संघर्ष : ( कॉन्फ्लिक्ट ). परस्परविरूद्ध अशी दोन वा त्यांहून अधिक उद्दिष्टे, वृत्ती, ध्येये ही जेव्हा एकाच वेळी मनात जागृत होतात, त्यावेळी संघर्ष निर्माण होतो. तो एखादया व्यक्तीच्या मनात जसा निर्माण होऊ शकतो, तसाच समाजातील दोन वर्गांत, गटांत तसेच एकाच संघटनेत वावरणाऱ्या व्यक्तींमध्येही उद्भवू शकतो. परस्परविरोधी उद्दिष्टांपैकी कशाची निवड करावी, ह्याबद्दल व्यक्तीच्या मनात कसा संघर्ष निर्माण होतो, ह्याची नेहमीच्या अनुभवातील काही उदाहरणे अशी : लठ्ठ माणसाला चटकदार पदार्थ खाण्याची अनिवार इच्छा होते परंतु असे खाणे आपल्या प्रकृतीला अपायकारक आहे, ह्या जाणिवेतून त्याच्या मनात अपराधभावनाही निर्माण होते. खाण्याची इच्छा आणि प्रकृती सांभाळण्याची इच्छा, ह्यांच्यातील हा संघर्ष असतो. रणांगणावर असताना अचानक भ्यालेल्या एखादया सैनिकाला एकीकडे आपल्या शरीराला इजा होईल किंवा आपण मरू ही कल्पना छळत असते, तर दुसरीकडे लढायला नकार दिल्यास आपल्याविरूद्ध कठोर सैनिकी कारवाई होऊ शकते, ही जाणीवही अस्वस्थ करीत असते. लढावे आणि लढू नये, ह्या दोन परस्परविरूद्ध विचारांमुळे त्याच्या मनात संघर्ष निर्माण झालेला असतो. अनेक मानसिक आजारांची पूर्वसूचना अशा संघर्षांतून मिळते, असा मानसोपचारतज्ज्ञांचा अनुभव आहे. भावनिक संघर्षांचा – विशेषत: अबोधाच्या पातळीवरील संघर्षांचा – व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर आणि वर्तनावर होणाऱ्या हानीकारक परिणामांतून ⇨मज्जाविकृती सारख्या व्याधी निर्माण होतात, असे – सिग्मंड फॉइड चे प्रतिपादन आहे. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨कुर्ट ल्यूइन   ह्याच्या मते जवळपास समान ताकद असलेल्या शक्ती जेव्हा परस्परविरूद्ध दिशांनी पुढे येऊ लागतात, तेव्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. ह्या शक्तींचे परिमाण आणि त्यांची दिशा ह्यांचे मापन करता येते त्यामुळे प्रायोगिक पातळीवर त्यांचे परिणामही अभ्यासता येतात.

संघर्षांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांपैकी काही असे : 

(१) अभिगम-अभिगम संघर्ष: ( ॲप्रोच-ॲप्रोच कॉन्फ्लिक्ट ). व्यक्तीला आकर्षून घेण्याची समान शक्ती असलेले दोन पर्याय तिच्या समोर असतात. त्यांतून एकाची निवड करायची असते. उदा., एखादया तरूणाला सर्व दृष्टींनी सारख्याच आकर्षक अशा दोन व्यवसायांपैकी कोणता स्वीकारावा, असा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा त्याच्या मनात संघर्षात्मक आंदोलने सुरू होतात आणि दोन्ही पर्यायांच्या आकर्षणशक्तीतही चढउतार होऊ शकतात. त्यामुळे कोणता पर्याय स्वीकारला जाईल, ह्याबद्दल अनिश्चितता असली, तरी ह्या चढउतारांच्या प्रक्रियेत एखादा पर्याय चटकन स्वीकारला जाऊ शकतो.

(२)  वर्जन-वर्जन संघर्ष: (अव्हॉय्‌डन्स-अव्हॉय्‌डन्स कॉन्फ्लिक्ट). हा संघर्ष व्यक्तीच्या मनात बरेच ताण निर्माण करणारा असतो कारण समोर असलेले दोन्ही पर्याय अनाकर्षक असतात. उदा., एखादया विदयार्थ्याला अभ्यास करायचा नसतो पण अनुत्तीर्ण झाल्याबद्दल घरच्यांची बोलणीही खायची नसतात. अशा वेळी जो तिसराच पर्याय आचरणात आणावासा वाटतो, तो घातक ठरू शकतो. वरील उदाहरणातल्या विदयार्थ्याला पळून जाण्याचा पर्याय स्वीकारावासा वाटेल व तो अधिकच अडचणीचा असू शकेल.

