शेटलंड : (झेटलंड). ईशान्य अटलांटिक महासागरातील ग्रेट ब्रिटनच्या ताब्यातील द्वीपसमूह. स्कॉटलंडच्या मुख्य भूमीपासून ईशान्येस २१० किमी.वर, तसेच ब्रिटनच्या ऑर्कनी बेटांच्या ईशान्येस ८० किमी.वर ही लहानमोठी अशी शंभरांवर बेटे आहेत. त्यांपैकी फक्त २० बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. बेटांचे एकूण क्षेत्रफळ १,४६६ चौ. किमी. असून लोकसंख्या २२,४४० (२०००) होती. यांचा अक्षवृत्तीय विस्तार ५९° ४८’३०” उ. ते ६०°५२’ उ. व रेखावृत्तीय विस्तार १° ५२’ प. ते २°६’ प. यांदरम्यान आहे. स्कॉटलंडचा हा सर्वांत उत्तरेकडील प्रशासकीय विभाग आहे. मेनलँड, येल, अन्स्ट, फेटलर, ह्वॉल्सी, बेसे, फूला, मकल रोए, पापा स्टुअर, वेस्ट बूरा, ईस्ट बूरा, टोंड्ना, नॉस, फेअर ही या द्वीपसमूहातील प्रमुख बेटे आहेत.
शेटलंड बेटे प्रामुख्याने वेडीवाकडी, ओसाड, नापीक, वृक्षरहित व दलदलयुक्त आहेत. बहुतेक बेटे सस.पासून १५० मी.पेक्षा कमी उंचीवर असून त्यांचे किनारे दंतुर आहेत. किनाऱ्यावर समुद्रकडे, गुहा, सागरखुंट (स्टॅक्स) व भूशिरे आढळतात. मोठया बेटांवर गोड्या पाण्याची सरोवरे व ओढे आहेत. गल्फ प्रवाहाच्या उष्णतेचा येथील हवामानावर परिणाम झालेला आहे. उच्च् अक्षांशात असूनही येथील हवामान सौम्य व दमट आहे. वेगवान वारे मात्र सतत वाहत असतात व वारंवार तीव्र वादळे उद्भवतात. हिवाळ्यातील सरासरी तापमान ३° से. तर उन्हाळ्यातील सरासरी तापमान १३° से. असते.
अश्मयुगापासून येथील काही बेटांवर वस्ती असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. मेनलँड बेटाच्या दक्षिण टोकावरील जार्लशॉफ येथील उत्खननात बाँझ व लोहयुगकालीन वस्तू सापडल्या आहेत. येथील सेंट निनिअनबेटा-वर इ. स. सातव्या-आठव्या शतकांत क्रिश्चन धर्मप्रसारक आले वयेथील स्थानिक रहिवाशांचे त्यांनी धर्मांतर घडवून आणले. आठव्या व नवव्या शतकांत नॉर्मन (व्हायकिंग) टोळ्यांनी या बेटांवर आक्रमण केले.पंधराव्या शतकापर्यंत ही बेटे त्यांच्या ताब्यात होती. बेटांवरील अनेक व्यक्ती व स्थळे यांची नावे नॉर्स भाषेतील आहेत. १४६९ मध्ये स्कॉटलंडचा राजा तिसरा जेम्स व नॉर्वेची राजकन्या मार्गा रेट यांचाविवाह होईपर्यंत ही बेटे नॉर्वेला जोडलेली होती. १४७२ मध्ये ती स्कॉटलंडला जोडण्यात आली. विसाव्या शतकातील दोन्ही महायुद्धांच्या काळात या बेटांवर ब्रिटिश हवाईदल, नौदल व भूदलाचा तळ होता. १९७५ पासून स्कॉटलंड शासनांतर्गत मंडळाकडून येथील कारभार पाहिला जातो.
उत्तर समुद्रातील खनिज तेलाच्या उत्पादनास १९७० च्या दशकात सुरूवात झाली. तेव्हापासून ही बेटे खनिज तेलाचे प्रमुख साठवण व वितरण केंद्र बनली आहेत. मासेमारी हा येथील परंपरागत मुख्य व्यवसाय आहे. येथील शेटलंड तट्टू व धनगरी कुत्री प्रसिद्घ आहेत. येथील मेंढपाळीच्या व्यवसायाव्दारे उत्तम प्रतीचे लोकरी कपडे तयार केले जातात व त्यांची निर्यातही होते. ओट, बार्ली, बटाटे इ. येथील कृषिउत्पादने असून कोळशाचे उत्पादन इंधनासाठी घेतले जाते. बेटांवरील सृष्टिसौंदर्यामुळे येथे पर्यटन व्यवसायही चालतो.
मेनलँड हे या द्वीपसमूहातील सर्वांत मोठे बेट असून त्याचे क्षेत्रफळ ९७१ चौ. किमी. आहे. उत्तर भागात रोनस हिल (४५० मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. लर्विक हे या बेटावरील प्रमुख बंदर व प्रशासकीय केंद्र आहे. स्कॅलोवे (बेटांची प्राचीन राजधानी), बूरा, ह्वॉल्सी व स्केअरीझ ही या द्वीपसमूहातील प्रमुख मासेमारी बंदरे आहेत. येल ह्या दुसऱ्या प्रमुख बेटाचे क्षेत्रफळ २११ चौ. किमी. असून अन्स्ट ह्या सर्वांत उत्तरेकडील बेटाचे क्षेत्रफळ १२१ चौ. किमी. आहे. या बेटाच्या ईशान्य भागात सॅक्सव्हर्ड हे प्रमुख रडार केंद्र आहे. फेअर बेट पक्षिनिरीक्षण म्हणून प्रसिद्घ आहे.
चौधरी, वसंत