संयुक्त सेना कारवाई : (कम्बाइन्ड ऑपरेशन). भूदल, नौदल व हवाई दल या तिन्ही दलांची संयुक्त कारवाई. दुसऱ्या जागतिक महा- युद्धात (१९३९-४५) संयुक्त सेनाकारवाईचे शास्त्र व तंत्र विशेष प्रगत झाले. तीनही दले स्वतंत्र व वेगळी असली, त्यांचे सेनाप्रमुख वेगळे असले आणि त्यांची कार्यक्षेत्रे वेगळी असली तरीसुद्धा काहीवेळा त्या तिघांच्या सहकार्याची संयुक्त कारवाईसाठी आवश्यकता असते व अशा सहकार्याशिवाय उद्दिष्ट साध्य होत नाही. संयुक्त सेनाकारवाईचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे १९४४ मध्ये जून महिन्यात अँग्लो-अमेरिकन फौजांनी फ्रान्सवर (नॉर्मंडी) केलेली स्वारी होय. इंग्लिश बंदरातून जहाजांवरून समुद्रपार करण्याचे काम नाविक दलाकडे होते. शत्रूच्या किनाऱ्यावरील संरक्षण फळीवर व आत दूरवर त्याच्या दळणवळण मार्गावर बाँबवर्षाव करून किनाऱ्यावर उतरणाऱ्या सैन्याला हवाई संरक्षण देण्याची कामगिरी हवाई पथक दलाकडे होती आणि जमिनीवर उतरून जर्मन भूदलाला नष्ट करण्याचे व फ्रान्समध्ये पाय रोवण्याचे काम पायदळाकडे होते. संयुक्त सेनाकारवाईकरिता फार परिश्रमपूर्वक योजना आखाव्या लागतात. अत्यंत बारीक तपशिलांकडे लक्ष दयावे लागते. तीनही दलांचे एकत्र संचलन करावे लागते. या कारवाईत वेळेला फार महत्त्व असते आणि प्रत्येक लष्करी हालचाल व क्रिया ठरलेल्याप्रमाणे व्हावी लागते. समुद्राची भरती-ओहोटी, पाण्याचे प्रवाह, निरनिराळ्या नौकांच्या वेगांचे प्रमाण, सूर्योदय-सूर्यास्त यांच्या वेळा, शत्रूने पेरलेले पाणसुरूंग व अडथळे दूर करण्याकरिता लागणारा वेळ इत्यादी सर्वांचा समन्वय साधावा लागतो. सैन्य उतरतेवेळी त्यास तोफखान्याचे संरक्षण द्यावे लागते. ते संरक्षण तोफा किनाऱ्यावर उतरून कार्यवाहीत येण्यापूर्वी नाविक दलातील तोफखाना विभागास करावे लागते. स्वत:चे सैन्य उतरण्याची वेळ व विमानदलाची किनाऱ्यावरील शत्रूफळीवर बाँबहल्ल करण्याची वेळ, ही निश्चित ठरवावी लागते. त्यात मिनिट-सेकंदाचा फरक पडला, तर स्वत:च्या फौजेवर स्वत:च्याच विमानांचे बाँब कोसळण्याची भीती असते. याशिवाय शत्रूच्या पिछाडीकडील मोक्याच्या ठिकाणी छत्रीधारी सैनिकही काही वेळा उतरावे लागतात. याकरिता सूक्ष्म आखणी करावी लागते. ज्या ठिकाणी ही कारवाई करायची असते, त्या क्षेत्राचा, चढउतारांचा, डोंगर-नाल्यांचा, पूल व रस्ते यांचा सूक्ष्म अभ्यास व कानोसा घ्यावा लागतो. या कारवाईची आखणी तिन्ही दलांच्या संयुक्त समिती- कडून केली जाते. असे केल्याने प्रत्येक दलाच्या अडचणी एकमेकांस कळून येतात व सहकार्य सुकर होते. जमीन-पाणी व आकाश या तीन घटकांचा या कारवाईत संबंध येतो. इटली व म्यानमारमध्येही (बह्मदेश) अशा त्रिदल कारवाया करण्यात आल्या होत्या. पॅसिफिक क्षेत्रात अशा कारवाया अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनाही कराव्या लागल्या. जर्मनांनी कीट बेटावर केलेला हल्ल, हे संयुक्त सेनाकारवाईचे पहिले यशस्वी उदाहरण होय. आता जगातील सर्व देशांत अशा कारवाईचा सराव व अभ्यास केला जातो.

पहा : नौसेना भूसेना महायुद्ध, दुसरे हवाई दल.

चाफेकर, शं. ग.