(३)  अभिगम-वर्जन संघर्ष: (ॲप्रोच-अव्हॉय्‌डन्स कॉन्फ्लिक्ट).  ह्या प्रकारच्या संघर्षात एखादी गोष्ट एकाच वेळी हवीशी वाटते आणि टाळावीशीही वाटते. उदा., एखादया तरूणाला आपल्या मित्रमैत्रिणींप्रमाणेच एखादया क्लबमध्ये जाऊन नृत्य करण्याची तीव इच्छा होते. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपण सर्वार्थाने आहोत, असे दाखवून देण्याचा हेतू त्यामागे असू शकतो पण त्याला सफाईदार नृत्य करता येत नसल्यामुळे आपले मित्र आणि मैत्रिणी आपली थट्टा करतील, ही खरी वा कल्पित शक्यताही त्याचे पाय मागे ओढीत असते.

(४) दुहेरी अभिगम संघर्ष: (डबल ॲप्रोच कॉन्फ्लिक्ट). समान आकर्षणयुक्त, पण परस्पर अपवर्जित (म्यूच्युअली एक्स्क्लूझिव्ह ) अशी दोन उद्दिष्टे समोर असतील, तर व्यक्तीचे मन व्दिधा होते आणि ह्या संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. उदा., एखादया व्यक्तीला आपल्या गावाचे, तिथल्या आपल्या घराचे खूप प्रेम असते पण त्या व्यक्तीला आपल्या कार्यालयाकडून पदोन्नतीही हवी असते. ती मिळूही शकते पण त्यासाठी बदलीच्या एखादया गावी जाणे भाग असते. ह्यातून व्यक्ती वैफल्यगस्त होण्याची शक्यता असते.

(५) दुहेरी वर्जन संघर्ष: (डबल अव्हॉय्‌डन्स कॉन्फ्लिक्ट). या प्रकारच्या संघर्षात समोर असलेले दोन्ही पर्याय अनाकर्षक असतात. त्यांतून कोणताही पर्याय स्वीकारला, तरी वैफल्य हे अटळच असते. एखादी व्यक्ती बेकारीमुळे कंटाळलेली असते पण तिला मिळू शकणारी नोकरीही कंटाळवाणी आणि कष्टाची असते.

अनेकदा व्यक्तीच्या मनातले संघर्ष अबोधाच्या पातळीवरचे असतात. त्यामुळे व्यक्तीला मनावर आलेले ताण जाणवतात पण त्यांचे कारण कळत नाही. भय, वैरभाव, राग ह्यांचे आवेगी स्वरूप समाजाला फारसे रूचत नाही. त्यामुळे लहानपणापासून अनेक माणसे ह्या भावना दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असतात किंबहुना अबोधाच्या पातळीवर आपल्या अशा भावनांचे अस्तित्वही ओळखत नसल्यासारख्या वागतात. त्यामुळे संघर्षांच्या रूपाने अशा भावना जेव्हा आपले अस्तित्व जाणवून देऊ लागतात, त्यावेळी अशा व्यक्ती चिंतातुर होतात पण ह्या मानसिक अवस्थेमागे काय असू शकेल हे त्यांना कळत नाही.

संघर्षाची अनुभूती एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रमाणांत येऊ शकते. हा जो फरक पडतो, त्यात पूर्वानुभवाचा वाटा मोठा असतो. संघर्षाची हाताळणी योग्य प्रकारे करण्यात व्यक्ती अपयशी ठरल्यास तिच्यात विकृती निर्माण होऊ शकतात. तिचे वर्तन नकारात्मक होऊ शकते. आक्रमकता, सूडाची भावना, अनुपस्थित व्यक्तींविषयी अनाठायी चर्चा, इतरांबद्दल तुच्छता, ह्यांसारखे प्रकार त्या व्यक्तीच्या वर्तनात दिसून येतात म्हणून संघर्ष वेळीच व योग्य प्रकारे सोडविण्यावर व्यक्तीचे मानसिक आरोग्य अवलंबून असते.

वाडकर, अलका


संघर्षप्रणाली : संघर्ष करणारे त्यांच्यापाशी असणाऱ्या सामाजिक संघटनेच्या शक्त्यनुसार अन्यांच्या विरोधात असणाऱ्या आपल्या हितसंबंधांचा जो पाठपुरावा करतात, त्यातून होणाऱ्या सामाजिक संरचनेतील परिवर्तनांचा वेध संघर्षप्रणाली घेत असते. वर्गसंघर्षाच्या मार्क्सवादी विश्लेषणाचा आधार ती घेत असली, तरी समाजवादाशी ती वैचारिकदृष्टया बांधून घेत नाही. ⇨ कार्ल मार्क्स  आणि ⇨ फीड्रिख एंगेल्स   ह्यांच्या विचारांनुसार समाजातील हितसंबंधांचा संघर्ष स्वत:जवळ मालमत्ता असणारे आणि ती नसणारे ह्यांच्यातील विभेदातून निर्माण होतो. डाहरेंडॉर्फ ह्या विचारवंताच्या मते समाजात आज्ञा देणारे आणि त्या पाळणारे असे सत्तेवर आधारित दोन वर्ग असतात. आज्ञा देणाऱ्या सत्तावंतांना ‘ जैसे थे ’ अशी परिस्थिती हवी असते. उलट ज्यांच्यापाशी सत्ता नसते, त्यांना परिस्थिती पालटावी असे स्वाभाविकपणेच वाटत असते. पण सत्तासंघर्षाच्या प्रकाराचा मालमत्ता हा केवळ एक आधार होय. कोणत्याही संघटनेच्या अंतर्गत व्यवहारात संघर्ष होऊ शकतात. ह्यात समाजवादी संघटनाही आल्या. ⇨  माक्स वेबर ह्यांच्या विचारांनुसार विशिष्ट संस्कृतीचा प्रत्येक लोकसमूह स्वत:साठी लाभप्राप्ती व्हावी म्हणून झगडू शकतो. बाजारव्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या तीन नात्यांतून आर्थिक संघर्ष निर्माण होतात : (१) मालक-श्रमिक संघर्ष, (२) उत्पादक-उपभोक्ते संघर्ष आणि (३) कर्जदाते-कर्जघेते संघर्ष.

