शेतकावळी : (हिं. करांटा लॅ. किप्टोलेपिस बुखनानी कुल-ॲस्क्लेपीएडेसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उप-विभाग ] ही चीकयुक्त मोठी वेल भारतात व श्रीलंकेत सर्वत्र आढळते. हिची पाने ७ -१२ सेंमी. लांब, ४ -६ सेंमी. रूंद असून ती साधी, समोरासमोर, तळाशी गोलाकार, शेंड्याला टोकदार, जाडसर, अखंड व भाल्यासारखी असतात. ती वरून हिरवी व खालून पांढरट असतात व त्यांच्या दोन्ही कडांजवळून एक समांतर शीर गेलेली असते. फुले द्विलिंगी, पिवळसर हिरवी असून फुलोरे कुंठित परिमंजिरीप्रमाणे असतात. पुष्पमुकुट घंटाकृती व लहान असतो. परागकोश त्रिकोणी असून त्यांना जोडणाराभाग परागकोशाच्या बाहेर मांसल व टोकदार उपांगाप्रमाणे वाढलेला दिसतो. पेटीसारखी जोडफळे ५ -१० सेंमी. लांब, सरळ, कठीण व पसरट असून मध्यापासून कमाने निमुळती होतात. ती एका शिवणीवर तडकतात. बिया अनेक व त्यांवरील केसांचा झुपका २.५ सेंमी.पेक्षा जास्त लांब असतो. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨ॲस्क्लेपीएडेसी अथवा रूई कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

हर्डीकर, कमला श्री.