शेनक्येव्हिच, हेन्रिक : (५ मे १८४६ – १५ नोव्हेंबर १९१६). श्रेष्ठ पोलिश कथा-कादंबरीकार व नोबेल पुरस्काराचा मानकरी. जन्म पोलंडमधील वोला ओर्झेश्का येथे. साहित्य, इतिहास आणि भाषाशास्त्र ह्या विषयांचे त्याने वॉर्सा विदयापीठात अध्ययन केले तथापि पदवी न घेताच १८७१ मध्ये त्याने विदयापीठ सोडले आणि लेखनावर लक्ष केंद्रित केले तसेच त्याने पत्रकारिताही केली. पोलिश गॅझेटचा पत्रकार म्हणून त्याने अमेरिकेला भेट दिली (१८७६ – ७८). परतीच्या प्रवासात त्याने इटली व फ्रान्सला धावती भेट दिली.

इन व्हेन(१८७२, इं. भा. १८९९) ही त्याची पहिली कादंबरी. त्यानंतर विथ फायर अँड द सोर्ड (१८८४, इं. भा. १८९५), द डेल्यूज (१८८६, इं. भा. १८९५) आणि पॅन मायकेल (१८८७८८, इं. भा. १८९५) ही त्याची कादंबरीत्रयी प्रकाशित झाली. सतराव्या शतकात कोसॅक, तार्तर, स्वीड आणि तुर्की लोकांबरोबर पोलंडला जो संघर्ष करावा लागला, त्याचे प्रभावी चित्रण ह्या कादंबऱ्यांत त्याने केले आहे. एखादया गद्य महाकाव्यासारख्या वाटणाऱ्या ह्या कादंबरीत्रयीतून पोलंडची राष्ट्रभावना चेतविण्याचा त्याचा उद्देश होता. पोलंडच्या वाचकांचा त्यास मोठा प्रतिसादही लाभला.

शेनक्येव्हिचच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्यांत विदाउट डॉग्मा (१८९१, इं. भा. १८९९) आणि को वादीस? (१८९६), द नाइट्स ऑफ द कॉस (१९०१), ऑन द फील्ड ऑफ ग्लोरी (१९०६) ह्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. विदाउट डॉग्मा मध्ये पोलंडमधील उच्च्वर्गीयांच्या जीवनाचे चिकित्सक विश्लेषण केलेले आहे, तर को वादीस ? मध्ये नीरोच्या सत्तेखालीलप्राचीन रोमचे चित्रण त्याने केले. ह्या कादंबरीला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली. अनेक भाषांत तिचे अनुवाद झाले आणि तिच्यावर चित्रपटही निघाला.

त्याने कथालेखनही केले. ‘ॲन ओल्ड रिटेनर ’ (१८७५, इं. शी.) ही त्याची पहिली कथा. त्यानंतर सर्व इं. शी.- ‘यांको द म्यूझिशिअन’ (१८७९), ‘ द लाइट हाउस कीपर ’ (१८८२) व ‘ बार्‌टेक द काँकरर (१८८२) ह्यांसारख्या उल्लेखनीय कथा त्याने लिहिल्या. इन डेझर्ट अँड विल्डरनेस (१९११, इं. भा. १९४५) ही त्याने लहान मुलांसाठी लिहिलेली कथा होय.

पोर्ट्रेट ऑफ अमेरिका (१८७६ – ७८, इं. भा. १९५९)मध्ये त्याने अमेरिकेचे-विशेषतः कॅलिफोर्नियातील परिसराचे-वेधक चित्रण केले आहे. ऐतिहासिक काटेकोरपणाचा अभाव व नाटकीपणा हे दोष त्याच्या कादंबृयांत दृग्गोचर होत असले, तरी ओघवती कथनात्मक शैली व अन्य गुणवैशिष्ट्यांनी त्याच्या कादंबऱ्या संपन्न आहेत.

साहित्याचे नोबेल पारितोषिक त्यास १९०५ मध्ये लाभले. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याला पोलंड सोडून स्वित्झर्लंडमध्ये जाण्याची वेळ आली. तेथेच व्हीव्हे येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Bagchi, Asoke K. Hinduja Foundation Encyclopedia of Nobel Laureates 1901–1997, Delhi, 1998.

2. Giergielewicz, Mieczyslaw, Henryk Sienkiewicz, New York, 1968.

3. Lednicky, Waclaw, Henryk Sienkiewicz: A Retrospective Synthesis, Paris, 1960.

कुलकर्णी, अ. र.