संघर्षप्रक्रिया : एखादा गट संघटित होऊन आपल्या हितसंबंधांच्या विरोधी असणाऱ्या शक्तींविरूद्ध सक्रिय लढयसाठी सिद्ध होईपर्यंत, त्याच्या सामूहिक मनातली संघर्षभावना सुप्त राहते. उच्च सामाजिक वर्ग हे समाजातील खालच्या म्हटल्या जाणाऱ्या वर्गांपेक्षा अधिक संघटित असतात आणि सत्तासंपादनासाठी ह्या उच्च वर्गातील गटागटांतच बरेच संघर्ष होत असतात. खालच्या सामाजिक वर्गांची प्रवृत्ती स्थानिक पातळीवरच्या गटांमध्ये विखंडित होण्याची असते तथापि जेव्हा एक एकजिनसी वांशिक वा धार्मिक गट म्हणून ते एखादया विशिष्ट स्थळी एकत्र येतात, तेव्हा त्यांचे संघटन सहज शक्य होते. तात्पुरते संघटन संघर्ष करताना हिंसक होण्याची अधिक शक्यता असते मात्र तो संघर्ष टिकविण्यात ते कमी पडते.

संघर्षामुळे प्रत्येक गटात सत्तेचे केंद्रीकरण होते आणि प्रत्येक गट आपले मित्र शोधू लागतो. ह्यातून समाजात धुवीकरणाची प्रक्रिया सुरू होते. परस्परांशी संघर्ष करणाऱ्या गटांत टोल्यांना प्रतिटोले होत असतात. गटांची आर्थिक ताकद, तसेच अनुयायी, आयुधे ह्यांचे स्रोत ह्यांवर ते करीत असलेला संघर्ष कसा आणि किती काळ चालू राहतो, हे अवलंबून असते. संघर्षात एक बाजू विध्वंसक असेल आणि दुसरी नेमस्त असेल, तर विध्वंसक बाजूचे साहाय्यक स्रोत लवकर संपण्याची शक्यता असते. उलट नेमस्त बाजूला आपल्या स्रोतांमध्ये भर टाकून ते अधिक बळकट करायला वाव मिळतो आणि त्या बाजूच्या विजयाची शक्यता वाढते.

संघर्षामुळे समाजातील सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा ह्यांची विभागणी आकार घेते. सत्ता आणि संपत्ती ह्यांच्या केंद्रीकरणावर प्रतिष्ठा अवलंबून असते. ज्यांच्यापाशी हे स्रोत असतात, ते त्यांच्या आधारे आणखी समृद्धी मिळवितात आणि त्यांची प्रतिष्ठा आणखी वाढते. कला, शिक्षण इ. सांस्कृतिक क्षेत्रांत आपल्या सत्ता-संपत्तीची गुंतवणूक करून ते सांस्कृतिक वर्चस्वही प्राप्त करू शकतात.

समाजात सुप्तपणे जे संघर्ष चालू असतात, त्यांतून विश्र्वासाच्या आणि भावनांच्या पातळीवर माणसे विभागली जातात. दैनंदिन जीवनात व्यक्ति-व्यक्तींमध्ये ज्या सूक्ष्म आंतरक्रिया घडून येत असतात, त्यांतून व्यक्तींना शक्ती आणि संबंधांची दृढता, ह्यांची प्राप्ती होत असते. त्यांच्या आधारेच त्या आपली भावनिक ऊर्जा निर्माण करीत असतात. हा आधार नाहीसा होतो, तेव्हा ते आपली ही ऊर्जा गमावून बसतात.

कुलकर्णी, अ. र.

संदर्भ : 1. Collins, Randall, Conflict Sociology, New York, 1975.

            2. Coser, Lewis, The Functions of Social Conflict, New York, 1956.

            3. Kriesberg, Louis, Social Conflicts, Englewood Cliffs ( N. J. ), 1982.

           4.  Schelling,  Thomas  C.  The  Strategy  of  Conflict,  Cambridge ( Mass. ), 1962.