतो. तो केवळ दोन ते चार वर्षांसाठी निवडून दिलेला असतो. त्याच्याकडे बऱ्याच स्वरूपाचे पोलिसी अधिकार असतात. त्यामुळे त्याला निर्धारित वेतन मिळते.

भारतामध्ये मात्र शेरीफ हे पारंपरिक दृष्टीने प्रतिष्ठेचे परंतु दिखाऊ स्वरूपाचे मानद पद आहे. भारतामध्ये फक्त मुंबई, चेन्नई व कोलकाता या तीनच महानगरांसाठी राज्य सरकार शेरीफची नेमणूक करते. भारतीय शेरीफ-कडे न्यायालयाच्या हुकमाची ⇨ बेलिफा करवी स:शुल्क अंमलबजावणी करणे, शहरात येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीचे आगतस्वागत करणे, राष्ट्रीय समस्या वा दुखःदप्रसंगी शोकसभेसारख्या सार्वजनिक सभा आयोजित करणे, ही कामे असतात. मानाच्या दृष्टीने त्या त्या महानगरातील महापौराच्या खालोखाल शेरीफचे स्थान आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे किरण शांताराम, डॉ. जगन्नाथ हेगडे, सुनील गावसकर अशा नामवंतांनी शेरीफपद भूषविले आहे. सध्या डॉ. इंदु सहानी या मुंबईच्या नगरपाल आहेत.

रेगे, प्र. वा.